कचऱ्याच्या समस्येपासून होणार सुटका
पुणे, ता.३० : जिल्ह्यात वाढत्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद वारंवार पुढाकार घेत असली, तरी जागेअभावी आणि गावांच्या उदासीनतेमुळे प्रकल्प मार्गी लागत नाहीत. अखेर यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने क्लस्टर पद्धतीने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यातील पहिला क्लस्टर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे मॉडेल चाकण परिसरातील दहा गावांसाठी तयार केले जाणार असून, अशाच पद्धतीने पूर्ण जिल्ह्यात हे मॉडेल राबविण्यात येणार आहे. यामुळे कचऱ्याच्या समस्येपासून सुटका होणार नाही.
जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये घनकचरा आणि सांडपाण्याची समस्या मोठी आहे. यात बाजारांच्या गावांमध्ये सर्वाधिक समस्या आहे, महामार्गालगतच्या गावांमधील कचरा तर थेट महामार्गाच्या बाजूला टाकला जातो. हे टाळण्यासाठी आणि वाढते नागरिकीरण, औद्योगीकरणाचा विचार करता घनकचरा प्रकल्प होण्याची गरज जिल्हा परिषदेने ओळखून काही गावांसाठी एकत्रित प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी शासन स्तरावरील योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतींकडून प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र, त्याला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला होता. शिवाय पुण्यातील जमिनीचे भाव अधिक असल्याने कारणाने प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध होणे अवघड झाले होते. आता त्यावर तोडगा म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाकडून काही ग्रामपंचायतींचा एकत्रितपणे प्रकल्प उभा करून कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पहिली बैठक झाली. बैठकी दरम्यान प्रकल्पासाठी जागा उपलब्धता, अपेक्षित खर्च तसेच गावनिहाय निर्माण होणारा दररोजचा घनकचरा याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या एकत्रित सहभागातून क्लस्टर स्तरावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी पुढील कार्यवाहीचे सविस्तर नियोजन करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, सहआयुक्त नगरपालिका शाखा व्यंकटेश दुर्वास, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, अप्पासाहेब गुजर, ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश
चाकण नगरपालिका आणि एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायतींचा त्यामध्ये कडाचीवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कुरळी, खराबवाडी, खालुम्ब्रे, म्हाळुंगे, निघोजे, मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे.
चाकण परिसरामधील दहा गावांमध्ये दररोज शंभर टन कचरा निर्माण होतो, तेवढ्या क्षमतेचा क्लस्टर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना प्रक्रिया शुल्क हे कचऱ्यानुसार आकारले जाईल. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंधन, खत किंवा इतर बाबी कचऱ्यावर प्रक्रिया करून बनवल्या जातील.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद