जिल्हा टुडेसाठी कॉमन लीड
पुणे, ता.१५ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७४५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तब्बल ८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे आभाळचं फाटल्याची भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बोरी पारधी (ता दौंड) येथे ढगफुटी झाली. थेऊर आणि सणसर परिसरात ओढ्यांना पूर येऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले. अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेल्याने रस्ता फोडून पाण्याला मार्ग मोकळा करावा लागला. जिल्ह्यातील २६ पैकी १७ धरणांतून विसर्ग सुरू असल्याने खालच्या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.