
पुणे, ता.१७ : शेतकऱ्यांकडून होणाऱ्या मागणीच्या प्रमाणात युरिया मिळत नाही. खरीप हंगामात अनेक ठिकाणी युरिया वाटपामध्ये नियोजनाच्या अभावी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली होती. खरिपात सव्वा लाख टन युरियाची मागणी केली होती, त्यापैकी केवळ ५१ हजार ६३२ टन युरियाचा पुरवठा झाला. तर आता रब्बी हंगामासाठी खतांची एकूण मागणी ही एक लाख ९४ हजार १७० टन एवढी होती, मात्र कृषी विभागाने बारा हजार टन एवढी अधिकची मंजुरी दिली आहे. मात्र, रब्बी हंगामात युरियाचा वेळेत व पुरेसा पुरवठा करण्याची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात युरियाची मागणी आणि प्रत्यक्ष पुरवठा यात मोठी तफावत राहिली. युरियाची मागणी सव्वा लाख टनांपर्यंत पोहोचली होती. मात्र, पुरवठा फक्त अर्ध्याही पेक्षा कमी झाला. केवळ युरियाच नाही तर खरिपात डीएपी, म्युरिएट ऑफ पोटॅश (एमओपी), सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), मिश्र खतांचा (एनपीके) पुरवठा देखील मागणीच्या प्रमाणात कमी झाला होता. त्यामध्ये म्युरिएट ऑफ पोटॅशची तर साडे तीन हजार टन मंजुरी असताना केवळ सहाशे टन खताचा पुरवठा झाला आहे. आता रब्बीसाठी खताचे कृषी विभागाकडून नियोजन करून खताच्या साठ्याला मंजुरी दिली आहे. खरिपात कमी मिळालेला खत साठा रब्बीमध्ये वाढवून मिळणार आहे.
रब्बीसाठी ७४ हजार टन युरिया
* रब्बी हंगामासाठी ७४ हजार टन युरियाला मंजुरी
* प्रत्यक्षात मागणी ८८ हजार ७०० टन
* कृषी विभागाकडून युरियासह डीएपी, एनपीके, सुपर फॉस्फेट आदी इतर खतांचाही पुरवठ्याचे नियोजन
वितरण व्यवस्था सुधारण्याची मागणी
रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते खत सहज उपलब्ध होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर खरिपातील अनुभव लक्षात घेऊन रब्बीमध्ये वितरण व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
रब्बीसाठी असा असेल खतसाठा (टन)
खते -- मागणी -- मंजुरी
युरिया -- ८८,७०० -- ७४,०००
डीएपी -- १८,५०० -- १५,५००
एमओपी -- ५,०२० -- ८,१००
एसएसपी -- १६,५०० -- १५,५००
एनपीके -- ६५,४५० -- ९३,५००
खरिपात आम्हाला खतासाठी अक्षरशः रांगा लावाव्या लागल्या. काही वेळा ब्लॅकमध्येही युरिया खरेदी करावा लागला. त्यामुळे पिकाला वेळेवर खत देता आले नाही. आता प्रशासनाने रब्बीसाठी पुरेसा साठा मंजूर केल्याची माहिती मिळते आहे. तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला, तरच खरी मदत होईल.
- सुरेश ताम्हाणे, शेतकरी, जळगाव कडेपठार (ता. बारामती)
काही ठिकाणी वितरणाच्या अडचणी होत्या. खताच्या बोगी वेळेमध्ये आल्या नाही, त्यामुळे तात्पुरती टंचाई आली होती. पण त्या- त्या भागात युरिया पोहोचला होता. सध्याचा मंजूर युरियासाठा पुरेसा आहे. खरिपाचा काही साठा शिल्लक राहतो तो आता रब्बीसाठी वापरण्यात येईल. रब्बीसाठी खताचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.
- संजय काचाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
50524
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.