देशी बियांच्या संवर्धनाचा मायलेकाने घेतला वसा

देशी बियांच्या संवर्धनाचा मायलेकाने घेतला वसा

Published on

वेदिका आटोळे : सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. १९ : रासायनिक खते व संकरित बियाण्यांमुळे वाढलेल्या शेती उत्पादनाच्या खर्चामुळे आणि मातीच्या घटलेल्या सुपिकतेमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना बारामती तालुक्यातील सावंतवाडी येथील शेतकरी मिलिंद सावंत आणि त्यांची आई समिंद्राताई यांनी नैसर्गिक शेतीचा मार्ग निवडला आहे. देशी बियाण्यांचे जतन व संवर्धन करत त्यांनी शेतीतून चव, आरोग्य आणि परंपरेचे जतन केले आहे.
देशी बियाण्यांपासून कमी खर्चात, दर्जेदार आणि टिकाऊ उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकरी मिलिंद सावंत यांना आला. त्यासाठी त्यांना नैसर्गिक शेतीचे जनक डॉ. सुभाष पाळेकर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग बारामती, तसेच बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्यांनी शून्य बजेट नैसर्गिक शेतीचे तंत्र असलेल्या एसपीके (सुभाष पाळेकर कृषी) पद्धतीने नैसर्गिक शेती व देशी बियाण्यांकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेतात कोणतीही रासायनिक खते किंवा औषधे न वापरता देशी वाण पिकांची लागवड केली जाते. पारंपरिक व घरगुती पद्धतीने बियाण्यांची साठवण केल्याने त्यांची उगवण क्षमता टिकून राहते. देशी पिकांची चव, सुगंध आणि पोषणमूल्य वेगळेच असते.

बियाणे बँक उपक्रम
मिलिंद सावंत यांनी आजोबा, आई-वडिलांकडून मिळालेली काही जुनी देशी बियाणे त्यांनी काळजीपूर्वक जपून ठेवली होती. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून गावोगावी फिरून, ज्येष्ठ शेतकऱ्यांकडून माहिती घेत नामशेष होणाऱ्या पिकांचा शोध घेतला. देशी बियाणे स्वतःपुरते न ठेवता देशी बियाणे बँक सुरू केली आहे. गरजू शेतकऱ्यांना नाममात्र दरात बियाणे दिले जाते. अनेकजण स्वतः येऊन बियाणे घेतात, तर काहींना पोस्टाद्वारे घरपोच बियाणे पाठवले जाते. आज त्यांच्या देशी बियाणे बँकेत १७० पेक्षा अधिक दुर्मीळ जाती सुरक्षित आहेत. यामध्ये देशी पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय, लष्करी वाल, धान्य, कडधान्य, कंदमुळे, तेलबिया, फुले, मिलेट्स, देशी वृक्षप्रजाती, तसेच औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

थेट विक्रीतून आर्थिक फायदे
मधुमेह, रक्तदाब, कर्करोग यांसारख्या आजारांमध्ये देशी धान्यांची मागणी वाढत आहे. बारामती, दौंड, इंदापूर आणि फलटण तालुक्यातील एसपीके पद्धतीने नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्र करून ‘बारामती नॅचरल शेतकरी गट’ स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून विषमुक्त भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री केली जाते. कमी उत्पादन खर्च, चांगला दर आणि थेट ग्राहकांशी संपर्क यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.

प्रशिक्षण व जनजागृती
शाळा, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे आणि शेतकरी गटांमध्ये देशी बियाण्यांचे महत्त्व व नैसर्गिक शेतीविषयी मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या प्रेरणेतून अनेक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत.

मिळालेले पुरस्कार
कृषिरत्न पुरस्कार, बिजमाता पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार, प्रोग्रेसीव्ह फार्मर पुरस्कार, सीड्स सेव्हर पुरस्कार.

देशी बियाणे जपणे म्हणजे केवळ शेती करणे नाही, तर पुढील पिढीसाठी अन्न, आरोग्य आणि स्वातंत्र्य जपणे होय. घरातील
परंपरेतून मिळालेला हा ठेवा आम्ही जपला, वाढवला आणि समाजासाठी खुला केला आहे. देशी बियाणे राखा, भावी गुलामी रोखा आणि चला पुन्हा निसर्गाकडे.
- समिंद्राताई सावंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com