युनेस्कोच्या वारसा स्थळांत लोहगडाचा शिरपेच !

युनेस्कोच्या वारसा स्थळांत लोहगडाचा शिरपेच !

Published on

इंट्रो ः युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मावळचा राजा किल्ले लोहगडाचा समावेश झाल्याने आणखी एक शिरपेच खोवला गेला आहे. आजपर्यंतच्या युनेस्कोच्या यादीतील एकाही माचीयुक्त किल्ल्याला स्थान नव्हते. खरे तर माची आणि जिभी अर्थात लपवलेला दरवाजा या दोन वैशिष्ट्यपूर्ण रचनांमुळे लोहगड युनेस्कोच्या यादीत गेला आहे. तेवढेच दुर्ग अभ्यासक आणि दुर्गप्रेमींचे समर्पण आणि त्यागही त्यामागे आहे. लोहगडचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला असला तरी तो टिकवणे एक मोठे आव्हान आहे. सरकार, प्रशासन आणि दुर्गप्रेमींनी ते पेलायला हवे.
-------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने मावळ तालुका पावन झाला आहे. तालुक्यात लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची (श्रीवर्धन, मनोरंजन), इंदोरीचा भुईकोट किल्ला आदी शिवकालीन किल्ले आहेत. स्वराज्यासाठी येथील प्रत्येक किल्ला लढला. सर्व किल्ल्यांना निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले. प्रचंड जंगले, नद्या, धरणे इत्यादी. या सर्व किल्ल्यांमध्ये लोहगड किल्ला हा पर्यटकांसह इतिहास अभ्यासकांचे मुख्य आकर्षण ठरला आहे.
कारण, या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. लोहगड हे मावळचे खरे वैभव आहे. मावळच्या मुकुटातील तो कोहिनूर हिरा आहे. लोहगड उलगडून दाखविताना आपण पोहोचतो थेट इ.स. पूर्व २००मध्ये. कार्ल्याच्या शिलालेखात उल्लेख केलेल्या ‘मामड’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन मावळ असा शब्द रुढ झाला. विसापूर, लोहगड हे फक्त किल्ले नसून भाजे गावातून सुरू होणाऱ्या मारकुट पर्वताचा एक भाग लोहगड असल्याचा उल्लेख बेडसे लेणीतील शिलालेखात सापडतो. इ.स.पूर्व २०० मध्ये बांधण्यात आलेले जगाच्या पाठीवरचे देशातील पहिले सूर्य मंदिर लोहगड-विसापूरच्या पोटातील भाजेच्या लेणीमध्ये आहे. त्यानंतर १७७५ मध्ये मराठ्यांनीच ओडिशातील कोणार्कचे सूर्य मंदिर शोधले.

भाजेच्या लेणीचा बहुमान
जगात सर्वाधिक १,२७८ लेणी भारतात असून त्यात सर्वाधिक लेणी पुणे जिल्ह्यात आहेत. एकट्या मावळ तालुक्यात ५७ लेण्या असून दक्षिण भारतातील लेण्यांमध्ये पहिला मान भाजेच्या लेणीला आहे. आंदर मावळात आंद्रा सातवाहन ते भोर संस्थान अशा अनेक राजसत्ता लोहगडावर नांदल्या. वयाच्या १७ व्या वर्षी शिवरायांनी लोहगड स्वराज्यात घेतला. महाराजांनी वस्तुनिष्ठता जाणून कोंढाण्याचे सिंहगड, तुंगचे कठीणगड, तिकोनाचे वितंगगड, विसापूरचे संबळगड नामकरण केले असले तरी लोहगडाचे नाव मात्र तेच कायम ठेवले.

