
हिरड्याची नोंद ७/१२ वर करून घ्या : डामसे
फुलवडे, ता. २१ : "जमिनीवरील हिरड्याची झाडे ७/१२ वर लावली नाही तर वेचलेला हिरडा वनविभागातून गोळा केलाय असे राज्य सरकार ठरवत आहे. याकरिता आपल्या झाडांची नोंद वेळेत ७/१२ वर करून घ्या,'''' असे आवाहन आदिवासी भागातील शेतकऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते बुधाजी डामसे यांनी केले आहे.
आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचे साधन हिरडा पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात ५०० टनापेक्षा जास्त हिरडा उत्पादन होत आहे. तो विकायचा कसा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. १० किलोमीटर वरुन बाजारात १०० किलो हिरडा आणायचा झाला तर वाहन चालकाला पास घेणे गरजेचे असल्याने खासगी वाहनचालक हिरडा वाहतूक करणे टाळतात. तसेच व्यापारी गावात आले नाही. तर या हिरड्याची करायचे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे आदिवासींचे एकमेव आर्थिक उत्पादन धोक्यात आले आहे.
हिरडा वाहतूक करण्यास परवाना देण्याचा अधिकार देखील ग्रामसभेला आहे. त्याप्रमाणे ठराव करुन घ्या. स्वतःच्या मालकीचा हिरडा विकण्यास कायद्यानुसार परवानगीची गरजच नाही. परंतु वनविभागाकडून आडवणूक होत आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतकरी डोक्यावर जेवढा हिरडा घेऊन जाईल. तेवढाच हिरडा विक्री करता येईल. गाडीने हिरडा वाहतुकीस पास घ्यावा लागेल. हिरडा हे शेती पिकासारखेच गणले जाऊन त्याला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी पेसा कायद्याचा अभ्यास करुन अधिकाऱ्यांशी वेळेत चर्चा करावी लागणार आहे. हिरडा हे गौणवनउपजमधून काढून टाकण्याकरिता सर्वांनी एकत्र येऊन पाठपुरावा करणे अत्यंत गरजेचे आहे.
- बुधाजी डामसे, सामाजिक कार्यकर्ते
01911