सकाळ प्रीमियर क्रिकेट लीग

सकाळ प्रीमियर क्रिकेट लीग

Published on

पिंपरी, ता.१६ ः सकाळ माध्यम समूहाच्यावतीने पिंपरी येथे क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्ट्‌स ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत पहिल्या सकाळ प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेला मंगळवारी (ता.१६) जल्लोषात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पुणे पोलिस बॉईज संघाने दोन विजयांची सलामी दिली. साहिल कदम, रिहान पटेल आणि फरहान दर्वेश सामन्याचे मानकरी ठरले.
पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेला सुरुवात झाली. क्रेझी इलेव्हन आणि सुमीत भाऊ इलेव्हन यांच्यात दुपारी पहिला सामना झाला. ऐश्वर्यम ग्रुपचे संचालक नरेंद्र अग्रवाल, हरीश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली.

‘सुमीतभाऊ’ची विजयी सुरुवात
पहिल्या सामन्यात सुमीतभाऊ इलेव्हन संघाने क्रेझी इलेव्हन संघावर १२ धावा राखून मात केली. नाणेफेक जिंकून सुमीतभाऊ इलेव्हनने पहिल्यांदा फलंदाजी करत क्रेझी इलेव्हन संघासमोर ७ षटकांत ३ विकेट गमावून ७५ धावांचे आव्हान ठेवले. त्यामध्ये गणेश भोसले (२८ धावा), मिलिंद शेळके (१६ धावा), सुहास पटेल (१४ धावा) यांचे योगदान राहिले. क्रेझी इलेव्हन संघाला हे आव्हान पेलले नाही. त्यांचे फलंदाज नियमित बाद होत गेले. जय पाटणकर, उज्वल राजपूत यांनी प्रत्येकी १० धावांची भर घातली. अखेरच्या षटकात ११ धावांची गरज असताना संघाची शेवटची विकेट पडली अन् संघाचा डाव ६२ धावांवर आटोपला. साहिल कदम सामन्याचा मानकरी ठरला. त्याने ५ विकेट घेतल्या. तर त्याचा सहकारी प्रमोद शिवरकर २ विकेट घेतल्या. पराभूत संघाकडून निखिल जाधव आणि विकास माटे यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.


पोलिस बॉईजचा एकतर्फी विजय
जय मल्हार स्पोर्टस फाउंडेशन विरुद्ध पुणे पोलिस बॉईजमधील दुसरा सामना एकतर्फी झाला. पुणे पोलिस बॉईज इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेला साजेसा असा खेळ करत पहिल्या डावात अवघ्‍या दोन फलंदाजांच्या मोबदल्यात संघाने ९९ धावांची मोठी धावसंख्या उभी केली. रिहान पटेल याने षटकारांचा पाऊस पाडत २९ चेंडूंत ५५ धावांची दमदार खेळी केली. विशाल धारप याने १० चेंडूंत २४ धावा केल्या. चेतन सुतार २९ धावांत १ आणि सुगंध कुमार याने ३१ धावा एक विकेट घेतली. धावसंख्येचा पाठलाग करताना जय मल्हार स्पोर्टस फाउंडेशन संघाचे फलंदाजी कोलमडली. त्यामुळे विजयासाठी आवश्यक धावगती संघाला राखता आली नाही. एकापाठोपाठ एक विकेट पडल्याने संघाचा डाव अवघ्या ४० धावांत आटोपला आणि पुणे पोलिस बॉईज संघाने हा सामना ५९ धावांनी जिंकला. विजयी संघाचा रिहान पटेल सामन्याचा मानकरी ठरला.

पोलिस बॉईजचा दुसरा विजय
तिसरा सामना पुणे पोलिस बॉईज व सुमीतभाऊ इलेव्हन यांच्यात झाला. पहिल्या सामन्यात विजयी सुरुवात करणाऱ्या सुमीतभाऊ इलेव्हन संघाला तिसऱ्या सामन्यात पुणे पोलिस बॉईज विरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यात सुमीतभाऊ इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित सात षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात संघाने ६५ अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली. त्याचा पाठलाग करताना पोलिस बॉईज संघाने आक्रमक सुरुवात केली. विजयासाठी आवश्यक ६६ धावा ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. तसेच दुसरा विजय मिळवून आपल्या संघाची ताकद दाखविली. फरहान दर्वेश सामन्याचा मानकरी ठरला. त्याने ३२ धावा केल्या.

‘टॅप’चेंडू हाताळताना कसोटी
नाणेफेकीसाठी वैशिष्ट्यपूर्ण नाणे वापरण्यात आले. त्याच्या एका बाजूला ‘सकाळ’ आणि दुसऱ्या बाजूला ‘सकाळ एसपीएल’ असे लिहिलेले आहे. पहिली दोन षटके पॉवर प्ले आणि तिसरे षटक ‘टॅप चेंडू’चे ठेवण्यात आले आहे. सुरुवातीच्या सामन्यांत ‘टॅप चेंडू’ ला सामोरे जाताना फलंदाजांची कसोटी लागली. मात्र, त्याच बरोबर गोलंदाजही टॅप चेंडू हाताळण्यात कमी पडल्याचे दिसून आले. बऱ्याच गोलंदाजांची गोलंदाजी स्वैर झाली. अनेक चेंडू ‘वाईड’ पडल्याचेही दिसून आले.


सकाळ माध्यम समूहाकडून आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये नेहमीच सर्वजण उत्स्फूर्तपणेसहभागी होत असतात. ‘सकाळ’ म्हणजे चांगले
आयोजन अशी ओळख तयार झाली आहे.
- नरेंद्र अग्रवाल, संचालक, ऐश्वर्यम ग्रुप

Marathi News Esakal
www.esakal.com