बिबट्यांना रोखण्यासाठी वन विभाग सज्ज

बिबट्यांना रोखण्यासाठी वन विभाग सज्ज

Published on

पुणे, ता. १२ : जिल्ह्यामध्ये मानवी वस्तीवर बिबट्यांचे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर एका महिन्यात शिरूर आणि आंबेगाव तालुक्यात १७ बिबटे पकडण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली, सोलार नाईट सर्व्हेलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, साउंड अलर्ट सिस्टीम ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे वन विभागाकडून सांगण्यात आले.
मानव- बिबट संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रातील घटनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी वनविभागाकडून माहिती देण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, महादेव मोहिते, प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘ग्रामस्तरावर ग्रामसभा घेऊन नागरिकांना चालू उपाययोजना, जिल्ह्यातील घटना व त्यावर केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती द्यावी. याचबरोबर ग्रामस्तरावर सहनियंत्रण समिती गठित करून त्यामध्ये अनुभवी व्यक्ती, वन आपदा मित्र, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांचा समावेश करावा. या समितीमार्फत ड्रोन सर्व्हे करून गावात आढळणाऱ्या बिबट्यांची संख्या नोंदविणे, गस्त वाढविणे व नागरिकांना जनजागृती करणे, तसेच बिबट हल्याच्या अनुषंगाने आदर्श कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करावी. याशिवाय पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावर ‘टायगर सेल’ची बैठक घेऊन समन्वय वाढवावा.’’

- १२ ऑक्टोबरपासून आतापर्यंत १७ बिबटे जेरबंद केले.
- पकडलेले सर्व बिबट जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ठेवले आहेत.
- बिबट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
- नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत
- नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १८००३०३३
- सद्यःस्थितीत जुन्नर वनविभागाकडे २६२ पिंजरे उपलब्ध
- आणखी पिंजरे तयार करण्याचे काम सुरु

बिबट निवारा केंद्र उभारणार
सद्यःस्थितीत माणिकडोह बिबट निवारण केंद्रात ५० बिबट ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, त्याठिकाणी सध्या ६७ बिबटे आहेत. जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने जुन्नर वनविभागात एक हजार बिबटे आणि पुणे वनविभागात पाचशे बिबटे ठेवता येतील, अशा विविध ठिकाणी नवीन बिबट निवारा केंद्रे उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

बिबट्यांना पकडण्यासाठी बाहेरील जिल्हे अथवा राज्यांमधून अल्पावधीत ७०० पिंजरे उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या पुरवठादार, एजन्सी किंवा कंपन्यांकडून खरेदी करा. तसेच संभाव्य बिबट प्रवण क्षेत्र घोषित केलेल्या गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ पिंजरे उपलब्ध करून द्यावेत.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com