सोमाटणेचा वेगवान विकासप्रवास
सोमाटणेचा वेगवान विकासप्रवास
एकेकाळी केवळ पाच हजार लोकसंख्या असलेले, निसर्गरम्य आणि शांत असे सोमाटणे आज पंचवीस हजारांवर लोकसंख्या असलेले जलदगतीने विकसित होणारे गाव बनले आहे. द्रुतगती मार्ग, कारखानदारी, धार्मिक पर्यटन, गृहप्रकल्प, रोपवाटिका उद्योग आणि रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे सोमाटण्याने खेडेगावातून शहरीकरणाकडे मोठी झेप घेतली आहे.
- राधाकृष्ण येणारे, सोमाटणे
ए कोणिसाव्या शतकाच्या शेवटी हिरव्यागार शेती, वनराई आणि निसर्गसंपन्न वातावरणामुळे ओळखले जाणारे सोमाटणे हे केवळ पाच हजार लोकसंख्येचे लहानसे खेडेगाव होते. मात्र २००० मध्ये सोमाटणेच्या हद्दीतून पुणे-मुंबईला जोडणारा जलद द्रुतगती मार्ग पूर्ण झाला आणि वाहतूक सुरू झाली. या महामार्गामुळे दोन शहरांमधील अंतर केवळ दोन तासांवर आले. कमी वेळात प्रवास शक्य झाल्याने मुंबईकरांनी ‘सेकंड होम’साठी सोमाटणेला प्राधान्य देणे सुरू केले.
आर्थिक प्रगतीच्या दिशेने
दिवसेंदिवस सोमाटणेत गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. बांधकाम उद्योगासाठी आवश्यक कच्चा माल स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाल्याने गावातील व्यवसायांना चालना मिळाली आणि ग्रामपंचायतीचा महसूल झपाट्याने वाढू लागला. गुंठेवारीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनींना चांगला बाजारभाव मिळाला. शेतीमालाला वाढती मागणी निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. याच काळात उर्से-बेबडओहोळ परिसरात कारखानदारी वाढली. दोन महामार्गांच्या मध्यभागी असलेल्या सोमाटण्यात राहण्यासाठी कामगार आणि नोकरदार वर्गाने पसंती दिली. त्यामुळे घरांची मागणी आणखी वाढली. दरम्यान संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. कारखान्यामुळे कडधान्य, ज्वारी, गहू, हरभरा, नाचणी, भात या पिकांच्या जागी ऊस लागवड वाढली आणि शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न दोन्ही वाढले.
शिरगावमुळे गती
सोमाटणेजवळील घोरावडेश्वर डोंगररांगांच्या कुशीत बिर्ला गणेश मंदिर आणि शिरगावातील प्रतिशिर्डी साईमंदिर उभे राहिल्यानंतर भाविक व पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. या देवस्थानाकडे जाणारा मार्ग सोमाटणे गावातूनच जात असल्याने येथे छोटे-मोठे व्यवसाय उभे राहिले. शेकडो तरुणांना रोजगार मिळाला आणि गावाच्या महसुलातही भर पडली.
नर्सरी व्यवसायाने बळकटी
लोकसंख्या वाढल्यामुळे दुधाला मोठी मागणी निर्माण झाली आणि दुग्धव्यवसायाला सुवर्णकाळ आला. गेल्या पाच वर्षांत कासारसाई धरण परिसरात पर्यटन वाढले. पवना धरणाच्या गर्दीला कंटाळलेल्या मुंबईकरांनी कासारसाईला पसंती दिली, त्याचा लाभ सोमाटणेतील सर्वच व्यवसायांना झाला. पूर्वी रोपवाटिका व्यवसाय केवळ पवनानगर परिसरात होता; परंतु दोन महामार्गांच्या मध्यभागी असल्याने वाहतूक आणि बाजारपेठेची सोय पाहून परराज्यातील उद्योजकांनी सोमाटणेत जागा भाड्याने घेत रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय झपाट्याने वाढल्यामुळे भाडेपट्टीवरील जमिनींची मागणी प्रचंड वाढली. नर्सरी व्यवसायाचे उत्पन्न शेतीपेक्षा अनेकपटीने वाढले आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकटी मिळाली.
‘सेकंड होम’साठीही मागणी
ग्रामपंचायतीचा महसूल वाढत गेल्याने गावाच्या विकासालाही गती मिळाली. पवन मावळच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सोमाटणेत रुग्णालये आणि हॉटेलचे केंद्र विकसित झाले. या व्यवसायामुळे गावाच्या प्रगतीला नवीन ऊर्जा मिळाली. दोन महामार्गांची सोय, निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार शेती आणि पवना नदीचे मुबलक पाणी यामुळे ‘सेकंड होम’साठी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आज सोमाटणे हे खेडेगावातून शहराकडे झपाट्याने वाटचाल करत असून, नव्या संधी, व्यवसाय, पर्यटन आणि रोजगार यामुळे गावाचे रूपच बदलले आहे.
७०५९१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

