रोहित्रांच्या चोऱ्यांबाबत पोलिसांची अनास्था
कडूस , ता. २६ : शिरूर तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोहित्र चोरीच्या घटना वाढलेल्या असताना तपासाबाबत मात्र पोलिसांची अनास्था दिसून येत आहे. रोहित्र चोरीच्या घटनेचा गुन्हा नोंद करून घेण्याऐवजी पोलिस फक्त साधा तक्रारी अर्ज दप्तरी दाखल करून घेत आहेत. गेल्या सहा महिन्यात तालुक्यात झालेल्या ४८ रोहित्र चोरीच्या घटना घडल्या, त्यापैकी पोलिसांकडून एकाही रोहित्र चोरीचा छडा लावलेला दिसत नाही.
तालुक्यात काही १०० किलोव्होल्ट-अँपिअर (केव्हीए) क्षमतेचे तर काही २०० केव्हीए क्षमतेची रोहित्र आहेत. एका १०० केव्हीए रोहित्राची किंमत तीन ते साडेतीन लाख तर २०० केव्हीए रोहित्राची किंमत साडेचार ते पाच लाख रुपये असते. १०० केव्हीए रोहित्रामध्ये ७० ते ८० किलो तांब्याची तार (कॉपर), तर २३० लिटर ऑइल असते. २०० केव्हीए रोहित्रामंध्ये १२० ते १३० किलो कॉपर व ४५० लिटर ऑइल असते. बाजारभावाप्रमाणे ८०० रुपये किलो तांब्याची तार व १५० ते २०० रुपये लिटर ऑईलची किंमत मोजली तरी रोहित्र चोरीमुळे महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे उघड आहे. वीज रोहित्राच्या चोरीची पोलिस ठाण्यात तक्रार दिली जाते.
शोध घेण्यात पोलिसांनी यश नाही
रोहित्र चोरीच्या घटनांपैकी एकाही घटनेचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिस एफआयआर नोंद करण्याऐवजी साधा तक्रारी अर्ज दप्तरी दाखल करून घेतात. यामुळे तपासाबाबतचे गांभीर्य राखले जात नाही. परिणामी चोरांचे फावत चालले आहे. चोर मोकाट अन नागरिक अंधारात, अशी गत झाली आहे. चोरट्यांचा शोध लागत नसल्याने रोहित्र चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक उरला नसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी रोहित्र चोरीच्या घटनांचा गांभीर्याने तपास करण्याची आवश्यकता आहे.
रोहित्र चोरीची पोलिस एफआयआर नोंदवून घेत आहेत. गेल्या दोन वर्षात साधारण दहा ते बारा एफआयआरची नोंद आहे. परंतु विद्युत रोहित्र ग्रामीण दुर्गम व आडमार्गी परिसरात असतात. तिथे जाणे सहज शक्य नसते. चोरी झाली तरी प्रत्यक्षदर्शी नसतो. त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसतात. यामुळे चोरट्यांचा माग मिळणे अवघड होते. या चोऱ्या मुख्यत्वे रात्रीच्या वेळी होतात. पोलिस रात्रीची गस्त करतात, परंतु ग्रामीण दुर्गम भागापर्यंत गस्त शक्य नसते. रात्रीच्या गस्तीत व्यक्ती आणि व्यक्तींची सुरक्षा, घरफोडी, वाटमारी, अपघाती घटनेला मदत याला प्राधान्य द्यावे लागते. महावितरणची पण रात्रीची गस्त हवी.
- सुभाष चव्हाण, पोलिस निरीक्षक, राजगुरुनगर पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

