कलेक्टर होण्याचे स्वप्न राहिले स्वप्नच
पाईट, ता. ९ : ‘कलेक्टर होऊन लाल दिव्याच्या गाडीत घरी येणार’, असे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल करून परीक्षा देणारी पाळू येथील अश्विनी केदारी जीवन जगण्याची लढाई मात्र हरली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून लहानपणापासून प्रत्येक परीक्षेत पहिला नंबर मिळवणारी पाळू येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली अश्विनी बाबूराव केदारी ही शाळेपासूनच कॉलेजपर्यंत पहिला नंबर मिळवणारी. आजही शाळा, कॉलेजमध्ये तिने मिळवलेल्या मार्क्सपर्यंत कोणीही पोचू शकले नाही. कॉलेजनंतर बीटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तिने तयारी सुरू केली आणि २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येत पोलिस उपनिरीक्षक पद तिने मिळवले. सध्या तिचे नाशिक येथे ट्रेनिंग सुरू होते.
गणेशोत्सवाची सुट्टी मिळाल्याने ती पाळू येथे घरी आली होती. त्याच रात्री जागून ती अभ्यास करत होती. मग तिने सर्वांना अंघोळीसाठी पुरेल एवढे ५० लिटर पाणी गिझरच्या ड्रममध्ये टाकून ती पुन्हा अभ्यासाला लागली व काही वेळ तिला झोप लागली. ती पुन्हा पहाटे अडीचच्या दरम्यान उठली. तोपर्यंत गिझरमधील पाणी जास्तच उकळले होते. अंघोळीसाठी जाताना तिने बाथरूममधील गिझरचे बटन बंद केले. गिझरचे झाकण उघडून बादलीभर पाणी बाहेर काढले आणि तेवढ्यात ड्रम फुटला आणि या गोंधळात ती खाली गरम पाण्यात पडून सुमारे ८० टक्के भाजली. १० दिवस तिच्यावर भोसरी व नंतर डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच रविवारी (ता. ७) तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
उपचारादरम्यान ती घरच्यांना सांगत होती की, मला कितीही वेदना झाल्या तरी मी त्या सहन करीन, पण मी लाल दिव्याच्या गाडीतच घरी येणार. मात्र, नियतीला कदाचित हे मान्य नसावे, त्यामुळेच की काय तिचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिच्यावर काळाने झडप घातली आणि अश्विनीचे स्वप्न कायमचेच स्वप्न राहिले!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.