भावबंधनातील आदर्श मेळा
भावबंधनातील आदर्श मेळा
नवीन संसारात पाऊल टाकणारी नववधू केवळ नातेसंबंध नव्हे, तर अनेक नवीन जबाबदाऱ्या स्वीकारत असते. या नव्या प्रवासात तिच्या मनातील प्रश्न, भीती आणि अपेक्षांना समजून घेत, तिला मार्गदर्शनाची, प्रेरणेची आणि आत्मविश्वासाची शिदोरी देणारा माहेरवाशीण मेळावा साळुंब्रे येथे मागील अडीच दशकांपासून सतत समृद्ध परंपरेने आयोजित केला जात आहे. ग्रामप्रबोधिनी विद्यालयाचा हा उपक्रम आज पवनमावळातील आठ गावांतील नवविवाहित महिलांसाठी संस्कारांचे, मैत्रीचे आणि प्रबोधनाचे अमूल्य व्यासपीठ ठरला आहे.
- राधाकृष्ण येणारे
सा ळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयाने अडीच दशकांपूर्वी सुरू केलेला माहेरवाशीण मेळावा हा उपक्रम आज नववधूंसाठी एक महत्त्वाचा संस्कारवर्धक कार्यक्रम ठरत आहे. परंपरेने, नव्याने लग्न झालेल्या मुली सासरी जाताना माहेरचे मूल्य, संस्कार आणि व्यवहाराची शिकवण सोबत घेऊन नवीन कुटुंबात पदार्पण करतात. हे जग तिच्यासाठी पूर्णतः नवीन असते. नवीन माणसे, नवीन घर, नवीन अपेक्षा आणि नव्या जबाबदाऱ्या. अशा परिस्थितीत माहेरची शिकवण ही तिच्यासाठी मार्गदर्शक ठरते. नवीन कुटुंबातील अडचणी, आव्हाने आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी याच संस्कारांची शिदोरी उपयोगी पडते.
साळुंब्रेत मुहूर्तमेढ
याच विचारातून प्राचार्य व्यंकटराव भताने यांच्या मार्गदर्शनाखाली साळुंब्रे येथे हा मेळावा सुरू करण्यात आला. नववधूंच्या मनातील दडपलेल्या शंका, समस्या, विचार आणि अनुभव एकमेकांसोबत मोकळेपणाने शेअर करण्यासाठी तसेच त्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी हा मेळावा एक सक्षम व्यासपीठ आहे. सुरुवातीला साळुंब्रेपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम आज शिरगाव, गोडुंब्रे, गहुंजे, दारुंब्रे, सांगवडे, सोमाटणे, कासारसाई आदी आठ गावांपर्यंत विस्तारला आहे. नवविवाहित महिलांचा सहभाग वाढत असून, या वर्षीचा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मेळाव्याचे प्रवर्तक प्राचार्य व्यंकटराव भताने यांच्या मते, केवळ शिक्षण व पदव्या मिळविल्याने महिलांचा परिपूर्ण विकास होत नाही. समाजात आणि कुटुंबात योग्य प्रकारे वावर, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने हा मेळावा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महिला सबला बनावी
मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या हातून कुटुंब, गाव आणि समाजाची सेवा घडावी, कुटुंबातील आरोग्य सांभाळण्याबरोबरच स्वतःची काळजी घेण्याची सवय विकसित व्हावी, नेतृत्वगुण वाढावेत, मैत्रीची भावना वृद्धिंगत व्हावी आणि आत्मविश्वास बळकट व्हावा. तसेच महिलांनी अबला न राहता सबला बनावे, कठीण परिस्थितींवर मात करण्याची क्षमता यावी आणि संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची समयसूचकता विकसित व्हावी, हे देखील उद्दिष्ट आहे.
अनेक उपक्रमांचे आयोजन
मेळाव्यात अनेक उपक्रम घेतले जातात. नवविवाहित महिलांचा पारंपरिक पद्धतीने ओटीभरण करून सन्मान केला जातो. सासरी येणाऱ्या समस्यांबद्दल संवाद साधून त्यावर उपाय सुचवले जातात. मैत्रीचे महत्त्व, चांगल्या विचारांची देवाणघेवाण, सांस्कृतिक कार्यक्रमांचे ज्ञान, छोट्या व्यवसायांचे मार्गदर्शन आणि आव्हानांना धीराने सामोरे जाण्याच्या तंत्रांचे प्रबोधन केले जाते. अनुभव कथन, प्रश्नोत्तरे, प्रत्यक्ष दाखले आणि मार्गदर्शन यांच्या माध्यमातून महिलांना आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो.
हा मेळावा म्हणजे फक्त कार्यक्रम नाही; तो महिलांना सक्षम, सजग आणि समर्थ बनवण्याचा जीवन-उत्सव आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण, विचारांची देवाणघेवाण आणि सकारात्मक बदलाची प्रेरणा हे त्याचे मूळ सार आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आज साळुंब्रेचा हा माहेरवाशीण मेळावा पवनमावळातील नवविवाहित महिलांसाठी एक सुरक्षित, विश्वासू आणि प्रेरणादायी मंच बनला आहे. समाज, कुटुंब आणि स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी हा उपक्रम खरोखरच एक उल्लेखनीय पाऊल ठरत आहे.
७०४९८
साळुंब्रे ः माहेरवाशीण मेळाव्यात सहभागी झालेल्या महिला.
Media IDs : SMT24SF1, SMT24SF2
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

