पिंपरी प्रभाग लेखाजोखा
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींची (नगरसेवक, नगरसेविका) मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. मात्र, कोविड प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे न्यायप्रविष्ट प्रकरण यामुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. त्यामुळे १४ मार्च २०२२ पासून राज्य सरकारने प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य सरकारने प्रभाग रचनेबाबत निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना केली आहे. २०१७ प्रमाणेच १२८ सदस्यांसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यामुळे २०१७ ते मार्च २०२२ आणि मार्च २०२२ ते आतापर्यंत असा लोकनियुक्त सदस्य आणि साडेतीन वर्षांचा प्रशासकीय कार्यकाल प्रभागातील नागरिकांना अनुभवला आहे. त्यांची अपेक्षापूर्ती झाली किंवा नाही? याचा आढावा घेणारी ‘प्रभागांचा लेखाजोखा’ वृत्तमालिका आजपासून....
-----
प्रभागांचा लेखाजोखा ः लोगो
प्रभाग एक ः चिखली पाटीलनगर सानेचौक म्हेत्रेवस्ती
---
अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांचे पेव
मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी; धुळीचा त्रास, अरुंद रस्त्यांमुळे गजबजाट
पिंपरी, ता. १४ ः देहू-आळंदी मुख्य रस्त्यासह अन्य मोठ्या रस्त्यांवर अतिक्रमणे, देहू-आळंदी रस्त्यावर जलवाहिनी टाकल्यानंतर रखडलेले डांबरीकरण, पाटीलनगर चौक आणि चिखली पीएमपी थांबा परिसरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी, उडणाऱ्या धुळीचा त्रास, अंतर्गत अरुंद रस्ते, रखडलेले डांबरीकरण, रेडझोनसह गुंठा-अर्धा गुंठ्यातील अनधिकृत बांधकामे आदी समस्यांनी प्रभागाला ग्रासले आहे.
सर्वाधिक दाट लोकवस्तीचा आणि सर्वाधिक मतदारांचा प्रभाग म्हणजे चिखली पाटीलनगर, सानेचौक, म्हेत्रेवस्ती आहे. चाळी, गुंठा-अर्धा गुंठा जागा घेऊन बांधलेली घरे, रेडझोन वाढीव बांधकामे, कंपन्यांसह असंघटित कामगारांची वस्ती, काही प्रमाणात सोसायट्या, स्थानिक भूमिपुत्रांची बैठी घरे, बंगले आणि प्लॅटमध्ये राहणारा असा प्रभागातील मतदार आहे. संमिश्र लोकवस्तीचा हा भाग आहे. देहू-आळंदी आणि चिखली-आकुर्डी हे येथील दोन प्रमख रस्ते. त्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते खूप आहेत. उत्तर-दक्षिण बांधकामे असलेल्या अरुंद उभ्या गल्ल्या आणि टॉवर लाइन परिसरातील घरे अशी येथील रचना आहे. घरमालकांपेक्षा भाडेकरूंची संख्या अधिक आहे. त्यात महाराष्ट्राबरोबरच परप्रांतीय नागरिकांची संख्याही अधिक आहे.
प्रमुख समस्या
- अरुंद रस्ते, मध्येच घरे ः एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला अडचण, रात्री रस्त्यांवरच वाहने उभी
- अतिक्रमणे ः हातगाडी, पथारीवाल्यांचे रस्त्यांवर बस्तान, दुकानदारांचेही अतिक्रमण
- अनधिकृत बांधकामे ः बहुतांश बांधकामे अनधिकृत असून गुंठा-अर्ध्या गुंठ्यात चार-पाच मजली इमारती
- खड्डे व चिखलाचे रस्ते ः जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे असून काही रस्ते कच्चे असल्याने चिखलमय होतात
- दिवसाआड पाणी ः दिवसाआड पाणी येत असल्याने साठवणुकीसाठीच्या टाक्या, ड्रम रस्त्याच्या कडेला
- रस्त्यांवर वाहने ः रिक्षा, चारचाकी वाहने, दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने अरुंद रस्त्यांमुळे रहदारीस वारंवार अडथळा
- धुळीचा सामना ः देहू-आळंदी रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्याचे काम सहा-सात वर्षांपासून सुरू असल्याने डांबरीकरण नाही
- रेडझोन ः प्रभागाचा जवळपास ७५ टक्के भाग देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेडझोन हद्दीत
कुठे? काय?
- मोरे वस्ती, ताम्हाणे वस्ती, म्हेत्रेवस्ती, साने चौक परिसरात अरुंद गल्ल्या, अर्ध्या गुंठ्यात पाच-सहा मजले. आपत्कालीन स्थितीत अग्निशामन बंबही जाऊ शकणार नाही अशी स्थिती, रात्री गल्लीतच वाहने पार्कमुळे अडचणीत वाढ. राजकीय वरदहस्तामुळे भाजीपाला विक्रेते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण
- चिखली ते साने चौक रस्त्याच्या २४ व ३० मीटर रुंदीकरणासाठी सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने बांधकामे पाडली. काही नागरिकांनी
स्वतः बांधकामे हटविली आहेत. भूसंपादन केले आहे. मात्र, अद्याप रुंदीकरण व डांबरीकरण न केल्याने अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे होऊ लागली आहेत
- शेलारवस्ती भागात सर्वाधिक औद्योगिक परिसर आहे. निवासी भाग कमी आहे. मात्र, चिंचोळे रस्ते असून त्यांची सुधारणा केलेली नाही. पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांची वानवा आहे
- पाटीलनगर, धर्मराजनगर, संतपीठ परिसर काही विकसित तर काही विकसनशील भाग आहे. गृहनिर्माण सोसायट्या झाल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्र जवळच आहे. मात्र, आणखी सुविधा पुरविण्याची गरज आहे. पिंगळे रस्त्याचे सत्संग भवनजवळ काम रखडले आहे
चतुःसीमा
उत्तरेला इंद्रायणी नदीपासून दक्षिणेला साने चौक ते म्हेत्रे वस्ती चौक रस्ता, पूर्वेला चिखली गावठाण चौक ते साने चौक रस्ता आणि पश्चिमेला इंद्रायणी नदी व्हूव पॉइंट ते ज्योतिबा मंदिर ते म्हेत्रेवस्ती चौकापर्यंत.
समाविष्ट भाग
देहू-आळंदी रस्ता (तळवडे हद्दीपासून चिखली गावठाण चौकापर्यंत), पाटीलनगर, नाथनगर, शेलारवस्ती, मोरेवस्ती, अंगणवाडी रस्ता, झेंडा चौक रस्ता, म्हेत्रेवाडी (काही भाग), फ्लाइंग बर्ड स्कूल परिसर, सोनिगरा अंगण सोसायटी परिसर, चिखली पीएमपी बस थांबा ते साने चौक रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग.
असे आहेत मतदार
पुरुष ः ४०,३६४
महिला ः ३३,९७२
तृतीयपंथी ः ४
मतदार ः ७४,३४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

