शिक्षणाचा लोकाभिमुख मावळ पॅटर्न
विद्यार्थ्यांमधील आकलन क्षमता आणि गुणवत्तेला वाव देण्याच्या हेतूने जागतिक दर्जाशी समकक्ष शिक्षण आणि संशोधन पूरक अशा शैक्षणिक सुविधा मावळातच उपलब्ध करुन देण्यासाठी शिक्षणाच्या लोकाभिमुखीकरणाचा मावळ पॅटर्न राबविण्याचे प्रयत्न चालू आहेत. केवळ पदव्या प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी अथवा पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना ओळखून त्यांचा सर्वांगीण विकासादृष्टीने पोषक वातावरण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य मावळातील शैक्षणिक संस्था निःस्वार्थीपणे करीत आहे. त्यामुळे मावळातून पुण्यात शिक्षणासाठी जाण्याऐवजी पुण्यातून मावळात ज्ञानार्जन करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे.
- रामदास काकडे, अध्यक्ष, इंद्रायणी विद्या मंदिर संस्था, तळेगाव दाभाडे
--------------------------------
लोकमान्य टिळकांनी तळेगावामध्ये पैसा फंड प्राथमिक शाळा आणि त्यानंतर कै. अण्णासाहेब विजापूरकरांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करण्याच्या हेतूने लोकमान्य टिळकांच्या मदतीने अण्णासाहेब विजापूरकरांनी १९०६ मध्ये तळेगाव दाभाडे येथे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. संस्थेच्या समर्थ विद्यालयाच्या माध्यमातून मावळात प्रथमच राष्ट्रीय शिक्षणाची दारे उघडली. ११९ वर्षांपासून अविरतपणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात मावळ तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगोत्री उपलब्ध करून देणारे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आज पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या असंख्य दालनांद्वारे विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांना ओळखून त्यांना स्वयम् विकसित होण्याची संधी पोषक वातावरण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे कार्य नवीन समर्थ विद्यालय करत आहे.
राष्ट्रीय शिक्षणाचे सूत्र
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांसारख्या राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांनी नवीन समर्थ विद्यालयाला भेटी देऊन अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे दिले आहेत. गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकरांनी लोकमान्य टिळक यांच्या साहाय्याने पारतंत्र्याच्या काळात १९०६ मध्ये राष्ट्रीय शिक्षणाचे सूत्र हाती घेऊन महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रीय शिक्षण देणारे नवीन समर्थ विद्यालय स्थापन केले. मातृभाषेतून अध्ययन, उपासना आणि व्यवसाय शिक्षणास प्राधान्य देणारे हे विद्यालय नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ अशी संस्थेची प्रथम शाळा होती. लोकमान्य टिळक संस्थेचे प्रथम अध्यक्ष तर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर हे संस्थापक चिटणीस होते. पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय चळवळीस हातभार लावणारी आणि देशभक्त या विद्यालयाने घडविले. क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे या नवीन समर्थ विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते.
दिग्गजांच्या मूल्यांवर वाटचाल
स्वातंत्रोत्तर काळात दिवंगत प्रा. डॉ. एम. एम. अटेटेकर यांच्या प्रयत्नांतून १९६५ मध्ये सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखली जाणाऱ्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची स्थापना झाली. दिवंगत पी.के.अत्रे, पुणे, राजस्थान आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी उपाध्यक्ष दिवंगत डॉ. जी.एस. महाजनी तसेच राज्याचे माजी अर्थमंत्री दिवंगत बाळासाहेब देसाई यांनी जोपासलेल्या मूल्यांच्या बळावर संस्था आज वाटचाल करत आहे. २१ व्या शतकात ‘जागतिक पातळीवर विचार करा आणि स्थानिक पातळीवर कार्य करा’ हे ब्रीद अंगीकारून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.
गुणवत्तापूर्वक ज्ञानदानाचे कार्य
नानासाहेब परुळेकर विद्यानिकेतन ही खासगी शाळा १९७० मध्ये सुरू झाली. राज्यातील तत्कालीन बड्या नेत्यांसह उच्चभ्रू कुटुंबांतील मुलांनी परुळेकर विद्या निकेतनमध्ये माध्यमिकपर्यंत शिक्षण घेतले. मावळ शिक्षण प्रतिष्ठान, बालविकास, विश्वकल्याण एज्युकेशन सोसायटी आदींसारख्या अनेक विनाअनुदानित संस्थांनी शिक्षणाची दारे खुली केली. अगदी आर्थिक दुर्बल घटकांसाठी नगर परिषद, शिक्षण मंडळाच्या शाळा देखील गेली अनेक वर्षे अखंडितपणे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. मूळ स्थानिक संस्थांसोबतच पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी, डॉ.डी. वाय.
