माउलींना साश्रू नयनांनी निरोप

माउलींना साश्रू नयनांनी निरोप

गुळुंचे, ता. १८ : ‘माऊली...माऊली...’ ‘ज्ञानराज माउली तुकाराम...’ ‘विठ्ठल...विठ्ठल’च्या जयघोषात नीरा (ता. पुरंदर) येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या रथसोहळ्याचे आगमन झाले. नीरेकरांनी मोठ्या श्रद्धेने उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. सोहळा दुपारचा विसावा आटोपून सातारा जिल्ह्यात मार्गस्थ झाला. आपल्या लाडक्या माउलींना निरोप देताना नीरेकरांचे डोळे पाणावले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी साडेदहा वाजता लाखो वारकऱ्यांसह नीरेत दाखल झाला. भगव्या पताका, फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान माउलींच्या पादुका, पुढे मागे सेवेकरी, अशा थाटामाटातील शाही सोहळ्याचे स्वागत येथील शिवाजी चौकात ग्रामपंचायतीसमोर केले. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
तत्पूर्वी पहाटे सहा वाजता वाल्हे गावचा मुक्काम आटोपून सोहळ्याने पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण केले. सकाळी नऊ वाजता होळकर विहिरीवर न्याहरी घेण्यात आली. १० वाजता पिंपरे येथे भाविकांना दर्शनासाठी पालखी थोडा वेळ थांबविण्यात आली. साडेदहाच्या सुमारास पालखी सोहळ्याने नीरा नगरीत प्रवेश केला. ११ वाजता सोहळा नदीकाठावरील पालखीतळावर विसावला. त्यानंतर नीरा परिसरातील जेऊर, मांडकी, पिंपरे, निंबूत, पाडेगाव, सोमेश्वरनगर, वाघळवाडी अशा पुरंदर, बारामती, फलटण, खंडाळा तालुक्यातील हजारो भाविकांनी रांगा लावून माउलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

दरम्यान, सकाळपासूनच नीरा येथे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. येथील नागरिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान केले. काही संस्थांनी वारकऱ्यांसाठी बिस्कीट, राजगिरा चिक्की, फळे, मिठाई वाटप केले. शहरात सर्वच लोकांनी जमेल त्या पद्धतीने अन्नदान केले.

पालखी सोहळ्याला पुणे जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, आरोग्य उपसंचालक राधाकृष्ण पवार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, दत्ताजी चव्हाण, राजेश चव्हाण, दीपक काकडे व नीरेकरांच्या उपस्थितीत सोहळ्यास नीरास्नानानंतर निरोप देण्यात आला.


झाडे काढल्याने उन्हाचा त्रास
दरवर्षी वारीदरम्यान पावसाच्या सरी बरसात. त्यामुळे वारकऱ्यांना थोडा तरी दिलासा मिळत असतो. यंदा मात्र वारीला सुरवात झाल्यापासून वरुणराजा बरसलाच नाही. उन्हाचा चटका मात्र दिवसेंदिवस वाढत होता. वाढत्या उन्हाचा त्रास वारकऱ्यांना जाणवला. त्यात जेजुरी ते नीरादरम्यान रस्त्याच्या कामात अनेक झाडे काढण्यात आली आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना पायी वारीत सावली देखील मिळाली नाही.

WHL23B01638

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com