वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा आणि कचऱ्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त

वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा आणि कचऱ्याच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त

Published on

प्रभाग क्रमांक ७ ः भोसरी गावठाण-गव्हाणे वस्ती


अपुरा पाणीपुरवठा अन्
नित्याचीच वाहतूक कोंडी

पिंपरी, ता. १७ ः प्रभाग सातमध्ये पाणीप्रश्‍न आणि वाहतूक कोंडीसारख्या विविध समस्या भेडसावत आहेत. प्रभागात पाणी पहाटे साडेतीन वाजता येते आणि सात वाजता जाते. नागरिक झोपेतून उठेपर्यंतच पाणी जात असल्याने नागरिकांना पाणी भरणे शक्य होत नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्त्यावरील पथारीचालकांचे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पुनर्वसन केले होते. पण अनेक पथारीचालक पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

निवडणूक विधानसभेची असो की महापालिकेची, भोसरी गाव नेहमीच केंद्रस्थानी असते. गावकी आणि भावकी यावरच निवडणुकीच्या विजयाची गणिते ठरलेली असतात. महापालिकेचा प्रभाग क्रमांक सात हा आमदार महेश लांडगे यांचे होमग्राऊंड. भोसरी गावठाण, गव्हाणे वस्ती, लांडेवाडी हा सर्व परिसर भोसरीचा कोअर प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ आदी परिसर नंतर विकसित झाला आहे. या प्रभागात स्थानिक ग्रामस्थांबरोबरच इतर जिल्ह्यातून आलेला मतदारदेखील मोठ्या संख्येने आहे. लांडेवाडी व शांतिनगर परिसरात झोपडपट्टी वसली आहे. या परिसरातील घरांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून लघुउद्योग सुरू केले आहेत. झोपडपट्टी भागात कचरा संकलन आणि अंतर्गत रस्त्यांची प्रमुख समस्या आहेत. काही बेशिस्त नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. अनधिकृत बांधकामेही जोरात सुरू आहेत. भोसरीत पुणे नाशिक महामार्गावर पीएमपीएमएलचा बसथांबा आहे. या सर्व बस रस्त्यावर थांबत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पीएमपीएमएलचा बसथांबा इतर ठिकाणी हलवून सेवा रस्ता मोकळा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पदपथ आहेत की नाही हा प्रश्‍न उपस्थित होतो.

काय? कुठे?
- शांतिनगर येथे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम
- महात्मा शाळेसमोरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम प्रलंबित
- राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली अर्बनसिटीचे काम अपूर्ण
- चांदणी चौकात दररोज वाहतूक कोंडी
- राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पथारी चालकांचे केलेले पुनर्वसन फसले

प्रमुख समस्या
- अपुरा पाणीपुरवठा ः सकाळी साडेतीन वाजता प्रभागात पाणी येते. पाण्याचा अपुरा आणि विस्कळित पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत
- रस्त्यावर वाहने ः पुणे नाशिक महामार्ग, लांडेवाडी परिसरात रस्त्यावर ट्रॅव्हल्स थांबत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या कडेलाच रिक्षा आणि खासगी वाहने उभ्या राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे
- अनधिकृत बांधकामे ः पादचाऱ्यांनी पदपथावर अतिक्रमण केले असल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड झाले आहे. दुकानदारांनी देखील पदपथावर अतिक्रमण केल्याचे दिसून येते
- विनापरवाना बांधकाम ः विनापरवाना बांधकाम जोरात सुरू आहेत. काही ठिकाणी तर दोन तीन मजली बांधकाम झाले आहे
- वीजपुरवठा खंडित ः परिसरात विविध कारणांनी वीजपुरवठा खंडित होत आहे. एकदा वीजपुरवठा खंडित झाला की दीड ते दोन तास वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले
- पार्किंग समस्या ः प्रभागात वाहन पार्किंगची समस्या गंभीर आहे. वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो
- पीएमपीएमएल बसथांब्याची समस्या ः पीएमपीएमएल बस रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे

चतुःसीमा
दक्षिणेकडील सीमा अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते शंभर बेड रुग्णालयाचा डावीकडील भाग, उत्तरेकडील सीमा लष्करी
अभियांत्रिकी महाविद्यालयाची (सीएमई) सीमा भिंत, पूर्वेकडील पुणे नाशिक महामार्गावरील सेवा रस्त्याच्या बीआरटीएस टर्मिनल ते शितलबाग, पश्‍चिम सीमा टेल्को रस्ता

समाविष्ट भाग
शितलबाग, सेंच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतिनगर

असे आहेत मतदार
पुरुष ः २१,९३०
महिला ः १७,८७४
इतर ः ०
एकूण मतदार ः ३९,८०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com