पढरवाडीत रंगला पहिला रानभाजी महोत्सव

पढरवाडीत रंगला पहिला रानभाजी महोत्सव

Published on

पाईट, ता. ७ : पुणे येथील कल्पवृक्ष संस्था, बायफ सामाजिक संस्था (खेड तालुका) आणि एस.एम. सुपे मेमोरियल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गसंपन्न पढरवाडी (वांद्रा, ता.खेड ) येथे पहिला रानभाजी महोत्सव आयोजित केला होता.
भलरीच्या पारंपरिक ढोल आणि गाण्यांच्या ठेक्यावर मोठ्या उत्साहात रानभाज्यांचे मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सालोबा देवाचे पूजन करून महोत्सवाची सुरुवात झाली. या महोत्सवासाठी केवळ पढरवाडीतील नव्हे तर भोरगिरी, भिवेगाव, भोमाळे खालचे व वरचे, खरपुड, म्हसेवाडी, पाभे, खोपेवाडी, येळवली या गावातल्या एकूण जवळपास १७० महिलांनी सुमारे प्रकारच्या २५ ते ३० प्रकारच्या रानभाज्यांचे पदार्थ करून आणले होते. यामध्ये डांगर, चिचारडी, कवदर (राणकेळी), कोळसून, कौला, बरकी, केना, कुर्डू, कुंभा, कोंबडा/ रान तेरडा, जनता, रान कोथिंबीर, पावसाळी काकडी, काटे माठ, भोकर, तरवड (टाकळा), कोंभाळ, मशेली, माठाचे देठ, करटुली, गोजीभ सारख्या वनस्पती आणि पावसाळ्यात मिळणारे खेकडे, मासे यांचे विविधरंगी आणि विविध प्रकारचे अत्यंत चवदार व पौष्टिक पदार्थ यांचा समावेश होता.

खरपुडमधील वैष्णवी महिला बचत गटाने अस्सल मध, भोमाळे येथील अराळा महिला बचत गटाने करवंद लोणचे आणि नाचणी लाडू ही उत्पादने विक्रीसाठी ठेवली होती. त्यांसही भरघोस प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, महोत्सवाचे आयोजन पढरवाडीतील गावकऱ्यांनी वर्गणी काढून केले होते. गावास तिन्ही संस्थांनी बरीच आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. सह्याद्री स्कूलने खिरीसाठी काळा तांदूळ मोफत उपलब्ध करून दिला होता. या महोत्सवास वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि खेड, पुणे, जुन्नर येथून अनेक पर्यावरण प्रेमीनी भेट देऊन उपस्थितांचे भरभरून कौतुक केले.

रानभाज्यांचे संवर्धन होण्यासाठी...
खेड तालुक्यातील पश्चिम भागातील तरुण पिढीला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच या भाज्यांचे संवर्धन व्हावे, हा अनोखा ठेवा जपला जावा, शिकलेल्या पिढीचे जंगलाशी तुटलेले नाते पुनरुज्जीवित व्हावे या उद्देशाने कल्पवृक्ष एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुप या सामाजिक संस्थेने सन २००९ पासून दुर्गम येळवली गावात पहिला रानभाजी महोत्सव साजरा केला होता. त्यानंतर खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील इतर गावांमध्ये सदर महोत्सवास सुरुवात झाली.

02661

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com