कपिल सन्स संघाकडून ३४८ धावांचा डोंगर सर
पुणे, ता. ९ : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्यावतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ‘एमसीए कॉर्पोरेट शील्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत कपिल सन्सने डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर (सी.सी) संघाने रचलेला ३४८ धावांचा डोंगर सर करत नेत्रदीपक विजय मिळविला. विजयी संघाचा सलामीवीर अनिरुद्ध साबळे याने तब्बल १९४ धावांची खेळी केली. तसेच जेट्स क्लब आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमी संघांनी देखील प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
येवलेवाडी येथील ब्रिलियंट अकादमीच्या मैदानावर डी.वाय.पाटील सी.सी. विरुद्ध कपिल सन्स हा सामना रंगला. प्रथम फलंदाजी करताना डी.वाय.पाटील सी.सी संघाचा सलामीवीर अनिरुद्ध साबळे याने १५४ चेंडूंत १३ चौकार आणि तब्बल १४ षटकार मारत तब्बल नाबाद १९४ धावांची खेळी केली. कर्णधार सौरभ नवले याने देखील अर्धशतक झळकावीत कपिल सन्स संघासमोर तब्बल ३४९ धावांचा डोंगर रचला. मात्र आव्हान पाहून न खचता कपिल सन्सच्या अभिषेक जोशी आणि ऋषिकेश राऊत या सलामी जोडीने धडाकेबाज सुरवात करत पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. तसेच अथर्व काळेच्या ९२ धावा आणि अनुराग कवडे याच्या नाबाद ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर कपिल सन्सने हा सामना पाच चेंडू व चार विकेट राखून जिंकला.
नेहरू स्टेडियमवर पुणेरी बाप्पा आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमी यांच्यात लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना पुनीत बालन अकादमीच्या पवन शाह, अंकित बावणे आणि सचिन धस यांनी प्रत्येकी अर्धशतकीय खेळी करत संघाला ५० षटकांत ३१७ धावांवर पोहोचवले. पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसले आणि हितेश वाळुंज यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. धावांचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पाचा सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला पहिल्याच चेंडूवर बाद झाला. आर्यन देसाई, ऋषिकेश सोनावणे, दीपक डांगी यांनी प्रत्येकी अर्धशतकीय खेळी करून देखील पुणेरी बाप्पाचा संघ २७४ धावांवर सर्वबाद झाला आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमीने हा सामना ४३ धावांनी जिंकला.
लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर झालेला जेट्स क्लब विरुद्ध ईगल व्हॅलेन्टिना हा सामना एकतर्फी झाला. प्रथम फलंदाजी करताना जेट्स क्लबने किरण चोरमले आणि सत्यजित बच्छाव यांच्या अर्धशतकीय खेळीच्या मदतीने ५० षटकांत ३२८ धावा केल्या. सत्यजितने प्रभावी गोलंदाजी करत चार विकेट घेतल्या आणि ईगल व्हॅलेन्टिना संघाच्या फलंदाजांची मधली फळी तंबूत परत पाठवली. खालच्या फळीतील पृथ्वीराज कंड याने एक बाजू रोखून धरली. तरीही दुसऱ्या बाजूने विकेट पडत राहिल्याने जेट्स क्लबने हा सामना ५० धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक
पुनीत बालन क्रिकेट अकादमी : ५० षटकांत ९ बाद ३१७ (सचिन धस ७७, पवन शाह ७२, अंकित बावणे ७१, आनंद ठेंगे नाबाद ३६, सचिन भोसले ४-४९, हितेश वाळुंज ४-५१) विजयी विरुद्ध पुणेरी बाप्पा ः ४६.१ षटकांत सर्वबाद २७४ (आर्यन देसाई ६६, ऋषिकेश सोनावणे ८०, दीपक डांगी ६८, रजनीश गुरुबाणी ३-५४, शुभम मैड २-४६).
डी.वाय.पाटील सी.सी : ५० षटकांत ४ बाद ३४८ (अनिरुद्ध साबळे नाबाद १९४, सौरभ नवले ५४, हर्षल काटे ४६, निमिर जोशी १-४३, साव्या गजराज १-४५, अजय बोरुडे १-६०) पराभूत विरुद्ध कपिल सन्स ः ४९.१ षटकांत ६ बाद ३५१ (अथर्व काळे ९२, अभिषेक जोशी ७०, अनुराग कवडे ४७, ऋषिकेश राऊत ४६, शमशुझामा काझी २-४४, ओंकार मोहिते २-५८).
जेट्स क्लब ः ५० षटकांत ८ बाद ३२८ (सत्यजित बच्छाव ७८, किरण चोरमले ७७, जय पांडे ३९, मनोज इंगळे ३-५९, ओंकार राजपूत २-६६, पृथ्वीराज कंड १-२५) विजयी विरुद्ध ईगल व्हॅलेन्टिना ः ५० षटकांत सर्वबाद २७८ (ओम राजपूत ६६, पृथ्वीराज कंड नाबाद ४६, सुहेल श्रीखंडे ४०, सत्यजीत बच्छाव ४-४३, किरण चोरमले २-६९, संग्राम भालेकर १-१३).
‘डी.वाय.’ची सलामी जोडी फॉर्मात
डी.वाय.पाटील सी.सी संघाची सलामी जोडी अथर्व धर्माधिकारी आणि अनिरुद्ध साबळे यांनी मागील दोन दिवसांत दोन विलक्षण
खेळी केल्या. पहिल्या सामन्यात अथर्व याने ईगल व्हॅलेन्टिना विरोधात १७१ धावांची नाबाद खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात अनिरुद्ध साबळेने कपिल सन्स विरोधात नाबाद १९४ धावांची खेळी केली. डी.वाय.पाटील सी.सीचे सलामीवीर फॉर्ममध्ये असल्याने उर्वरित सामन्यांत ते किती धावा करतात ? याकडेही लक्ष राहिल.
आज होणारे सामने
- पुणेरी बाप्पा विरुद्ध कपिल सन्स ः ब्रिलियंट अकादमी (येवलेवाडी)
- पुनीत बालन क्रिकेट अकादमी विरुद्ध ईगल व्हॅलेन्टिना ः सिंहगड महाविद्यालय (लोणावळा)
- डी.वाय.पाटील सी.सी विरुद्ध जेट्स कल्ब ः नेहरू स्टेडिअम (स्वारगेट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