किल्ल्याचा इतिहास, रचना
या किल्ल्याचा इतिहास पाहता हा किल्ला पुरंदरच्या तहात मोगलांना दिला होता. पुढे महाराजांनी तो परत जिंकून घेतला. सुरतवरून आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली लोहगडला ठेवली होती. गडावरील ज्या कोठीमध्ये ठेवली तिला लक्ष्मी कोठी असे म्हणतात. तसेच लोहगडावर काही काळ कान्होजी आंग्रे यांचे वास्तव्य होते. त्यानंतर काही काळ हा किल्ला पेशव्यांकडे होता. नाना फडणवीस यांनी गडावर बांधकाम मजबूत करून घेतले, असे शिलालेख आहेत. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण वास्तूमध्ये उल्लेख करता येईल, असे किल्ल्यावर पाच दरवाजे आहेत. त्यामध्ये गणेश दरवाजा, महादरवाजा, नारायण दरवाजा, त्र्यंबक दरवाजा, हनुमान दरवाजा. यामध्ये गणेश दरवाजा व हनुमान दरवाजाला ऐतिहासिक पद्धतीने भव्य असे सागवानी दरवाजे पुरातत्व विभागाने बसविले आहेत. त्यापैकी गणेश दरवाजा हा महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील पहिला असा दरवाजा आहे की जो नवीन बसविला गेला. त्यासाठी लोहगड विसापूर विकास मंचाने मोठे आंदोलन केले. त्याला पुरातत्त्व विभागाने साथ दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना पुन्हा वैभवशाली दिवस आता दिसू लागले आहेत. गडावरील लक्ष्मी कोठीमध्ये दीडशे लोक बसतील, एवढी जागा आहे. कडक उन्हाळ्यामध्ये इथे अतिशय थंडगार वाटते. गडावर पाण्याची अनेक लहान मोठे टाके आहेत. यापैकी १६ कोनांतील तळे हे अतिशय सुंदर आहे. गडावर अति सुंदर असे शिवमंदिर आहे. हे मंदिर लोहगड विसापूर विकास मंचाने व स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठ्या कष्टाने बांधले आहे. इथूनच लोहगडचा खरा जिर्णोद्धार चालू झाला. पुढे मंचाने पुरातत्व विभागाकडे किल्ल्यासंदर्भात पाठपुरावा केले व पुरातत्व विभागाने किल्ल्यांवर प्रचंड मोठे काम उभे केले. त्यामध्ये गडावरील पायऱ्या, तटबंदी, बुरुज, विंचू कड्यावरील रेलिंग या गोष्टींचा प्रमुख समावेश आहे.

शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प
लोहगड पायथ्याला लोहगड विसापूर विकास मंचातर्फे भव्य असे शिवस्मारक उभे केले आहे. लोहगडाचे पावित्र्य राखण्याचे काम मंचाने केले. लोहगडावरील शिव मंदिराचा जिर्णोद्धार केला. आंदोलन केल्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोहगडाचा पहिला गणेश दरवाजा बसला आणि गैरप्रकार बंद झाले. आता त्या ठिकाणी भव्य शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प आहे. कारण, जगभरातील पर्यटक किल्ल्यावर येत आहेत. त्यांना शिवरायांचा इतिहास हा कळला पाहिजे. त्यांचा पराक्रम, त्यांची तत्वनिष्ठा, त्यांचे चारित्र्य, त्यांचे नेतृत्व अशा आमच्या जाणता राजाच अभ्यास जगभर अभ्यास केला गेला पाहिजे. त्यासाठी पायथ्याला शिवसृष्टी ही आवश्यक आहे.

मूलभूत गरजांची पूर्तता
लोहगड किल्ला जागतिक वारसा स्थळांमध्ये गेल्यामुळे या ठिकाणी आता काही मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रमुख म्हणजे भाजे-लोहगड रस्ता. हा रस्ता अतिशय अरुंद आहे. साईड पट्टे पूर्ण खचलेले आहेत. पर्यटकांना या रस्त्यावर अतिशय धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतो. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये मावळचा नकारात्मक संदेश जातो. या रस्त्याचे रुंदीकरण करून त्याच्या आजूबाजूला ऐतिहासिक रूप देऊन गडकिल्ल्यांचे महत्त्व वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे पर्यटकांनाही कळले पाहिजे की आपण मौजमजेसाठी नाही; तर गड-किल्ल्यावर चाललो आहोत. त्यामुळे किल्ल्यांचे पावित्र राखण्यास मदत होईल.

ना विकास क्षेत्र हवे
लोहगड परिसरात मोठे जंगल आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गडकिल्ल्यांच्या परिसरात प्रचंड अतिक्रमणे चालू असून त्यामुळे वनसंपदा नष्ट होत चालली आहे. फार्म हाऊसच्या नावाखाली मोठमोठ्या उद्योगपतींनी जागा ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे इथली जंगल संपत्ती हळूहळू नष्ट होत आहे. लोहगडाचे वैभव आणि परिसरातील वनसंपदा टिकविण्यासाठी परिसरात ना विकास क्षेत्र (नॉन-डेव्हलपमेंट झोन) लागू करणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांचे निवासस्थान नष्ट होत आहे. कारण, त्याच्यावर आता मानवाने मोठा कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. लोहगड परिसरात आता हे चालू आहे. लोहगड किल्ल्यावर तसेच पायथ्याला स्वच्छतागृहाची व्यवस्था पुरातत्व विभागाने ताबडतोब केली पाहिजे. गड पायथ्याला पोलिस चौकी उभी राहिली पाहिजे. त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवता येते. चौकी नसल्यामुळे पोलिसांना पण बंदोबस्तात अडचणी निर्माण होतात. लोहगड किल्ल्यामुळे स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यात लाखोंच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी पर्यटक येतात. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांची पण आपण काळजी घेतली पाहिजे.

(शब्दांकन : गणेश बोरुडे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com