सासवड - सुपे रस्त्याची चाळण

सासवड - सुपे रस्त्याची चाळण

Published on

पारगाव मेमाणे, ता. २२ : पुरंदर तालुक्याचा पूर्व भाग मुख्य बाजारपेठेला जोडणारा, अत्यंत महत्त्वाचा सासवड- पारगाव मेमाणे- सुपे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
मुळचा सुस्थितीत असलेला रस्ता उखडून टाकायचा, सापडेल तशी माती, राडारोडा रस्त्यावर टाकायचा व रस्त्याच्या बाजूची वेळखाऊ, तातडीची गरज नसलेल्या कठड्याची बांधकामे करायची, असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकरी, नागरिक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नियोजन व इच्छाशक्तीच्या अभावामुळे ठेकेदार काम सुरू करत नाही, तर शासकीय यंत्रणा ढिम्म हलत नाहीत. दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दोन महिन्यापूर्वी पारगाव गावठाण ते खानवडी, फुलेपाटी पर्यंतचा सुस्थितीतील रस्ता नवीन कामासाठी उखडून टाकला आहे. उपलब्ध माती रस्त्यावर पांगविण्यात आली. सततचा पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर राडारोडा पसरला आहे. त्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
याच रस्त्यावर काही दिवसापूर्वी पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नलिका टाकण्यात येत होत्या. दक्षता फलक नसल्याने व अडसर निर्माण न केल्याने एका परप्रांतीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

कुणी न्याय देता का न्याय?
पुरंदरचे विमानतळासाठी जमिनीची संमती मिळवणे ही जिल्हा शासनासाठी ‘टॉप प्रायोरिटी’ आहे. असंख्य अधिकारी या रस्त्याने ये- जा करतात. सुमारे ३५० कोटी रुपये खर्च होणाऱ्या एमएसआयडीसीच्या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल चकार शब्दही बोलत नाहीत. अनेक तक्रारी करून ठेकेदार काम सुरू करत नाही. त्यामुळे ‘कुणी न्याय देता का न्याय’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

गौण खनिजाचा प्रचंड तुटवडा आहे. त्यातच रॉयल्टी परवानगी, क्षेत्र धारकांच्या परवानगीसाठी वेळ लागत आहे. याबाबत प्रयत्न सुरू असून, दसरा दिवाळीनंतर सर्व सामग्रीनुसार, सर्व शक्तीने यंत्रणा राबवली जाणार आहे. डिसेंबरपूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सर्व स्तरावरून सहकार्य अपेक्षित आहे.
- रोहिदास पिसाळ, ठेकेदारांचे मुख्य समन्वयक

00716

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com