
अखेर ग्रामस्थांनीच घेतला श्रमदानातून रस्ता दुरुस्तीचा निर्णय
फुलवडे ता. २६ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथील मोहरेवाडी फाटा ते बरकीदरा या तीन किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच हा रस्ता श्रमदानातून दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवारी (ता.२५) सकाळी या कामास सुरुवात झाली.
सन २००४-०५ मध्ये जिल्हा परिषद निधीतून हा रस्ता तयार केला होता. परंतु रस्ता होऊन बरीच वर्षे उलटल्याने रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून खडी इतरत्र पसरून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा जिल्हा परिषदेला निवेदने देऊनही हा रस्ता दुरुस्त होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी श्रमदानातून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी समस्त ग्रामस्थ, सह्याद्री आदिवासी नोकरदार मंडळ व लयभारी महिला ग्रुप यांनी पुढाकार घेऊन गावातील दानशूर व्यक्तींकडून रस्त्यासाठी लागणारे खडी, मुरूम, पाण्याचा टँकर, जेसीबीचे भाडे, तसेच जमेल तशी आर्थिक मदत मिळवून रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी जेसीबीने मुरूम काढून तीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने ३० ट्रॉली मुरूम तीन किलोमीटर रस्त्यावर पसरवून, त्यावर १० टँकर पाणी टाकून त्यावर रोलर फिरविण्यात आला. श्रमदानासाठी गावातील पुरुष, महिला, युवक व युवती सहभागी झाल्या होत्या. मदत ही फक्त पैशांच्या स्वरूपात नसते, तर ती वस्तू, ज्ञान, मार्गदर्शन, सहकार्यातून व श्रमदानातूनही समाजसेवेचा आनंद घेता येतो, हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.