
भर उन्हाळ्यात सहाच तरण तलाव सुरू
पिंपरी, ता. ४ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३ तरण तलाव आहेत. त्यापैकी केवळ सहा सुरू आहेत. उर्वरित सात तलाव दुरुस्ती सुरू आहे या कारणास्तव बंद केले आहेत. ऐन उन्हाळा व सुट्टीचा कालावधी असूनही घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
फेब्रुवारी मध्यापासून तापमान वाढ झाली आहे. या महिन्यापासून उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पोहायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. महापालिकेच्या तलावावर एक तासासाठी दहा रुपये शुल्क आहे. तसेच वयोगटानुसार तिमाहीसाठी २०० रुपये, सहामाहीसाठी ३५०, तर वार्षिक ५०० रुपयांपर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या तलावावर प्रचंड गर्दी असते. मात्र, नियोजन नसल्यामुळे उन्हाळी सुट्टी सुरू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला असूनही सात तलाव बंद आहेत.
वडमुखवाडी येथील तलाव नवीन असल्याने विविध अडचणी येत आहेत. पाणी १५ लाख लिटर लागत आहे. गळती रोखण्यासाठीचे काम केले जात आहे. त्यामुळे आठवडाभरात तो सुरू होईल. नेहरूनगर येथील तलाव येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. ऑनलाइनव्दारे आरक्षण दिले जात आहे. पासची सुविधाही ऑनलाइन केली जाणार आहे. प्रत्येक तलावावर एकावेळी ८० जणांना प्रवेश देण्याचे नियोजन आहे, असे क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले
--
पोहण्यासाठी ऑनलाइन आरक्षण
https://www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावर जलतरण तलाव ऑनलाइन नोंदणीची ‘लिंक’ दिली आली आहे. त्यावर माहिती भरून आरक्षण करता येणार आहे.
--
सुरू ःचिंचवड केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर आणि पिंपळे गुरव
बंद ः भोसरी, मोहननगर, सांगवी, थेरगाव, आकुर्डी
बंदची कारणे ः खोली कमी करणे, गळती रोखणे यासाठी स्थापत्य विषयक कामे सुरू