बिबट्या घेतोय बळी, प्रशासन नाचवताहेत कागदी घोडे
पुणे, ता. १६ : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांतील परिस्थिती बिबट्यामुळे अत्यंत स्फोटक बनली आहे. येथे चाललेला मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष हा आता केवळ वन्यजीव व्यवस्थापनाचा प्रश्न राहिलेला नसून, तो प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेचे ज्वलंत उदाहरण बनले आहे. नागरिकांचे जीवन अक्षरशः टांगणीला लागले असून, प्रशासन मात्र कागदी घोडे नाचविण्यात आणि वेळकाढूपणा करण्यात मग्न आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षांत ८ पेक्षा अधिक बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेले असल्याने प्रशासनाला जाग कधी येणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या समस्येची तीव्रता वाढत असतानाही, वनविभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी दाखवलेली उदासीनता संतापजनक आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात निष्पाप नागरिक आणि शेतकरी बळी पडत असतानाही, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. पिंजरे लावणे, पकडलेल्या बिबट्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडून देणे (जे अनेकदा घडते), किंवा केवळ बैठका घेऊन आश्वासने देणे, यापलीकडे ठोस कृती होताना दिसत नाही. ‘नसबंदी’सारखे उपाय केवळ कागदावरच चर्चेत आहेत, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होणार, हे कुणालाच माहिती नाही. या समस्येवर दीर्घकालीन आणि प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रशासनाकडे पूर्णपणे अभाव आहे. बिबट्यांच्या वाढत्या संख्येमागील मूळ कारणे (उदा. उसाचे पीक, नैसर्गिक अधिवासातील खाद्य कमी होणे) शोधून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी, केवळ तात्पुरते मलमपट्टी केली जात आहे. बिबट्यांच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असला तरी तो मर्यादीत स्वरूपात असून या तंत्रज्ञानालाही बिबट्या चकवा देत असल्याने प्रशासनाकडून होणारी कार्यवाही म्हणजे शून्यच असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. कारण, मानव आणि तंत्रज्ञापेक्षाही बिबट्या एकपाऊल पुढे आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न
आता तरी शासनाला जाग येणार आहे का?
अजून किती मृत्यूची शासन वाट पाहणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापुढे एकाचाही मृत्यू होणार नाही.असे शिरूर तालुक्यात दिलेले आश्वासन वास्तवात कधी येणार?
वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांसाठी जंगलात एक कोटी रुपयांच्या शेळ्या सोडणार असे हास्यस्पद केलेले वक्तव्य जखमेवर मीठ चोळण्यासाठी का?
आमदार शरद सोनवणे यांनी नागपूर येथील अधिवेशनात बिबट्याचा गणवेश घालून केलेली कृती कशासाठी?
मागील दीड वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या आठ घटना
२५ सप्टेंबर २०२४ : रुपेश जाधव (वय ९, तेजवाडी, ता. जुन्नर)
०९ ऑक्टोबर २०२४ : सुजाता रवींद्र डेरे (वय ४०,पिंपरी पेंढार, ता. जुन्नर)
११ एप्रिल २०२४ : मेंढपाळाची मुलगी (वय २, शिरोली खुर्द, ता. जुन्नर)
१० मे २०२४ : नानुबाई सीताराम कडाळे (वय ६० रा. पिंपरी पेंढार,ता. जुन्नर)
१२ ऑक्टोबर २०२५: शिवन्या शैलेश बोंबे (वय ५, रा. पिंपरखेड, ता. शिरूर)
२२ ऑक्टोबर २०२५: भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२, रा. जांबूत, ता. शिरूर)
०२ नोव्हेंबर २०२५ : रोहन विलास बोंबे (वय १३, पिंपरखेड, ता.शिरूर )
१५ डिसेंबर २०२५ : रोहित बाबू कापरे (वय ८, पारगाव तर्फे आळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

