Electricity Connection : पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा 3000 farmers electricity connection waiting in pune district | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electrical connection
जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

Electricity Connection : पुणे जिल्ह्यात ३ हजार शेतकऱ्यांना वीज जोडणीची प्रतिक्षा

पुणे - पुणे जिल्ह्यातील २ हजार ९६० शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या कृषिपंपासाठी विजेची जोडणी मिळू शकलेली नाही. यामध्ये चालू वर्षातील मागणी असून त्यात आणखी १४ हजार ७२० शेतकऱ्यांच्या मागणीची भर पडणार आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२३-२४) १७ हजार ६८० शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी किमान आणखी वर्षभर प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, प्रलंबित वीज जोडण्या देण्यासाठी महावितरण कंपनीने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार ३१ मार्च २०२४पर्यंत सर्व प्रलंबित जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महावितरण कंपनीच्यावतीने जिल्ह्यातील खरीप हंगाम आढावा बैठकीत हा कृती आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यात त्यांनी गेल्या वर्षभरातील कृषी पंपासाठीच्या वीज जोडण्यांची एकूण मागणी, त्यापैकी अनामत रक्कम भरून झालेले प्रस्ताव, अनामत रक्कम भरलेल्यांपैकी प्रत्यक्षात देण्यात आलेल्या वीज जोडण्या, प्रलंबित वीज जोडण्या, चालू वर्षातील संभाव्य मागणी आणि या सर्व शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यासाठीचे संभाव्य नियोजन आदींची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात पुणे आणि बारामती अशी दोन ग्रामीण वीज मंडळे कार्यरत आहेत. यापैकी पुणे ग्रामीण मंडळात आंबेगाव, जुन्‍नर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, वेल्हे आणि भोर तालुक्याचा काही भाग असे हे आठ तर, बारामती ग्रामीण मंडळात बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे पाच आणि भोर तालुक्याचा काही भाग येतो. या दोन्ही मंडळात मिळून १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ६ हजार ८१३ शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठीची अनामत रक्कम भरली होती. त्याआधीचे १७ हजार ९५१ वीज जोडणी प्रस्ताव प्रलंबित होते. यानुसार ३१ मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण २४ हजार ७६४ जोडण्या प्रलंबित होत्या. यापैकी २१ हजार ८०४ जोडण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याचे या कृती आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

कृषिपंप वीज जोडण्यांची सद्यःस्थिती

- गेल्या वर्षभरात दिलेल्या एकूण वीज जोडण्या - २१ हजार ८०४

- ३१ मार्च २०२३ अखेर प्रलंबित जोडण्या - २९६०

- चालू वर्षातील संभाव्य मागणी संख्या - १४ हजार ७२०

- चालू वर्षातील एकूण मागणी - १७ हजार ६८०

वीज जोडण्यांचे संभाव्य नियोजन

- एप्रिल ते जून २०२३ पर्यंत - ४ हजार ६९२

- १ जून ते सप्टेंबर २०२३ अखेरपर्यंत - ४ हजार २४८

- १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत - ४ हजार १२१

- १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत - ४ हजार ६०७

- वीज जोडण्या करण्यासाठी आवश्‍यक निधी - ९६ कोटी ६५ लाख रुपये