पुणेरी बाप्पा संघाच्या रामकृष्ण घोषचा विजयी षटकार

पुणेरी बाप्पा संघाच्या रामकृष्ण घोषचा विजयी षटकार

Published on

पुणे, ता. १० : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्यावतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ‘एमसीए कॉर्पोरेट शील्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पुणेरी बाप्पा संघाच्या रामकृष्ण घोष याने कपिल सन्स संघाविरोधात शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अवघी एक विकेट शिल्लक असताना षटकार मारत रामकृष्ण याने विजयाचा झेंडा फडकाविला. अन्य सामन्यात डी.वाय.पाटील क्रिकेट सेंटर (सी.सी.) आणि पुनीत बालन क्रिकेट अकादमी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
येवलेवाडीमधील ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी येथे पुणेरी बाप्पा विरुद्ध कपिल सन्स हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. प्रथम फलंदाजी करताना कपिल सन्स संघाचा कर्णधार सिद्धेश वीर आणि नीरज जोशी यांनी अर्धशतकीय खेळी केली. तर डावाच्या शेवटी अनुराग कवडे आणि अजय बोरुडे यांनी तुफान फटकेबाजी करत संघाला ३०४ धावांपर्यंत पोहोचविले. पुणेरी बाप्पाच्या सागर जाधव याने चार विकेट घेतल्या. धावांचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पाचा सलामीवीर मुर्तुजा ट्रंकवाला लवकर बाद झाला. मात्र, आर्यन देसाई आणि ऋषिकेश जोशी यांनी डाव सांभाळला. परंतु आर्यन ४५ धावांवर, तर ऋषिकेश ९५ धावांवर बाद झाला आणि विकेट जाण्यास सुरुवात झाली. त्यानंतर रामकृष्ण घोष याने मधल्या व खालच्या फळीबरोबर उत्कृष्ट फलंदाजी केली आणि एक बाजू रोखून धरली. शेवटच्या षटकांत पुणेरी बाप्पा संघाला चार चेंडूत तीन धावांची गरज होती. केवळ एकच विकेट शिल्‍लक असताना रामकृष्ण याने षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. ७१ चेंडूत नाबाद १०२ धावा आणि दोन विकेट, अशा अष्टपैलू खेळीसाठी रामकृष्ण घोष हा सामनावीर ठरला.

नेहरू स्टेडियम येथे झालेल्या जेट्स क्लब विरुद्ध डी.वाय.पाटील सी.सी संघाच्या सामन्यात जेट्स क्लबचा सलामीवीर संग्राम भालेकर पहिल्याच षटकांत बाद झाल्याने जेट्स क्लबवर दडपण आले. मात्र, दुसरा सलामीवीर धीरज फटांगरे याने मधल्या फळीतील फलंदाजांबरोबर भागीदारी करत ८८ धावा केल्या. त्यानंतर निखिल नाईक याने अर्धशतक झळकाविले आणि जेट्स क्लबने ५० षटकांत डी.वाय.पाटील सी.सी समोर २९७ धावांचे आव्हान ठेवले. डी.वाय.पाटील सी.सी संघाचा कर्णधार सौरभ नवले याने नाबाद १३४ धावांची आणि हर्षल काटे याने ५३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सौरभ नवले हा सामनावीर ठरला.
लोणावळा येथील सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर झालेला पुनीत बालन क्रिकेट अकादमी विरुद्ध ईगल व्हॅलेन्टिना हा सामना एकतर्फी झाला. बालन क्रिकेट अकादमीच्या आनंद ठेंगे याने चार, तर वैभव दारकुंडे याने तीन विकेट घेत ईगल व्हॅलेन्टिना संघाला ५० षटकांत २४४ धावांवर रोखले. धावांचा पाठलाग करताना बालन क्रिकेट अकादमीच्या दिग्विजय जाधव आणि राहुल त्रिपाठी यांनी अर्धशतक केले आणि संघाने हा सामना ४१.५ षटकांत पाच विकेट राखून जिंकला. आनंद ठेंगे सामन्याचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक
जेट्स क्लब ः ५० षटकांत ८ बाद २९६ (धीरज फटांगरे ८८, निखिल नाईक ५६, अझीम काझी ३६, ओंकार मोहिते ३-४६, आयुष बिरादार २-४८, सईद इझान २-५७, सोहन जामले १-६०) पाच विकेटने पराभूत विरुद्ध डी.वाय.पाटील सी.सी ः ४८.५ षटकांत ५ बाद २९७ (सौरभ नवले नाबाद १३४, हर्षल काटे ५३, क्रिश शहापूरकर ३३, किरण चोरमले २-५६, प्रदीप दाढे १-४७, कुणाल थोरात १-७३).

ईगल व्हॅलेन्टिना ः ५० षटकांत सर्वबाद २४४ (मेहुल पटेल ५०, रोहन दामले ४६, पृथ्वीराज कंद नाबाद ४३, ओम भोसले ४१, आनंद ठेंगे ४-३३, वैभव दारखुंडे ३-३९, श्रेयस चव्हाण १-३५, शुभम मैड १-५१, विवेक शेलार १-५४) पाच विकेटने पराभूत विरुद्ध पुनीत बालन क्रिकेट अकादमी ः राहुल त्रिपाठी (दुखापतीमुळे निवृत्त) ६३, दिग्विजय जाधव ५६, सचिन धस ३०, मनोज इंगळे २-६३, ओंकार राजपूत १-२१, अक्षय वाईकर १-२९, रोहन दामले १-४१).

कपिल सन्स ः ४९.५ षटकांत सर्वबाद ३०४ (सिद्धेश वीर ७३, नीरज जोशी ५१, अनुराग कवडे ३७, अजय बोरुडे ३१, सागर जाधव ४-६२, रामकृष्ण घोष २-६०, हितेश वाळुंज १-५८, नौशाद शेख १-३५, सचिन भोसले १-६५) एका विकेटने पराभूत विरुद्ध पुणेरी बाप्पा ः ४९.३ षटकांत ९ बाद ३०८ (रामकृष्ण घोष नाबाद १०२, ऋषिकेश सोनावणे ९५, आर्यन देसाई ४५, सिद्धेश वीर ३-४६,
अजय बोरुडे २-३९, सुमीत मार्कली १-४०, निमीर जोशी १-४४, नीरज जोशी १-६५, केदार बजाज १-६८).
-------
शुक्रवारी (ता. १२) होणारे सामने
-पुणेरी बाप्पा विरुद्ध डी. वाय पाटील सी सी ः सिंहगड महाविद्यालय (लोणावळा).
-जेट्स क्लब विरुद्ध पुनीत बालन क्रिकेट अकादमी ः ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी (येवलेवाडी).
-ईगल व्हॅलेन्टिना विरुद्ध कपिल सन्स ः नेहरू स्टेडियम (स्वारगेट).
-------
गुण तक्ता
संघ-सामने-विजय-पराभव-गुण - नेट रनरेट
पुनीत बालन क्रिकेट अकादमी - ३-३-०-१२-१.०२८
डी.वाय.पाटील सी.सी. - ३-२-१-१२-०.४५७
पुणेरी बाप्पा - ३-२-१-१२-०.०१५
जेट्स क्लब - ३-१-२-६-०.०२६
कपिल सन्स - ३-१-२-६- -०.४४३
ईगल व्हॅलेन्टिना - ३-०-३-०- -१.१४०
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com