थांबा आहे पण बस नाही अन् बस आहे तर थांबा नाही
कोथरूड, ता. ७ : कोथरूडमधील गणंजय सोसायटी, गार्डन ग्रुप, बधाई चौक, परांजपे शाळा, कुमार परिसर येथे बस थांबा उभारलेला आहे, मात्र या मार्गावर बस येत नाही. पौड रस्त्यावरील प्रतीक नगर येथील रस्त्याने बस जाते, परंतु तेथे बस थांबा उभारलेला नाही. त्यामुळे ‘थांबा आहे पण बस नाही, आणि बस आहे तर थांबा नाही’ याचा अनुभव कोथरूडकर घेत आहेत.
याबाबत सुहास उभे म्हणाले की, गणंजय सोसायटी येथे स्मार्ट बस थांबा योजनेंतर्गत उभारलेल्या बस थांब्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा पत्रा तुटून रस्त्यावर पडला. काही लोकांनी तो बाजूला केला. पण महापालिका व पीएमपीएलने त्याची दखल घेतली नाही. नंतर तो पत्रा गायब झाला. आता तो कुठे गेला, की कोणी चोरून नेला? याची कल्पना नाही. आमचा प्रश्न एवढाच आहे की, येथे जर बस येत नाही तर जनतेच्या पैशातून एवढा लाखोंचा खर्च करता कशाला. बस थांब्याची देखभाल, दुरुस्ती, नियोजन महानगरपालिकेने करायला हवे.
जितेंद्र कोंढरे म्हणाले की, बधाई चौकात उभ्या असलेल्या बस थांब्यावर दोन बस मार्गांचा उल्लेख आहे. पूर्वी या मार्गाने बस जायची. आता येथून बस जाताना दिसत नाही. येथे कचरा संकलन व वर्गीकरणाच्या गाड्या थांबत आहेत. बस थांबा आहे की कचरा संकलन थांबा? याचे उत्तर संबंधित अधिकारीच व्यवस्थित देवू शकतील.
परमहंस नगरमधील प्र. स. दंडवते म्हणाले की, गेली ३५ वर्षे आमच्याकडे लोहगाव बस यायची. आता तीन वर्षांपूर्वी ती बंद केली आहे. आता गरज असूनही बस सुविधा उपलब्ध नाही. मेट्रोच्या वाढीसाठी प्रशासन जेवढी काळजी घेताना दिसते. तेवढी काळजी बस सेवेसाठी घेताना दिसत नाही.
पीएमपीचे दत्तात्रेय तुळपुळे म्हणाले की, माझ्याकडे बस थांब्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे. गणंजय सोसायटी येथील बस थांबा जुना होता. त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यावरील पत्रा गायब झाला आहे.
नवभूमी मित्र मंडळ, बधाई चौक, शांतिबन, आशिष गार्डन, कुमार परिसर येथील बस थांबे आता वाहने लावण्याच्या सोयीसाठी वापरले जातात.
प्रतीक नगर येथे बस थांब्यावर शेडची गरज आहे मात्र तेथे शेड उभारलेली नाही. अण्णाभाऊ साठे चौक, आनंदनगर येथे अगोदर अस्तित्वात असलेल्या बसथांब्याच्या मागे आणखी एक थांबा शेड उभारलेली आहे.
महापालिकेकडे बस थांबा उभारण्यासाठी कोणताही निधी उपलब्ध नाही. माननीयांच्या विकास निधीतून बस थांबे उभारले जातात. आता बीओटी तत्त्वावर काही बसथांबे उभारले आहेत. त्याबदल्यात संबंधितांना तेथे जाहिरातीतून उत्पन्न मिळवता येते.
- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी
प्रतीक नगर येथे कोथरूड डेपो कडे जाणाऱ्या पीएमपीच्या बस थांबतात. मात्र येथे थांब्याची शेड नसल्याने पावसात रस्त्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागते. वारंवार मागणी करूनही येथे बस थांबा शेड उभारलेली नाही. जेथे आवश्यकता नाही तेथे बस थांबे उभारले जातात.
- महेश मालपुरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.