पिंपरी प्रभाग लेखाजोखा
प्रभागांचा लेखाजोखा ः २
---
प्रभाग क्रमांक २ : कुदळवाडी- जाधववाडी- बोऱ्हाडेवाडी
---
राजकीय वरदहस्तामुळे वाढलाय बकालपणा
खड्डे, धुळ आणि खडीचे रस्ते; अतिक्रमणे, अरुंद गल्ल्यांमुळे कोंडी
पिंपरी ः देहू-आळंदी रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांची रखडलेली कामे, खड्डे, पसरलेली खडी आणि उडणारा धूळ ही मोशी बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी प्रभागाची समस्या. महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत हटविलेली कुदळवाडीतील सुमारे नऊशे अनधिकृत बांधकामे, इंद्रायणी नदीच्या पुररेषेतील ३९ बंगले यामुळे परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणी राडारोडा तसाच पडून आहे, भूसंपादन केलेल्या भागात विकास आराखड्यातील रस्ते अर्धवट आहेत, हटविलेल्या अतिक्रमणांच्या ठिकाणी काही प्रमाणात पुन्हा टपरीवजा, पत्राशेड व उघड्यावरची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे बकालपणा पुन्हा वाढला असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकाराला राजकीय हस्तक्षेप कारणीभूत असून, विशिष्ट हेतूने या भागाकडे बघितल्या जाते अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग दोनमध्ये संमिश्र वस्ती आहे. चिखली कुदळवाडी, जाधववाडी, मोशी बोऱ्हाडेवाडीत अरुंद गल्ल्या आहेत. रिव्हर रेसिडेन्सीपासून नाशिक महामार्गापर्यंत आणि जाधववाडीतीतील राजा शिवछत्रपती चौक ते मोशी उपबाजारपर्यंत सोसायट्यांचा परिसर आहे. त्यामुळे पारंपरिक मतदारांसोबतच नव्याने वसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांतील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही नामांकित शैक्षणिक संस्थांची संकुलेही या प्रभागात आहेत. सर्वाधिक भंगाराची दुकाने आहेत. सहा महिन्यांपूर्वी येथील अनधिकृत भंगार दुकानांवर महापालिकेने कारवाई केली. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे भंगाराची दुकाने येथून जातील अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही बहुतांश दुकाने विशेषतः लोखंडी साहित्य, फर्निचर, काच अशा भंगार मालाची दुकाने देहू-आळंदी रस्त्याच्या दोन्ही बाजूस थाटली आहेत. कारवाई केलेल्या ठिकाणी अद्याप राडारोडा पडून आहे. काही ठिकाणी डीपी रस्त्यांची कामे व डांबरीकरण सुरू केले होते. मात्र, सर्वच रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे सोसायट्यांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. या प्रभागात घरमालकांपेक्षा भाडेकरूंची संख्या अधिक आहे. त्यात महाराष्ट्राबरोबरच परप्रांतीय नागरिकांची संख्याही अधिक आहे.
प्रमुख समस्या
- खराब रस्ते ः जलवाहिनी टाकण्यासाठी देहू-आळंदी रस्ता खोदला होता. अद्याप डांबरीकरण नाही, परिणामी धूळ उडते, खडी पसरली आहे
- अतिक्रमणे ः हातगाडी, पथारीवाल्यांचे रस्त्यांवर बस्तान, दुकानदारांचेही अतिक्रमण आहे. नवीन सोसायट्यांच्या परिसरातही हीच स्थिती आहे
- अनधिकृत बांधकामे ः कुदळवाडीतील अनधिकृत भंगाराची दुकाने हटविली होती, आता काही ठिकाणी व देहू-आळंदी रस्त्यालगत दुकाने आहेत
- खड्डे, खडी ः जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत, काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे खडी पसरून अपघात होत आहेत
- दिवसाआड पाणी ः दिवसाआड पाणी येत असल्याने अंतर्गत व गावठाण भागात पाणी साठवणुकीसाठीच्या टाक्या, ड्रम रस्त्याच्या कडेला
- रस्त्यांवर वाहने ः रिक्षा, चारचाकी वाहने, दुचाकी रस्त्याच्या कडेलाच उभ्या केल्या जातात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
- धुळीचा सामना ः देहू-आळंदी रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर जलवाहिन्या टाकण्याचे काम सहा-सात वर्षांपासून सुरू असल्याने डांबरीकरण नाही
कुठे? काय?
- चिखली, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी गावठाणांत अरुंद गल्ल्या, लगतच्या भागात अर्धा-एक गुंठ्यात बांधकामे असून, रुंदीकरण रखडले आहे
- जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी शिवरस्त्यावर पुणे अभियांत्रिकी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सीमाभिंतीलगत पदपथावर भाजीपाला विक्रेते,
फेरीवाल्यांची दुकाने, विक्रेत्यांसह ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडी
- कुदळवाडी परिसरातील भंगाराची दुकाने हटविलेली आहेत, त्या जागेवर पुन्हा भंगाराची दुकाने थाटली आहेत. देहू-आळंदी रस्ता आणि काळेवाडी फाटा बीआरटी रस्त्यालगत ही स्थिती आहे
- जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी शिवरस्त्याचे सुमारे पाचशे मीटरचे कॉंक्रिटीकरण रखडले आहे
- इंद्रायणी नदी समांतर डीपी रस्त्यासह अन्य डीपी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत
- नेहमी वर्दळीच्या कुदळवाडी चौकातील सिग्नल यंत्रणा बंद आहे
चतुःसीमा
उत्तरेला इंद्रायणी नदीपासून दक्षिणेला नागेश्वर महाराज मोशी उपबाजार ते जाधववाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैलगाडा शर्यत घाट ते जाधववाडी गावठाण, कुदळवाडी. पूर्वेला पुणे-नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडे चौक ते इंद्रायणीनदीवरील पूल. पश्चिमेला चिखली गावठाण भाग, मोई चौक ते कुदळवाडी पूल.
समाविष्ट भाग
चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडेन्सी, गंधर्व एक्सलन्स, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, वुड्स व्हिला, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी आदी परिसर
असे आहेत मतदार
पुरुष ः ३५,०८२
महिला ः २९,९२७
तृतीयपंथी ः ८
मतदार ः ५७,६९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

