
नागरिकांच्या प्रतिक्रिया
चिंचवडला भाजपला आत्मचिंतनाची गरज
पोट निवडणुकीचा निकाल ही भाजपसाठी पुढील वर्षी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी धोक्याची घंटा आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठमधील पराभव व चिंचवडमध्ये राष्ट्रवादीमधील बंडखोरीमुळे झालेला भाजपचा विजय यामुळे निश्चितच भाजपला आत्मचिंतन करण्याची वेळ आणली आहे. या निकालामुळे पुढील वर्षी येणाऱ्या दोन्ही निवडणुका व यावर्षी अनेक महापालिकेच्या निवडणुका भाजपला सोप्या नसणार हे निश्चित आहे. तरीही, भाजपने वेळेत सावध होऊन आवश्यक ते पावले उचलण्याची गरज आहे यात शंका नाही.
- विवेक मैत्र, चिंचवड
--
कसबा म्हणजे पक्षाच्या विचारसरणीला छेद
पोटनिवडणूक लागल्यापासून मी याचे अपडेट घेत होतो. त्यावेळी सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया, ग्राउंड रियालिटी जाणून घेतल्यावर असे लक्षात आले की, कागदावर ही निवडणूक जरी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असली तरी प्रत्यक्षात ती तशी नव्हती. सुरवातीला जसे रंग भरले ब्राह्मण विरुद्ध बहुजन तशीही नव्हती, ना दोन मतप्रवाहांची तर, ही निवडणूक होती प्रस्थापित एका विशिष्ट गटाची. ज्याने ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. जात-धर्म पुढे केला त्या विरुद्ध होते सर्वसामान्यांचे प्रश्न. कसब्याचा न झालेला विकास आणि याचे नेतृत्व करत होते रवींद्र धंगेकर. साधारण विधानसभेची निवडणूक पक्षाच्या विचारसरणीवर लढली जाते, पण कसब्यात तसे झाले नाही, भाजपची वैचारिक बैठक विरुद्ध एक सामान्यांचा प्रतिनिधी अर्थातच त्याला महाविकास आघाडीची साथ होती, पण धंगेकरांची प्रतिमा भाजपाच्या कसब्यातील प्रतिष्ठेला छेदून पुढे गेली. भाजपने जो समज निर्माण केला होता की, नाना पेठ, सदाशिव पेठ म्हणजे फक्त भाजप. त्यावर धंगेकरांच्या चांगला माणूस आपला माणूस या प्रतिमेने नक्कीच मात केली. आणि या भागातून सुद्धा त्यांना मताधिक्य मिळाले.
- राजेश घेरडे, आयटी अभियंता