डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल, लोकसेवाला विजेतेपद

डॉ.कलमाडी शामराव हायस्कूल, लोकसेवाला विजेतेपद

Published on

तपासली आहे.


पुणे, ता. ५ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्‍या गटात एरंडवणेच्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने चिंचवडच्या एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलचा पराभव करत विजेतेपद पटकाविले. तर १६ वर्षांखालील गटात फुलगावच्या लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलने बालेवाडीतील सी.एम इंटरनॅशनल स्कूल संघाला मात देत अजिंक्यपद प्राप्त केले.
भारती विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर गुरुवारी (ता.४) मुलींच्‍या फुटबॉल स्पर्धा पार पडल्या. विजेत्या संघांना भारती विद्यापीठाच्या अभिजीत कदम स्पोर्टस् डेव्हलपमेंट सेंटरचे (एकेडीएस)चे प्रतिनिधी अनिल राकाटे यांच्या हस्ते पदके आणि चषक देऊन गौरविण्यात आले. १४ वर्षांखालील गटात बालेवाडीतील सी.एम इंटरनॅशनल स्कूल, तर १६ वर्षांखालील गटात वाकडचे इंदिरा नॅशनल स्कूलचा संघ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात एल्प्रो इंटरनॅशनल आणि डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये अंतिम सामना रंगला. अटीतटीच्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी उत्तम खेळ केला. दोन्ही संघांना निर्धारित वेळेत गोल साधता आला नाही. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने एल्प्रो इंटरनॅशनलचा ४-३ असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात बालेवाडीच्या सी.एम इंटरनॅशनल स्कूलने आगरकरनगर येथील सेंट हेलेनाज स्कूलवर २-० असा एकतर्फी पराभव केला. मुग्धा अत्राडे हिने दोन दमदार गोलची नोंद केली.
दरम्यान, १६ वर्षांखालील गटात पहिल्या उपांत्य सामन्यात बालेवाडीच्या सी.एम इंटरनॅशनल स्कूलने भोसरीच्या मास्टर माईंड ग्लोबल स्कूलचा १-० असा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यात प्रिया शहा हिने १० व्या मिनिटाला गोल करत विजय मिळवून दिला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात फुलगावच्या लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलने वाकडच्या इंदिरा नॅशनल स्कूलवर २-० असा दमदार विजय प्राप्त केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात लोकसेवाच्या धनश्री पाटील आणि लावण्या शितोळे यांनी एकेक गोलची नोंद केली. स्पर्धेत नवीन हिरेकेरुर, सूरज मसिलान, करण अंगीरवाल, प्रतीक आवळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल संघाला प्रशिक्षक हर्षल कालगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या एल्प्रो इंटरनॅशनल संघाला प्रशिक्षक रोहन मुरकुटे तर सी.एम इंटरनॅशनल स्कूल संघाला प्रशिक्षक मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तर विजेत्या लोकसेवा संघाला प्रशिक्षक निखिल सावंत, उपविजेत्या सी.एम इंटरनॅशनल संघाला अमित चव्हाण तर इंदिरा नॅशनल स्कूलच्या संघाला आकाश शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.

धनश्रीचा निर्णायक खेळ
मुलींच्या १६ वर्षांखालील गटात फुलगावच्या लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि बालेवाडीतील सी.एम इंटरनॅशनल स्कूलच्या संघात अंतिम सामना रंगला. त्यात लोकसेवाने सी.एम इंटरनॅशनलवर १-० असा विजय प्राप्त केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत एकमेकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या सत्रामध्ये सामना वेगवान झाला. त्यामध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासून लयात असलेली लोकसेवाची धनश्री पाटील हिने २५ व्या मिनिटाला निर्णायक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या बाजूने सी.एम इंटरनॅशनलची रिया जांगीड हिने आक्रमक खेळ केला. परंतु लोकसेवाच्या बचावफळीने मजबूत प्रदर्शन करत वारंवार झालेल्या आक्रमणांना अचूक प्रत्युत्तर दिले. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात वाकडच्या इंदिरा नॅशनल स्कूलने भोसरीच्या मास्टर माईंड ग्लोबल स्कूलचा १-० असा पराभव केला. त्यात इंदिरा नॅशनल स्कूलच्या श्रेया करवा हिने सामन्यात विजयी गोलची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com