बालन अकादमीला दुसऱ्या पर्वाचे अजिंक्यपद
पुणे, ता. १६ ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) यांच्यावतीने आणि सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने आयोजित ‘एमसीए कॉर्पोरेट शील्ड’ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पूर्णपणे अपराजित राहत पुनीत बालन क्रिकेट अकादमी संघाने कपिल सन्स संघाचा ८९ धावांनी पराभव करत मोठ्या दिमाखात दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद पटकाविले. संघाने स्पर्धेतील आतापर्यंत विक्रमी धावसंख्या उभारली. शतकवीर पवन शाह, सचिन धस यांच्यासह वेगवान अर्धशतक करणारा सिद्धार्थ म्हात्रे हे विजयाचे शिल्पकार ठरले. तर १२६ धावांची खेळी करणारा पवन शाह सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक रियाज बागवान यांच्या हस्ते झाले. एमसीएचे माजी सदस्य शुभेंद्र भांडारकर, सुशील शेवाळे, क्लब ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रोहित थोरवे, प्रायोजक काव्या कमलदीप, इगल व्हॅलेंटिनाचे सहमालक संतोष बांदल
आदी उपस्थित होते.
कपिल सन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तो आत्मघातकी ठरला. डावाच्या पहिल्याच चेंडूने खेळपट्टी पाटा असल्याचे स्पष्ट केले. बालन क्रिकेट अकादमीचे सलामीवीर हर्ष मोगावीरा आणि पवन शाह यांनी तडाखेबाज सुरुवात केली. पहिल्या नऊ षटकांत ७६ धावांची खेळी करत कपिल सन्सच्या गोलंदाजांना त्यांनी दबावाखाली टाकले.
सचिनचे पुन्हा शतक
उपांत्यफेरीत शतकी खेळी करणाऱ्या सचिन धस याने अंतिम सामन्यात देखील शतक झळकाविले. पवन शाह याच्यासोबत १५७ धावांची शतकी भागीदारी करत त्याने दोन्ही सामन्यांत संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. सचिन याने १०३ चेंडूत ११३ धावा, तर पवन याने ११२ चेंडूत १२६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ३३ षटकांत २३३ धावांवर नेऊन ठेवली.
अखेरच्या दहा षटकांत सिद्धार्थ म्हात्रे याने जबरदस्त प्रहार केला. ४५ चेंडूंत ८८ धावा करत डावाच्या शेवटी त्याने तुफान फटकेबाजी केली. अजय बोरुडेच्या ४९ व्या षटकात सिद्धार्थने चार षटकार आणि एक चौकार मारला. ५० षटकांच्या अखेरीस विजेतेपदासाठी कपिल सन्स समोर ४०५ धावांचा डोंगर रचला.
कपिल सन्सची दाणादाण
धावांचा पाठलाग करताना कपिल सन्स संघाचे पहिले तीन फलंदाज केवळ १८ धावांवर बाद झाले. मात्र, त्यानंतर कर्णधार सिद्धेश वीर आणि नीरज जोशी यांनी संघाची धुरा सांभाळली. दोघांनीही अर्धशतक करत शतकी भागीदारी केली. अनुराग कवडे आणि अथर्व काळे यांनी देखील अर्धशतक केले. कपिल सन्सच्या मधल्या फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. परंतु कोणीही मोठ्या खेळीमध्ये त्याचे रूपांतर करू शकले नाही. परिणामी, रजनीश गुरबानी, शुभम मैड, सिद्धार्थ म्हात्रे आणि जलज सक्सेना यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आणि कपिल सन्सचा संघ ४४.५ षटकांत ३१४ धावांवर सर्वबाद झाला. पुनीत बालन क्रिकेट अकादमीने ८० धावांनी हा सामना जिंकून चषक पटकाविला.
संक्षिप्त धावफलक
पुनीत बालन क्रिकेट अकादमी ः ५० षटकांत ७ बाद ४०४ (पवन शाह १२६, सचिन धस ११३, सिद्धार्थ म्हात्रे ८८, हर्ष मोगावीरा ४४, तनय संघवी ३-८३, नीरज जोशी १-२७, अर्शिन कुलकर्णी १-७९) ८९ धावांनी विजयी विरुद्ध कपिल सन्स ः ४४.५ षटकांत सर्वबाद ३१५ (अनुराग कवडे ८३, सिद्धेश वीर ७२, नीरज जोशी ५०, अथर्व काळे ४४, रजनीश गुरबानी २-४१, सिद्धार्थ म्हात्रे २-४५, शुभम मैड, जलज सक्सेना २-६१, आनंद ठेंगे १-३३).
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज
फलंदाज-संघ-धावा-स्ट्राईक रेट
१.सिद्धेश वीर - कपिल सन्स - ४४६ - ११७.६८
२.अनिरुद्ध साबळे - डी.वाय.पाटील सी.सी. - ३९८ -१०४.१९
३. सचिन धस - बालन अकादमी - ३९३ - १०७.९७
४. पवन शाह - बालन अकादमी - ३९२ - ९४.६९
५. ऋषिकेश सोनावणे - पुणेरी बाप्पा - ३७० - ९८.९३
-
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज
गोलंदाज - संघ - विकेट - इकॉनॉमी
१. रजनीश गुरबानी - बालन अकादमी - १४- ५.२४
२. शुभम मैड - बालन अकादमी - १३ - ४.२०
३. ओंकार मोहिते - डी.वाय. पाटील -१२ - ५.२३
४. सागर जाधव - पुणेरी बाप्पा - १२ - ६.७६
५.सचिन भोसले - पुणेरी बाप्पा - ११- ६.१८
स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये
- स्पर्धेत सचिन धस, पवन शाह, अनिरुद्ध साबळे, सिद्धेश वीर यांची प्रत्येकी दोन शतके
- डी. वाय.पाटील सी.सी संघाच्या अनिरुद्ध साबळे याची कपिल सन्स विरुद्धची नाबाद १९४ धावांची खेळी ही स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळी.
- बालन अकादमीने अंतिम सामन्यात कपिल सन्स विरुद्ध केलेली ४०४ धावसंख्या ही स्पर्धेत संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या - डी.वाय.पाटील सी.सी संघाने बालन अकादमी विरुद्ध केलेली ६५ धावांची खेळी ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली.
- कपिल सन्सने डी.वाय.पाटील सी.सी.विरुद्ध १४९ धावांचा यशस्वी पाठलाग ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
