श्रीरामपूर हल्ल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगरला वकिलांचा मोर्चा
पाईट, ता. ५ : श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) येथील न्यायालयात ॲड. दिलीप दत्तात्रेय औताडे यांच्यावर सुनावणीदरम्यान झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकिलांनी सोमवारी(ता. ४) खेड उपविभागीय अधिकारी, खेड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. आरोपीला कठोर शिक्षा करावी, वकिलांवरील हल्ला विरोधी कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करीत उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांना मागण्याचे निवेदन दिले.
सत्र न्यायालय ते उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चात वकील बांधवांनी जोरदार घोषणा देत सदर घटनेबाबत संतप्त भावनाही व्यक्त केल्या. या मोर्चामध्ये राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे ॲड. वैभव कर्वे, ॲड. शंकर कोबल, ॲड. स्वरूपा कोतवाल, ॲड. नवनाथ कड, ॲड. शुभम गाडगे, ॲड. साक्षी राक्षे, ॲड. केदार गुरव, ॲड. सिद्दिका लांडगे, ॲड. दीपक थिगळे, ॲड. संकेत वाघमारे, ॲड. सूरज राळे आदी सहभागी झाले होते.