धोकादायक ठिकाणे

धोकादायक ठिकाणे

फुलवडे, ता. ५ ः आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भाग सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आहे. पावसाळ्यातील चार महिने या भागात मुसळधार पाऊस पडत असतो. निसर्गसौंदर्यामुळे पावसाळ्यामध्ये भीमाशंकर अभयारण्य, परिसरातील अनेक धबधबे, घाटरस्ते तसेच डिंभे धरण याठिकाणी अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत असते. अशा ठिकाणी पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यासारख्या घटना घटत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी सतर्क राहून सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेणे अपेक्षित आहे.

धबधबे : कोंढवळ, पाटण, आहुपे, कुशिरे बुद्रुक, बोरघर, फुलवडे या भागात लहानमोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पावसाळ्यात ह्या धबधब्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत असतो. अशावेळी तेथील ओल्या खडकावरून पाय घसरून पडून वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

घाट रस्ते : पोखरी, शिडी घाट, गणपती घाट (भीमाशंकर) बैलघाट, तवली, सिद्धगड (आहुपे), नारिवली घाट, डोणीदरा (डोण), पश्चिम आदिवासी भागातील पोखरी घाट वगळता इतर सर्व घाट हे अरुंद व नागमोडी वळणावळणांचे आहेत. याठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडतात. पावसाळ्यात धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडण्याची शक्यता असते.

डिंभे धरण : डिंभे धरणाच्या भिंतीच्या परिसरात तसेच धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या प्रवाहात अतिउत्साही पर्यटक उतरत असतात. धरण पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूच्या किनाऱ्यालगतच्या रिंगरोडला काही ठिकाणी संरक्षक कठडा नसल्याने सेल्फी काढणारे हौशी पर्यटक तसेच वाहनांना अंदाज येत नसल्याने अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत.


उपाययोजना :
पर्यटकांनी पर्यटन करताना अत्यावश्यक सेवेचे फोन नंबर सोबत ठेवावेत.
प्रशासनाने धोकादायक ठिकाणी फलक लावावेत.
पोलिसांचा नियमितपणे बंदोबस्त व गस्ती पथक कार्यरत असावे.
पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी सहकार्य करावे.


भीमाशंकर अभयारण्यात पावसाळ्यात कोंढवळ धबधबा व निसरड्या पायवाटा व कड्याचा भाग आहे. याठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये. कोंढवळ धबधब्याच्या ठिकाणी दिवस व रात्रपाळीसाठी रखवालदार ठेवला आहे. कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास वनविभागाच्या महाराष्ट्र वनविभाग टोल फ्री क्रमांक १९२६ या नंबरवर संपर्क साधावा.
- वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य क्र. १.

पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी नको ते धाडस करू नये. उनाडक्या करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे गस्त पथक कार्यरत राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांवर कडक कारवाई करू.संपर्क क्रमांक : ८४०८८८००००.
- किरण भालेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, घोडेगाव, (ता. आंबेगाव)

पर्यटकांनी पर्यटन करताना महत्वाचे फोन नंबरजवळ ठेवावेत, तसेच स्थानिक ग्रामस्थांची मदत घ्यावी. काही अनुचित घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करावा.
- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, जुन्नर-आंबेगाव.
-------------------------------------------------------------------
महत्वाचे फोन नंबर -
- आपत्ती व्यवस्थापन कक्ष तहसील कार्यालय आंबेगाव - ०२१३३-२४४२१४
- घोडेगाव पोलिस ठाणे - ०२१३३-२४४१३३
- निसर्ग साहस संस्था - ९७६६३३३१११

(डिंभे धरणाचे फोटो संग्रहित आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com