पाईट केंद्रातील सेवेबाबत रुग्ण समाधानी
वनिता कोरे
पाईट : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही महिला वैद्यकीय अधिकारी गेल्या चार वर्षांपासून निवासी राहत असल्याने रोजच्या ओपीडीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आठवडे बाजारच्या दिवशी हीच रुग्णसंख्या दुप्पटीने वाढते.
पाईट (ता. खेड) येथील आरोग्य केंद्रात दररोज सुमारे ५० ते ७० रुग्ण तर आठवडे बाजारच्या दिवशी रुग्णसंख्या सुमारे १२० ते १५० पर्यंत जात असून दोन्ही महिला अधिकाऱ्यांविषयी प्रत्येक रुग्णांच्या तोंडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. येथे सन २०२१ पासून डॉ. अश्विनी कांबळे व साहाय्यक म्हणून डॉ. सोनम रणवीर येथील जबाबदारी निवासी राहून २४×७ उत्तम पद्धतीने सांभाळतात. त्यांच्यासोबत इतर कर्मचाऱ्यामध्ये महिला संख्यादेखील अधिक आहे. येथील दोन्ही डॉक्टर रुग्णांना चांगली सेवा देत असल्याचे चिखलवाडी येथील लक्ष्मीबाई रौंधळ, कोये येथील ताराबाई घनवट, कूरकुंडीचे तरुण करण जावळे,कोमलवाडीचे ज्ञानेश्वर खेंगले व इतरही अनेक रुग्णांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांच्या प्रयत्नातून येथील आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभी आहे. येथे सर्पदंश लस व श्वानदंश लस उपलब्ध असून येथील फार्मासिस्ट सोमवारी (ता. ३) रजेवर असल्याने इतर उपलब्ध औषधांची माहिती मिळू शकली नाही. येथील आरोग्य केंद्रांची मॉडेल आरोग्यकेंद्र म्हणून नुकतीच निवड झाली आहे.त्यामुळे काही दिवसात याच केंद्रात नवीन पद्धतीने बांधकामास सुरुवात होणार असल्याने प्रसूतिगृह व हिरकणी कक्षातील रुग्णव्यवस्था सध्या नातेवाईक निवासगृहात करण्यात आली असल्याचे डॉ. अश्विनी कांबळे व डॉ. सोनम रणवीर यांनी सांगितले. दरम्यान, कर्मचारी वसाहत येथील पाण्याची टाकी फुटल्याने निवासी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाण्याची गैरसोय होत आहे,याठिकाणी नवीन टाकी बसवण्यात यावी अशी मागणी आहे.
मोबाइल, बॅटरीच्या उजेडात टाके घालण्याची वेळ
आरोग्य केंद्रात २४ तास वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने अनेकदा वीज नसल्यास रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त रुग्णांना मोबाइलच्या अथवा बॅटरीच्या उजेडात टाके घालण्याची वेळ येत असल्याचे डॉ. रणवीर यांनी सांगितले. या केंद्रात केवळ लसीकरण, प्रसूती खोलीमध्येच इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध आहे. संपूर्ण दवाखान्यात इन्व्हर्टरची सुविधा मिळण्याची मागणी होत आहे. तसेच रात्री अपरात्री रुग्णासोबत येणारे मद्यपी आणि परिसरात मद्यपान करणाऱ्यांपासून उपस्थित महिला स्टाफला त्रास होतो. मग जवळच्या औटपोस्टमधील पोलिसांची मदत घ्यावी लागते. यासाठी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षकाची आवश्यकता असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
02687
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

