तपस्विनी सुहासिनी...

तपस्विनी सुहासिनी...

तपस्विनी सुहासिनी...

सुहासिनीताईंचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील करमळी येथे झाला. त्यांना ३ भाऊ, आई-वडील, त्या आणि एक आत्या. भिक्षुकी करून सर्वांचा उदरनिर्वाह चालत असे. खडतर परिस्थितीतून घडलेल्या सुहासिनीताई आठलेकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले. त्यांच्या कार्याचा आढावा...
-सिंधूताई अंबिके, सासवड

खेडोपाडी गावागावात त्याकाळी चरखा केंद्रे, सूतकताई चालत असे. चार महिने शिक्षणानंतर त्यांनी ग्रामसेविका कोर्स केला आणि १ जून १९५९ला कस्तुरबा गांधी ट्रस्टमध्ये प्रवेश घेतला. त्यांना सुतगुंड्यांचे २०रुपये मिळाले. ते घेऊन एकट्याच त्या सासवडला आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात बालवाडीचे दोन वर्षे काम केले. तसेच थोडे दिवस विनोबांच्या बरोबर शांतीसेनेमध्ये काम केले. त्यानंतर बिहारमध्ये काम केले तसेच त्यांनी बालसदने चालविली. त्यांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे.
मेळघाटातील आरोग्य केंद्राचे काम हे त्यांच्या कार्याचा सुवर्ण कळस होय. गोंडवानी (ता. धारणी) येथे कस्तुरबा ट्रस्टचे १९५०मध्ये आरोग्य केंद्र स्थापन झाले. त्याकाळी सर्व समाज अंधश्रद्धेने ग्रासलेला, अंगारे धुपारे, जादूटोणा या सर्वांतून जागृत होऊन त्यांनी आरोग्य केंद्रात येऊन डॉक्टर तपासणी करून औषधोपचार करावेत यासाठी हे केंद्र सुरू झाले. सुहासिनीताईंनी १९८०मध्ये हे आरोग्य केंद्र चालवले. त्यांचा नर्सिंगचा कोर्स झालेला असल्यामुळे प्रमुख प्रतिनिधी शोभनाताई रानडे यांनी त्यांची या आरोग्य केंद्रावर नेमणूक केली. पण या भागातील समाजाचा भगतावर विश्वास. त्याने मंतरलेले पाणी दिले की रोग बरा होतो ही त्यांची श्रद्धा. भगताला दारूच्या बाटल्या द्यायच्या. डोके दुखत असेल तर तापलेल्या सळीने डाग द्यायचा. पण आरोग्य केंद्रावर कोणी येत नसत.
सुहासिनीताई गावोगावी जाऊन सांगायच्या तुम्ही केंद्रावर या तिथे तपासणी करून तुम्हाला औषधपाणी करू. भगत आजार बरा करत नाही. प्रथम सुहासिनीताई कोणी रुग्ण आलाच तर एकट्याच सर्व करायच्या. तपासणी, त्यांची नोंद, औषधाच्या पुड्या बांधायच्या. मग पुढे त्यांच्या मदतीला एक मदतनीस नेमली. तिला सर्व त्यांनी शिकवले. कारण हळूहळू रुग्णांची रीघ लागू लागली. अगदी सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत दवाखाना सुरू असे. एकेक दिवशी १०० रुग्ण यायचे. चहा, अंघोळ, जेवण करायला वेळच मिळायचा नाही.
एक दिवस एक आजोबा नातवाला घेऊन आले. त्याला खूप ताप होता. ते आजोबा म्हणाले, याला बर कर. सुहासिनीताईंनी ताप पाहिला. कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. इंजेक्शन दिले. औषधाचा डोस पाजला आणि म्हणाल्या आजोबा आज त्याला इथेच राहूदे. थोड्या वेळाने त्याचा ताप उतरला, घाम आला. तो ताईंनी पुसून त्याला पेज पाजली. त्याला झोप लागली. संध्याकाळी तो बरा झाला. संध्याकाळी आजोबा आले. नातू बरा झाला हे पाहू खूप खूष झाले आणि त्यांनी प्रचार केला. दुसऱ्या दिवसापासून रुग्णांची रीघ लागली. दहा, बारा, पंधरा किलोमीटरवरचे रुग्ण येऊ लागले. फुकट घेण्याची त्यांना सवय लागू नये. नाहीतरी ते दारू, कोंबडा, बळी खर्च करतातच म्हणून २ रुपये घ्यायचे ठरले आणि ती रक्कम केंद्रात जमा करायचे ठरले. कारण केंद्राकडूनच गोळ्या, इंजेक्शन मिळत असे. लांबचे रुग्ण धमण्यातून आणत. धमनी म्हणजे एक बैलाची गाडी. त्यात फक्त दोन माणसे बसत.
सुहासिनीताई पाच-सहा किलोमीटर चालत जाऊन त्या बाळंतपण करायच्या. पण १५-२० किलोमीटरवर लांबची बाई असेल तर ती मंडळी धमनी घेऊनच ताईंना घ्यायला यायची.
एकदा एक बाई बाळंतपणात अडली. मूल पोटातच मेले होते आणि त्याचा हात बाहेर आलेला. त्यांची सुईण घाबरली. त्या बाईचा नवरा रात्री २ वाजता ताईंना न्यायला आला. अंधारी रात्र, रस्ता नीट नाही, पावसाची रिमझीम प्रचंड वारा सुटलेला अशा परिस्थितीत ताई गेल्या. तिची सुटका केली. अशा अवघड बाळंतपणाचा हॉस्पिटलला तीन-चार लाख रुपये खर्च आला असता. तेव्हापासून या सर्व समाजाची ताईंवर जास्त श्रद्धा बसली.
सुहासिनीताई आणि शेवंताताई कस्तुरबांच्या फोटोपुढे नतमस्तक झाल्या आणि म्हणाल्या, ‘‘बा तुम्हीच आम्हाला ही शक्ती दिली.’’ आज सुहासिनीताईंचे वय ८८ आहे. तरी त्या सफाई, झाडझूड, झाडांना पाणी घालणं ही कामे करतात. त्या मातेला माझे शतशः प्रणाम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com