बारामती, शिरुरमध्ये तुतारी की घड्याळ?

बारामती, शिरुरमध्ये तुतारी की घड्याळ?

पुणे, ता. ३ ः पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) केली जाणार आहे. यानुसार शिरूर लोकसभेची मतमोजणी शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तर, बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पुणे शहरात होणार आहे. या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये कॉँटे की टक्कर अशी मोठी चुरशीची निवडणूक झाली आहे. त्यामुळे शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजणार की, घड्याळाचा गजर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य वखार मंडळाच्या गोदामात तर, बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये होणार आहे.

मतमोजणी निरीक्षकपदी पवन कुमार, खान
या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी निरीक्षकपदी अनुक्रमे पवन कुमार परंकुश, मोईनुद्दीन खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवन कुमार परंकुश हे बारामती तर, खान हे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणी निरीक्षक असणार आहेत.

मतमोजणी केंद्रात मोबाईल आणण्यास बंदी
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. यामुळे मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी आदींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

टोल फ्री क्रमांकाची सोय
पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ चारही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती घेता येणार आहे.

शिरूर मतमोजणी केंद्र परिसरात नो-पार्किंग झोन
शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होत असलेल्या रांजणगाव एमआयडीसीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम परिसरात मतमोजणीच्या दिवशी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार ठिकाणी नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. यानुसार पुणे-अहमदनगर महामार्गावरील राजमुद्रा चौक, रांजणगाव ते फलकेमळा, कारेगांव या रोडच्या दरम्यान दोन्ही बाजू, यश ईन चौक ते उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय रस्त्याच्या दोन्ही बाजू, यश ईन चौक ते रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत एमआयडीसी रोड, युकेबी कंपनी कॉर्नर ते आयटीसी कंपनी गेट एमआयडीसी अंतर्गत रोड या ठिकाणी कोणीही वाहने पार्किंग करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com