‘विमानतळाच्या प्रकल्पाने अजून किती बळी घेणार’

‘विमानतळाच्या प्रकल्पाने 
अजून किती बळी घेणार’
Published on

पारगाव मेमाणे, ता. १८ : ‘विमानतळाच्या प्रकल्पाने घेतलेला हा दुसरा बळी आहे. अजून किती बळी घेणार आहात? तातडीने प्रकल्प रद्द करा, अन्यथा यापुढे अशी घटना घडल्यास मृतदेह शासनाच्या दारात आणून ठेवले जातील,’ असा इशारा विमानतळ विरोधी आंदोलकांनी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे दिली.
आंदोलनातील धडाडीचे आंदोलक वामन वसंत मेमाणे यांचे ड्रोन सर्वेच्या धास्तीने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांची अंत्ययात्रा थांबवून शोकसभा घेण्यात आली, तेव्हा शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. ‘शासन व राज्यकर्त्यांना रयतेपेक्षा विमानतळासारखे प्रकल्प महत्त्वाचे आहेत. शेतकरी मेला तरी चालेल, मात्र प्रकल्प झालेच पाहिजेत. विविध प्रकारे विरोध करूनही शासन पुरंदर विमानतळाची प्रक्रिया थांबवत नाही. विमानतळ झाले तर आपले जगण्याचे साधन जाईल, या धास्तीने बाधित सात गावांतील अनेक वयस्कर शेतकरी भयग्रस्त आहेत. त्यांना वाली उरला नाही. यापुढे अशा प्रकारच्या होणाऱ्या दुर्दैवी घटनांची जबाबदारी शासनाने घ्यावी. वामनदादांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, लढा तीव्र केला जाईल,’ अशा प्रकारची मनोगते ग्रामस्थांनी व्यक्त केली.
तसेच, ‘चार-पाच ड्रोनद्वारे रात्रीचा सर्वे केला जात आहे, अशी अफवेची चर्चा ऐकून वामन मेमाणे चिंताग्रस्त होते. त्याची धास्ती घेतली होती. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी विमानतळाचा सर्वे करू नका,’ अशी आंदोलकांची मागणी आहे.

अशा प्रकारचा सर्वे सुरू नाही. रीतसर नोटीस देऊनच सर्वे केला जातो. क्षेत्रातील सर्व घटकांचे निरीक्षण व्हावे म्हणून दिवसाच सर्वे होतो. रात्री होतच नसतो. वस्तुस्थिती आणि अफवा समजावून घ्याव्यात.
- वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com