पाटील शैक्षणिक समूह, सिंहगड, एमआयटी सारख्या बड्या संस्थांनी देखील मावळमध्ये विविध अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
सर्व क्षेत्रांत अग्रेसर
मावळ तालुका आज सगळ्याच बाबतीत पुढे आहे. पर्यटन, उद्योग व्यवसाय, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मावळ तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. यश हे एका दिवसात मिळत नसते, तर त्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करावी लागते. आजच्या तंत्रज्ञानावर आधारित युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) झपाट्याने जगाचा ताबा घेत आहे. दिवसेंदिवस तीव्र होणाऱ्या स्पर्धेचे भान ठेवत विद्यार्थी दशेतच उद्योजकतेचे धडे गिरवून नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनायला हवे. विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक यश संपादन करावे आणि देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करावेत. इथला प्रत्येक विद्यार्थी हा कुशल मनुष्यबळ म्हणून पुढे येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.
करिअरच्या प्रचंड संधी
शिक्षणाकडे कमावण्याचे साधन म्हणून न पाहता मालमत्ता म्हणून पाहणे गरजेचे आहे. हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी भरीव कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन विद्यार्थी घडवण्यासाठी संस्थाचालकांना कटिबद्ध व्हावे लागेल. विद्यार्थ्यांनी समाज आणि राष्ट्राचा विकास डोळ्यांसमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल करायची आहे. चाकण ते हिंजवडी या विस्तारलेल्या औद्योगिक आणि आयटी हब पट्ट्याच्या केंद्रस्थानी तळेगाव दाभाडे असल्याने तळेगावसह मावळातील विद्यार्थ्यांना करिअरमध्ये प्रचंड संधी आहेत. शिक्षकांनी देखील काळाच्या पुढे जाऊन विचार केला पाहिजे. त्या पद्धतीने विचारांची पेरणी विद्यार्थ्यांमध्ये करावी. शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी काम करताना शिक्षण प्रणाली पुढे न्यावी लागेल.
उद्योगपूरक कुशल मनुष्यबळ
शिक्षणमहर्षी कै.कृष्णराव भेगडे यांनी मावळातील शिक्षण संस्थांना उभारी, नवसंजीवनी देण्याचे काम केले. १९८१ मध्ये बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेवरचे १० लाखांचे कर्ज तत्कालीन अध्यक्ष प्रा.रामकृष्ण मोरे यांच्या माध्यमातून कर्ज फेडून संस्थेचे पुनरुज्जीवन केले. पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकसाठी २५ एकर जमीन विनामोबदला संस्थेच्या नावावर करुन दिली. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय उभे केले. औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांना आवश्यक कौशल्याला अनुसरुन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. कारण, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांनी हातात हात घालून पुढे चालणे ही काळाची गरज आहे.
औषधनिर्माणाचे अभ्यासक्रम
काळासोबत धावताना अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापना करण्याची कल्पना पुढे आली. नवभारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम एमआयडीसीतील कंपन्या करीत आहेत. देशाची औषध निर्यात ३० अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे. भारतीय औषधी कंपन्यांचा जागतिक बाजारपेठेतील ५.९२ टक्के हिस्सा आहे. जगातील ६५ ते ७० टक्के लसींचा पुरवठा हा एकमेव भारत देश करतो. या पार्श्वभूमीवर औषधनिर्माणशास्त्र विद्या शाखेतील विद्यार्थ्यांना आयटी कंपनीतील असलेल्या संधी आकर्षित करत आहेत .त्यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयात औषधनिर्माण शास्त्राचे अभ्यासक्रम देखील सुरू आहेत.
संशोधनाला चालना
स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढील समस्या वेगळ्या होत्या. आव्हाने वेगळी होती. आज आव्हानांचे स्वरूप बदललेले आहे. प्रश्न वेगळे आहेत. या सर्वांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला अनेक नवी संशोधने पुढे आणावी लागतील आणि संशोधनाच्या बळावर देशाला महासत्ता बनवणे आपल्याला शक्य होईल. संशोधनात्मकदृष्ट्या असलेल्या संधी पाहता मावळात पी.एचडी अभ्यासक्रम चालू करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. शैक्षणिक क्षेत्राला अधिकाधिक लोकाभिमुख करुन स्थानिक विद्यार्थ्यांना जगाच्या पाठीवर नेण्याचे काम निश्चितच होऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

