पाईट परिसरात बसच्या नादुरुस्तीने नागरिक त्रस्त
पाईट, ता. २० : पश्चिम भागात सायंकाळी जाणाऱ्या एसटी बसेस सातत्याने नादुरुस्त होत असल्याने येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने आणि त्यातच एसटी नादुरुस्तीचे प्रमाण वाढल्याने विद्यार्थ्यांना घरी जायला रात्रीचे आठ वाजत आहेत.
विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत पालकही धास्तावत असल्याचे वाघू येथील राजू साबळे, शंकर साबळे, सुपे सातकरवाडीचे नकुल मोहन, आडगावचे शिवाजी गोपाळे यांनी व्यक्त केले. पश्चिम भागातील पाळू, आंबोली या ठिकाणी विद्यालये आहेत. येथील मोहोळ माध्यमिक प्रशाला विद्यालयात सुमारे १६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी पश्चिम भागातील पाळू, सुपेसातकरवाडी, वाघू, आडगाव, साबळेवाडी, कातकरीवस्ती, भोरवस्ती, अनावळे या भागातून १०५ विद्यार्थी एसटीने प्रवास करून शाळेत येतात.
राजगुरूनगरहुन पश्चिम भागात घोटवडी, वांद्रा, भलवडी या एसटी बसेस जातात. याच गाड्यांनी विद्यार्थी ये-जा करीत आहेत. मात्र तीन दिवसांपासून सायंकाळी खेडवरून सुटणाऱ्या गाड्या वाटेतच बंद पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी जायला रात्रीचे ८ वाजत आहेत. विद्यार्थ्यांना तासनतास रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागते, त्यामुळे विद्यार्थी हैराण झाले आहेत. मुले वेळेवर घरी येत नसल्याने पालकही चिंतेत असतात. त्यातच या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुले आणि मुली यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पालकांना, शिक्षकांना भेडसावत आहे.
याच कारणाने वाघूच्या कातकरी वस्तीवरील १० ते १५ विद्यार्थी आठ ते दहा दिवसांपासून शाळेत गैरहजर राहत असल्याचे मुख्याध्यापक मानकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना एसटी बस सेवा सुरळीतपणे मिळावी यासाठी पाळूच्या विद्यालयाने अनेकदा राजगुरुनगर एसटी आगाराला लेखी पत्रव्यवहार केल्याचे मुख्याध्यापक तारा मानकर, बाळासाहेब लांडगे, विष्णू अहिरे, जयश्री पाटोळे यांनी सांगितले. मात्र तरीही सेवेत सुधारणा होत नसल्याने नाराजी आहे. बसच्या नादुरुस्तीबाबत खेड आगारप्रमुखाशी संपर्क साधला असता त्या पुणे येथे बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

