भूगावच्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिरला अजिंक्यपद

भूगावच्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिरला अजिंक्यपद

Published on

भूगावच्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिरला अजिंक्यपद
१४ वर्षांखालील क्रिकेट ः मिलेनियम नॅशनल उपविजेते, तर सिंहगड सिटी तृतीयस्थानी

पुणे, ता. ३ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात भूगाव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर स्कूलने कर्वेनगरच्या मिलेनियम नॅशनल स्कूलचा अंतिम चेंडूंवर अवघ्या चार धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. ३९ चेंडूंत ६८ धावांच्या खेळीसाठी विष्णू मुल्या हा सामन्याचा मानकरी ठरला. कोंढव्याच्या सिंहगड सिटी स्कूल तृतीय स्थानी राहिले.
सासवड-बोपदेव रस्त्यावरील ट्रिनिटी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. ब्लू रॅम्प मॅनेजमेंटचे अवधूत देवधर यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर आणि मिलेनियम नॅशनल स्कूलमधील अंतिम लढत चुरशीची झाली. नाणेफेक जिंकून श्री श्री रविशंकर विद्या मंदिरने प्रथम फलंदाजीच्या निर्णय घेतला. उपांत्य फेरीची पुनरावृत्ती करत विष्णू मुल्या आणि शुभम पानसे यांनी अंतिम सामन्यात देखील नाबाद सलामी भागीदारी करत मिलेनियम नॅशनलसमोर दहा षटकांत ९९ धावांचे आव्हान ठेवले. विष्णूने नाबाद ६८ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना मिलेनियम नॅशनलच्या ओजस नावरे आणि अरीन सातपुते यांनी पहिल्या तीन षटकांत २८ धावा केल्या. परंतु तिसऱ्या षटकांत ओजस धावबाद झाला आणि धावगतीला काहीवेळ चाप बसला. मात्र, अरीन याने एक बाजू रोखून धरली आणि चौकारांचा वर्षाव पुन्हा सुरू केला. सत्यजित देशपांडेने अरीन आणि रुद्र देशपांडेला एकाच षटकात तंबुत परत पाठविले आणि श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संघाचे सामन्यात पुनरागमन झाले. शेवटच्या षटकात सामना जिंकण्यासाठी मिलेनियम नॅशनलला १८ धावांची गरज होती. समर्थ पोकळे याने दोन चौकार मारले. परंतु शेवटच्या चेंडूत सहा धावांची गरज असता सत्यजितने अचूक यॉर्कर टाकला आणि श्री श्री रविशंकर विद्या मंदिरने हा सामना चार धावांनी जिंकला.
तत्पूर्वी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्री श्री रविशंकर विद्या मंदिरने वाकडच्या इंदिरा नॅशनल स्कूलचा दहा विकेटने, तर मिलेनियम नॅशनल स्कूलने कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलचा सहा विकेटने पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सिंहगड सिटीने इंदिरा नॅशनलचा ५२ धावांनी पराभव करत ब्राँझपदक जिंकले.

अंतिम सामना ः श्री श्री रविशंकर ः १० षटकांत बिनबाद ९८ (विष्णू मुल्या नाबाद ६८, शुभम पानसे नाबाद २६) वि.वि. मिलेनियम नॅशनल स्कूल ः १० षटकांत ४ बाद ९४ (अरीन सातपुते ३४, समर्थ पोकळे नाबाद २१, शीर्ष उपारे २१, सत्यजित देशपांडे २-१२).

तिसऱ्या क्रमांकाचा सामना ः सिंहगड सिटी ः १० षटकांत १ बाद ११४ (निहाल फरांदे नाबाद ५९, अंशुल चिपडे नाबाद ३२, अमेय चपळगावकर १-१७) वि.वि. इंदिरा नॅशनल ः १० षटकांत ९ बाद ६२ (शर्विल लाळे २२, अमेय चपळगावकर २१, अंशुल चिपडे ३-१५, भार्गव जामदार २-७).

उपांत्य सामने ः इंदिरा नॅशनल स्कूल : १० षटकांत ४ बाद ८७ (शर्विल लाळे ५५, अमेय चपळगावकर १४, मिहीर देशपांडे १-८, शुभम पानसे १-१४) पराभूत विरुद्ध श्री श्री रविशंकर : ८.२ षटकांत बिनबाद ८९ (विष्णू मुल्या नाबाद ५२, शुभम पानसे नाबाद २९). सिंहगड सिटी स्कूल : १० षटकांत ६ बाद ६८ (निहाल फरांदे २२, समर्थराज घुले १०, अर्घ्य मणेरीकर २-१०, समर्थ पोकळे २-१०, अरीन सातपुते १-१०) पराभूत विरुद्ध मिलेनियम नॅशनल स्कूल : १० षटकांत ४ बाद ६९ (ओजस नावरे १९, अरीन सातपुते १९, समर्थराज घुले १-१८)

सलग तिसरी नाबाद सलामी
श्री श्री रविशंकर विद्या मंदिरच्या विष्णू मुल्याने उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी यासह अंतिम सामन्यात देखील अनुक्रमे ३८, ५२ आणि ६८ अशा सलग नाबाद तीन खेळी करत तिन्ही सामन्यांत सामनावीराचा बहुमान मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com