आपत्कालीन स्थितीत संपर्क कुणाला करायचा ?

आपत्कालीन स्थितीत संपर्क कुणाला करायचा ?

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगाराची आहे, ते आगारप्रमुख, स्थानकप्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षकांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्याची घोषणा केली. त्यास वर्ष उलटले तरी ही घोषणा कागदावरच आहे. अनेक बसमध्ये अजूनही हे क्रमांक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क कुणाला करायचा, असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.
हा आदेश गेल्या वर्षी २१ सप्टेंबर रोजी देण्यात आला. एसटीच्या सर्व विभागांत याची अंमलबजावणी झालेली नाही. पुणे विभागात काही आगारांमधील थोड्याच बसमध्ये या क्रमांकांची स्टिकर्स लावण्यात आली, पण ती काही दिवसांतच गायब झाली. उर्वरित अनेक बसमध्ये अजूनही हे क्रमांक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या आदेशाचा एसटी प्रशासनाला विसर पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे का, असाच प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
राज्यात महामंडळाच्या १३ हजार बसमधून रोज सुमारे ४५ लाख प्रवासी प्रवास करतात. ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान अडचणींचा सामना करावा लागू लागतो. यासाठी जुन्या बसमध्ये १८००२२१२५० आणि ०२२-२३०५३९२२ टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक नमूद केलेले असायचे. बऱ्याच जुन्या बसमधील हे क्रमांक पुसले गेले आहेत. दुसरीकडे नवीन ठेकेदाराच्या ई-बसमध्येही टोल फ्री क्रमांक नमूद करण्यात आलेले नाहीत.
महामंडळाने प्रसिद्ध केलेला टोल फ्री क्रमांक बऱ्याच वेळा व्यस्त लागतो. प्रतिसादच दिला जात नसल्याने आपत्कालीन परिस्थीतीत प्रवाशांचा संपर्क होऊ शकत नाही.
----------
मी छत्रपती संभाजीनगरवरुन पुण्याकडे ई-शिवाईने प्रवास केला. प्रवासादरम्यान मळमळ होऊ लागली. चक्कर येत असल्याचे मी चालक आणि वाहकाला सांगितले. शिक्रापूरजवळ उतरविण्यात यावे, अशी विनंती मी केली. पण थांबा नसल्याचे कारण देत गाडी थेट स्वारगेटपर्यंत नेण्यात आली. मदतीसाठी बसमध्ये आपत्कालीन क्रमांकही नव्हता.
- विजय गाडे, प्रवासी
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com