
आदिवासी विद्यार्थ्यांना आज स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
फुलवडे ता. ६ : निगडाळे (ता. आंबेगाव) येथील सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई ऍडव्हान्स, स्पर्धा परिक्षा, यांच्यासह इतर परिक्षांबाबत मोफत मार्गदर्शन शनिवारी (ता. ७) दुपारी १२ वाजता पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार असल्याची माहिती संचालक सीताराम जोशी यांनी दिली.
अनुसूचित क्षेत्रात उच्च शिक्षण क्षेत्रातील संधी व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परिक्षांविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. ग्रामीण दुर्गम भागातील ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने फिटजी लिमिटेड यांच्या सहकार्याने आश्रमशाळेतील आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी गणित, पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र या विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गुणवान आदिवासी विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत आयआयटी प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाबरोबरच शासकीय निधीची बचत होण्यास हातभार लागणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.