‘एमसीए’ कॉर्पोरेट शील्ड’मध्ये उद्या उपांत्य फेरीच्या लढती

‘एमसीए’ कॉर्पोरेट शील्ड’मध्ये उद्या उपांत्य फेरीच्या लढती

Published on

पुणे, ता. १३ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ‘एमसीए कॉर्पोरेट शील्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत शनिवारी (ता.१३) साखळी फेरीच्या शेवटच्या दिवशी पुनीत बालन क्रिकेट अकादमी, पुणेरी बाप्पा आणि कपिल सन्स संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. सोमवारी (ता. १५) उपांत्य फेरीच्या सामन्यात पुनीत बालन क्रिकेट अकादमी विरुद्ध डी.वाय.पाटील सी.सी. तर पुणेरी बाप्पा विरुद्ध कपिल सन्स अशी लढत रंगणार आहे.
नेहरू स्टेडियम येथे झालेल्या जेट्स क्लब विरुद्ध कपिल सन्स या सामन्यात जेट्स क्लबने प्रथम फलंदाजी केली. जेट्स क्‍लबचे सलामीवीर लवकरच तंबूत परतले. त्यानंतर जय पांडे आणि किरण चोरमले यांनी शतकी भागीदारी करत धावगतीला चालना दिली. जय पांडे याने शतक, तर किरण चोरमले आणि दिव्यांग हिंगणेकर यांनी अर्धशतकीय खेळी करत कपिल सन्स समोर ५० षटकांच्या अखेरीस ३१९ धावांचे लक्ष्य ठेवले. तनय संघवी याने चार विकेट घेतल्या. धावांचा पाठलाग करताना कपिल सन्सची सलामी जोडी देखील लवकरच परतली. मात्र, कर्णधार सिद्धेश वीर आणि नीरज जोशी यांनी शतकी खेळी करत ३२० धावांचे हे लक्ष्य सहजरीत्या पूर्ण केले. ९९ चेंडूत केलेल्या १०९ धावांच्या खेळीसाठी सिद्धेश वीर हा सामनावीर ठरला.

सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पुनीत बालन क्रिकेट अकादमीने डी.वाय. पाटील सी.सी संघाचा धुव्वा उडविला. पहिल्या डावात पुनीत बालन क्रिकेट अकादमीने डी.वाय. पाटील सी.सी संघाला केवळ ६५ धावांवर गुंडाळले. शुभम मैड याने चार, हार्दिक कुरंगळे याने दोन, विवेक शेलार व संकेत यशवंत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पुनीत बालन क्रिकेट अकादमीने हा सामना केवळ १०.४ षटकांत सात विकेट राखून जिंकला. चार विकेट घेणाऱ्या शुभम मैड याला सामनावीराचा बहुमान मिळाला.

येवलेवाडीमधील ब्रिलियंट अकादमी येथे ईगल व्हॅलेन्टिना विरुद्ध पुणेरी बाप्पा हा सामना देखील एकतर्फी झाला. पहिल्या डावात पुणेरी बाप्पा संघाने ईगल व्हॅलेन्टिना संघाचा डाव २३२ धावांवर गुंडाळला. सागर जाधव याने तीन तर सचिन भोसले, रामकृष्ण घोष, हितेश वाळुंज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. पुणेरी बाप्पा संघासाठी धावांचा पाठलाग तसा सोपाच ठरला. संघाच्या सर्व फलंदाजांना सुरुवात मिळाली. मात्र, नौशाद शेख यानेच फक्त अर्धशतक पूर्ण केले. तरी देखील पुणेरी बाप्पा यांनी हा सामना ३७.५ षटकांत पाच विकेट राखून जिंकला. अर्धशतकीय खेळी करणारा नौशद शेख हा सामन्याचा मानकारी ठरला.

संक्षिप्त धावफलक
जेट्स क्लब ः ५० षटकांत ९ बाद ३१९ (जय पांडे ११३, किरण चोरमले ६८, दिव्यांग हिंगणेकर ५३, तनय संघवी ४-४०, केदार बजाज २-३८, विक्की ओत्सवाल १-३२, सिद्धेश वीर १-३५) चार विकेटने पराभूत विरुद्ध कपिल सन्स ः ४६.१ षटकांत ६ बाद ३२० (सिद्धेश वीर १०९, नीरज जोशी नाबाद १०६, सव्या गजराज नाबाद २९, दिव्यांग हिंगणेकर २-३३, सत्यजीत बच्छाव १-५३, किरण चोरमले १-६१, प्रदीप दाढे १-७१).

डी.वाय.पाटील सी.सी ः २७.५ षटकांत सर्वबाद ६५ (नीरज मोरे २९, शुभम मैड ४-१२, हार्दिक गुरंगळे २-११, संकेत यशवंते १-११, विवेक शेलार १-१६) सात विकेटने पराभव विरुद्ध पुनीत बालन क्रिकेट अकादमी १०.४ षटकांत ३ बाद ६९ (हर्ष मोगावीरा ४१, पवन शाह नाबाद १९, ओंकार मोहिते ३-२९).

ईगल व्हॅलेन्टिना ः ४४.२ षटकांत सर्वबाद २३२ (रोहन दामले ७३, अद्वय सिधये ४३, मनोज इंगळे ३२, सिद्धांत दोशी २१, सागर जाधव ३-५१, रामकृष्ण घोष २-२३, हितेश वाळुंज २-३४, सचिन भोसले २-३५, रोशन वाघसरे १-३९) पाच विकेटने पराभूत विरुद्ध पुणेरी बाप्पा ः ३७.५ षटकांत ५ बाद २३३ (नौशाद शेख ५७, यश नहार ३५, ऋषिकेश सोनावणे ३५, सूरज शिंदे ३३, पृथ्वीराज कंद ३-६३, मनोज इंगळे २-४५).

सोमवारी (ता. १५) होणारे उपांत्य फेरीचे सामने
पुनीत बालन क्रिकेट अकादमी विरुद्ध डी.वाय.पाटील सी.सी ः नेहरु स्टेडियम
पुणेरी बाप्पा विरुद्ध कपिल सन्स ः ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी, येवलेवाडी

गुणतक्ता
संघ-सामने-विजय-पराभव-रनरेट
पुनीत बालन अकादमी-५-५-०-२०-१.६०९
पुणेरी बाप्पा-५-३-२-१२-०.२२२
कपिल सन्स-५-३-२-१२-०.१६५
डी.वाय.पाटील-५-३-२-१२- -०.६१६
जेट्स क्लब-५-१-४-४- -०.१४१
ईगल व्हॅलेन्टिना-५-०-५-०- -१.३९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com