
वाहतूक नियमभंग कूरूनही दंड भरेना कोणी
पिंपरी, ता. ८ : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या वर्षात सुमारे सहा लाख वाहनचालकांना ४९ कोटी दंड केला आहे. त्यापैकी तब्बल साडेपाच लाख जणांकडे ४५ कोटी बाकी आहे. यातील १ हजार १६३ जणांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत. दंड भरण्यासाठी नोटिसा बजावण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस प्रशासनाने दिली.
वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होत आहे. नियम मोडणाऱ्यांना रस्त्यात थांबवले जात नाही. नियमभंग करणाऱ्या वाहनाचा फोटो ॲपमध्ये टिपला जातो. त्यावरूनच थेट वाहन मालकाच्या नावाने दंडाचे ई-चलन पाठविले जाते. मात्र, बहुतांश वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याचे काम केले जाते. दंड भरण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतही व्यवस्था केली आहे. ई-चलन आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडे या दंडाचा भरणा करता येतो. लोकअदालतीच्या माध्यमातून समजपत्र येते. काही वाहनचालकांना या लिंकद्वारे मेसेज येतो त्याद्वारे https://sama.live/mnotice.php?caseid पुढे वाहन नंबर टाकल्यास दंड भरण्याची सोय आहे.
--
..अन्यथा न्यायालयीन प्रक्रिया
पोलिसांकडून इ- चलनव्दारे दंडाची नोटीस पाठविली जाते. तो वेळेत न भरल्यास हे प्रकरण न्यायालयात दाखल केले जाते. तेथे तडजोडीतून दंड भरता येतो. दंडात्मक कारवाईसह काही वाहनचालकांवर खटले दाखल केले आहेत. दंड चुकीच्या पद्धतीने आकारला गेल्याचे वाटत असल्यास त्याविषयी तक्रार देण्याची सोयही ऑनलाइन उपलब्ध आहे.
---
दंड वेळेत भरणे आवश्यक आहे. अनेकांना मेसेज जाऊनही पैसे भरले जात नाहीत. ई- चलन न भरणाऱ्यां विरोधात न्यायालयाकडे खटले पाठविले जात आहेत. तिथे कारवाई देखील होऊ शकते.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा
---
वर्षभरातील तक्ता
- दंड ः ५ लाख ९८ हजार ६५ जणांना ४८ कोटी ७४ लाख ६२ हजार ३०० रुपये
- भरणा ः ४४ हजार १११ जणांकडून तीन कोटी सात लाख ४२ हजार ६०० रुपये
- बाकी ः ५ लाख ५२ हजार ७९१ जणांकडे ४५ कोटी ६७ लाख १९ हजार ७०० रुपये बाकी
- खटले ः १ हजार १६३ जणांवर न्यायालयात खटले दाखल