पुणे
फुलवड्यात बैलगाडा मालक, शौकिनांचा उत्साह
फुलवडे ता. २२ : फुलवडे (ता. आंबेगाव) येथे पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यात आला. यावेळी मुक्या मित्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
बैलपोळ्या निमित्त परिसरातील बैलजोड्यांची संध्याकाळी मोठ्या उत्साहात वाजतगाजत परंपरागत पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत बैलगाडा शर्यतीचे बैल तसेच पारंपरिक मशागती करणारे बैल सहभागी झाले होते. तसेच बैलगाडा मालक, कार्यकर्ते, शौकीन, तरुण यांचा मोठा उत्साह पहायला मिळाला. बैलगाडा मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याचा वापर झाला.
दिवसेंदिवस शेती मशागतीचे तंत्र बदलत चालले आहे. ट्रॅक्टर अवजारे यांचा वापर वाढला आहे. तरी देखील आजही शेतकऱ्यांचा मनात बैलांचे स्थान अबाधित असल्याचे दिसून येते. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना सजवून, पूजा करून आणि मिरवणूक काढून आपली कृतज्ञता व्यक्त करतात.