जिजामाता रुग्णालयात पैशांचा अपहार

जिजामाता रुग्णालयात पैशांचा अपहार

पिंपरी, ता. ३ ः महापालिकेच्या पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात सुमारे नऊ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस समितीने केला आहे. रुग्णालयातील भरणा रजिस्टरमध्ये नोंद केलेली रक्कम व बॅंकेत भरणा केलेल्या रकमेत मोठी तफावत असल्याने भ्रष्टाचार झाल्याचे माहिती अधिकारात पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणीही समितीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नऊ लाखांचा हिशेब लागेना?
एक मार्च ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान जिजामाता रुग्णालयातील भरणा रजिस्टरमधील जमा रक्कम व बॅंकेत भरलेली रक्कम याची माहिती पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस समितीने माहिती अधिकारामार्फत मागविली. मिळालेल्या माहितीत दोन महिन्यांमध्ये भरणा रजिस्टरमध्ये जमा झालेली रक्कम तब्बल १८ लाख ६६ हजार ३५६ होती. मात्र प्रत्यक्ष बॅंकेत भरणा झालेली रक्कम आठ लाख ७९ हजार ६६५ एवढी आहे. त्यामुळे उर्वरित आठ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप समितीच्या शहराध्यक्षा सायली नढे यांनी केला आहे.

११ दिवसांच्या भरण्याची नोंदच नाही ः
महापालिकेच्या आठ रुग्णालयांत दररोज रुग्णांकडून जमा होणाऱ्या रकमेचा त्याच दिवशी बॅंकेत भरणा होणे गरजेचे आहे. दररोज संबंधित बॅंकेचे कर्मचारी रक्कम गोळा करण्यासाठी येतात. मात्र अनेकदा रुग्णालयाकडे जमा झालेली रक्कम व बॅंकेकडे भरलेली रक्कम यात तफावत दिसून येत आहे. जिजामाता रुग्णालयात एक मार्च ते ११ मार्चदरम्यान भरणा रजिस्टरवर जमा झालेली रक्कम बॅंकेत जमा केल्याचे चलनच उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले आहे. मात्र उशिरा भरणा करूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यावर सह्या केल्या कशा हा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘‘जिजामाता रुग्णालयात जमा होणाऱ्या रकमेचा भरणा करण्यात अनियमितता दिसून आली आहे. तसेच ३० मार्च ते ३० एप्रिलदरम्यान जमा झालेल्या रकमेचा भरणाही लिपिकाने केलेला नाही. तरीही बॅंकेच्या चलनांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सह्या आहेत. भरणा झाला नसल्याची माहिती बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनीही महापालिका अधिकाऱ्यांना दिलेली नाही. या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.’’
- सायली नढे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महिला काँग्रेस समिती

‘‘या आधीही रुग्णालयातील गैरप्रकार पुढे आले होते. त्यावेळीही एकाच कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याही गैरप्रकाराची तक्रार आम्ही महापालिका आयुक्तांकडे केलेली आहे. यामध्ये जे दोषी असतील, त्या सर्वांवर कारवाई व्हावी. रुग्णालयाचे ऑडिट केले जावे.’’
- निगार बारस्कर, प्रवक्त्या, पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस समिती

‘‘माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारदारांनी मागणी केल्याप्रमाणे रुग्णालयाचे ऑडिट केले जाईल. चौकशीसाठी समिती नेमून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल.’’
- शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com