बंधाऱ्यांतील पाण्याने बहरणार उन्हाळी पिके

बंधाऱ्यांतील पाण्याने बहरणार उन्हाळी पिके

Published on

नरेंद्र साठे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता.११ : जिल्ह्यातील बंधाऱ्यात ढापे टाकून पाणी अडविण्यास ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे जवळपास एक महिन्याचा विलंब झाला आहे. साधारणपणे १५ ऑक्टोबरपासून सुरू होणारी पाणी अडविण्यास यंदा नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली आहे. या माध्यमातून सुमारे दीड अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी साठवले जाणार आहे. जिल्हा परिषदेकडून यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यावर्षी लांबलेल्या पावसामुळे पाणी साठा वाढला आहे. तो अधिक उपयुक्त ठरून उन्हाळी पिकांसाठी फुलून परिसरत सुजालम्‌ सुफलाम्‌ होणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यामध्ये ३०२ ग्रामपंचायतींमधील ५७८ बंधाऱ्यातील पाणी ढापे टाकून अडविले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रामुख्याने कोल्हापूर, साठवण आणि वळण बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविले जाते. पाणी अडविण्यास एक महिना उशिराने सुरुवात झाली असली, तरी शेतकऱ्यांसाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे. कारण, पाणी तेवढे पुढे अधिक दिवस रब्बीच्या पिकांना उपयुक्त ठरणार आहे. बंधाऱ्यांमध्ये ढापे टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये १.४७ टीएमसी पाण्याचा साठा होईल, असा अंदाज जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून गेल्यावर्षीचे पाण्याचा विनियोग कसा झाला; याबाबत लेखी घेतले जाते. त्याचबरोबर यावेळीचे मागणीपत्र आणि हमीपत्र जिल्हा परिषदेला ग्रामपंचायत देते. त्यानुसार बंधाऱ्यांचे ढापे टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी निधी मंजूर केला जातो.

तालुक्यांतील बंधाऱ्यांत सर्वाधिक अडविले जाणार पाणी
१०६.....भोर
९०...खेड

बंधाऱ्यांचा गावातील शेतकऱ्यांना फायदा होतो. पाणी अडविल्यानंतर रब्बीच्या पिकांना सिंचनाची व्यवस्था होते. काहीसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा आमच्या परिसराला बंधाऱ्यांचा मोठा आधार झाला आहे.
- मनीषा खोमणे, सरपंच, जळगाव सुपे (ता.बारामती)

३०२.....ग्रामपंचायती
५७८.....बंधारे
१ कोटी १३, ७७ हजार रुपये ....जिल्हा परिषदेकडून निधी


दृष्टिक्षेपात
- बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषद पन्नास टक्के आणि ग्रामपंचायतीचा स्वनिधी वापरला जातो.
- पाणी अडविल्यानंतर १६ हजार ३७४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचा अंदाज
- ग्रामपंचायतींकडून मागणीपत्र आणि हमीपत्र घेतले जाते.
- ढापे टाकण्याचे आणि त्याची देखरेखीचे काम ग्रामपंचायत करते.

नदीमध्ये उतार असल्याने पाणी पूर्वी वाहून जात होते, आता बंधाऱ्यामुळे ते होत नाही. दोन दिवसांपूर्वी बंधाऱ्याला ढापे टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुरेसा पाणी साठा झाला आहे, त्याचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होईल.
- मुदिता देखणे, सरपंच, शिरोली

यंदा पाऊस चांगला झाला आहे. पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी अडविण्याचे काम होते. ग्रामपंचायत स्थानिक शेतकऱ्यांच्या सूचनेनंतर पाणी अडविण्याचे काम हाती घेते. पाण्याच्या
उपलब्धतेनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार बंधाऱ्याला ढापे टाकून पाणी अडविण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
- गौरव बोरकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद

तालुकानिहाय बंधाऱ्यांची संख्या
तालुका..........ग्रामपंचायत..........बंधारे
आंबेगाव..........२८..........४५
बारामती..........१४..........३५
भोर..........५५..........१०६
दौंड..........३..........४
हवेली..........१४..........३०
इंदापूर..........४..........३
जुन्नर..........४७..........७२
खेड..........४६..........९०
मावळ..........२६..........५०
मुळशी..........२७..........६९
शिरूर..........११..........२२
राजगड..........२७.......... ५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com