
गुनाटमध्ये ऊसतोडताना बछड्यांचे दर्शन
गुनाट, ता. १८ : गुनाट (ता. शिरूर) येथील शेतकरी विठ्ठल करपे यांच्या शेतात उसाची तोड चालू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. गुनाट येथील माजी उपसरपंच रमेश गाडे यांच्यावर सोमवार (ता. १६) बिबट्याने केलेल्या हल्ल्यानंतर बिबट्याचे बछडे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सध्या गुनाट परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजवर तीन बिबट्यांना पकडण्यात वनविभागाला यश आले आले. मात्र, बिबट्यांची संख्या जास्त व पिंजरे कमी असल्याने सातत्याने शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम असल्याने बिबट्याला सातत्याने आपले ठिकाण बदलावे लागत आहे. त्यामुळेच दिवसाढवळ्याही बिबट्या शेतकऱ्यांना दर्शन देत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या भयभीत झाले आहेत.
दरम्यान, करपे यांच्या शेतात उसाची तोड चालू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. याबाबत माहिती दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तातडीने हजर झाले. त्यांनी कामगारांना ऊसतोड थांबवण्याच्या सुचना दिल्या.