‘एसव्हीएन’, ‘फ्युरियस इलेव्हन’, ‘झुंजार इलेव्हन’चे रोमहर्षक विजय
पिंपरी, ता.१८ ः सकाळ माध्यम समूहाच्यावतीने पिंपरी येथे आयोजित क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्ट्स ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत पहिल्या सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये गुरुवारी (ता.१८) साखळी फेरीत संतोष नीलेश विशाल क्रिकेट क्लब (एसव्हीएन), फ्युरियस इलेव्हन, झुंजार इलेव्हन आदींनी रोमहर्षक विजय मिळविले. पिंपरी येथील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.
‘एसएनव्ही’चा सहज विजय
दिवसातील पहिल्या सामन्यात संतोष नीलेश विशाल क्रिकेट क्लबने (एसव्हीएन) शास्त्री स्पोर्टस क्लबवर (एसएससी) ३३ धावांनी सहज विजय मिळविला. अष्टपैलू खेळीबद्दल धीरज दोडवानी सामन्याचा मानकरी ठरला.
कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा परदेशी, शिक्षिका लता सानप यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. ‘एसएससी’चा कर्णधार अनिल यादव याने क्षेत्ररक्षण स्वीकारले. ‘एसएनव्ही’ संघाने निर्धारित ७ षटकांत ३ बाद ९० धावांचे कडवे आव्हान उभे केले. त्यामध्ये धीरज दोडवानी याच्या १० चेंडूंत २४ तर संदीप याच्या १६ चेंडूंत २२ धावांचे महत्वाचे योगदान राहिले. स्वप्नील सुर्वे याने १४ आणि नीलेश याने ११ धावांची भर घातली. ९० धावसंख्येचा पाठलाग करताना ‘एसएससी’ संघाचा डाव ४ विकेटच्या मोबदल्यात ५७ धावांवरच आटोपला. त्यामध्ये अंकितच्या १२ चेंडूंत नाबाद १६ धावा, मनोजच्या १२ चेंडूंत १४ धावांचा समावेश होता. ‘एसएससी’कडून संस्कार आणि सूरज यांनी प्रत्येकी एकेक तर ‘एसएनव्ही’कडून धीरज दोडवानी, राजू, दिनेश आणि सचिन यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.
फ्युरियसची संघर्षपूर्ण बाजी
स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात फ्युरियस इलेव्हन संघाने झुंजार इलेव्हन संघावर ४ विकेट राखून विजय मिळविला. तडाखेबंद खेळीबद्दल रोहित कदम सामन्याचा मानकरी ठरला.
सामाजिक कार्यकर्ते संदीप वाघेरे, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे उपाध्यक्ष प्रवीण माने, पुणे वृत्तपत्र संघाच्या काळेवाडी विभाग प्रमुख अशोक झांजले यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. झुंजार इलेव्हन संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने ७ षटकांत ६ विकेटच्या बदल्यात ७९ धावा काढल्या. शुभम मगाडे १३ चेंडूंत २५, रोहन मस्के याने ८ चेंडूंत १८, सर्वेश शिंदे याने ६ चेंडूंत १२ तर ऋतिक तारु याने ६ चेंडूंत ११ धावांचे योगदान दिले. फ्युरियस इलेव्हनने हे आव्हान ६.४ षटकांतच गाठले. यश सांगळे याने ७ चेंडूंत २१, संकेत जवारी याने ८ चेंडूंत १३ तर अनिकेत प्रधान याने ७ चेंडूंत १२ धावा केल्या. परंतु, रोहित कदम याने झुंजार फलंदाजीचे दर्शन घडविले. २० धावांची आवश्यकता असताना अवघ्या ४ चेंडूंमध्ये रोहितने २ चौकार व २ षटकार खेचत सामना आपल्या संघाच्या बाजूने वळविला. विजयी संघाच्या यश सांगळे, हरेश पर्चा यांनी प्रत्येकी २ विकेट व अशू गुंड याने १ विकेट घेतली. पराभूत संघाकडून अनिल वाल्मीकी याने ३, मयूर ललवानी याने २ आणि कार्तिक के.याने १ विकेट घेतली.
झुंजार इलेव्हनकडून मात
झुंजार इलेव्हन संघाने एसएससी संघावर तिसऱ्या साखळी सामन्यात २१ धावांनी मात केली. एका षटकात ४ धावांच्या बदल्यात २ विकेट घेतल्याबद्दल गोलंदाज शंकर जगताप सामनावीर ठरला.
स्पर्धेतील तिसरा सामना दुपारी सव्वा वाजता सुरू झाला. अभय ॲड.चे लतीश बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली. कर्णधार कार्तिक कटाळे याच्या नेतृत्वाखालील झुंजार इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ७ बाद ६८ धावा केल्या. त्यात कार्तिक के. याने १० चेंडूंत १९, मयूर ललवानीने १० चेंडूंत १३, ओंकार तारु याने ३ चेंडूंत नाबाद ११ तर योगेश कांबळे याच्या ५ चेंडूंत नाबाद ७ धावांचा समावेश राहिला. आव्हानाचा पाठलाग करताना एसएससी संघाचा डाव ६ षटकांत ६ बाद ४७ धावांवरच आटोपला. मनोज यादवने ११ तर अवीने १० धावा केल्या. विकी शर्मा, चंद्रशेखर आर.हे ६ धावांवर नाबाद राहिले. विजयी संघाकडून चंद्रशेखर आर.ने २३ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेतल्या. संस्कार याने २ तर
अनिल यादव, सूरज यादव यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. पराभूत संघाकडून शंकर जगताप व अनिल वाल्मीकी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. ऋतिक तारु, ओंकार तारु यांनी एकेक विकेट घेतल्या.
धीरज दोडवानीची पुन्हा कमाल
दिवसभरातील चौथ्या सामन्यात धीरज दोडवानीच्या तोडफोड फलंदाजीच्या जोरावर ‘एसव्हीएन’ संघाने फ्युरियस इलेव्हनला ७ विकेटने हरविले. प्रथम फलंदाजी करताना फ्युरियस संघाने ६ षटकांत ४ बाद ६५ धावा केल्या. त्यामध्ये रोहित कदम याच्या ९ चेंडूंतील नाबाद २५ धावांचे मोठे योगदान राहिले. त्याने दोन चेंडूंवर सलग षटकार खेचले. सुमीत कदम याने १५ धावा केल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना धीरज दोडवानी यानेही फ्युरियसची गोलंदाजी फोडून काढत १६ चेंडूंत ४२ धावा केल्या.
विजयी संघाकडून सचिन डी.याने २, धीरज दोडवानीने १ व राजूने १ विकेट घेतली. पराभूत संघाकडून अशु गुंड याने २ विकेट घेतल्या. धीरज दोडवानी सामन्याचा मानकरी ठरला.
तत्पूर्वी, बुधवारी रात्री झालेल्या अतिशय रोमहर्षक सामन्यात अमरभाऊ काटे फाउंडेशनने रायझिंग स्टार इलेव्हनवर १४ धावांनी मात केली. विजयी संघाचा सचिन गवळी याला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी करताना अमरभाऊ काटे संघाने ७ षटकांत ८ विकेट गमावत तब्बल १०० धावांचा डोंगर उभा केला. त्यामध्ये सचिन गवळी याच्या १५ चेंडूंत ३९ धावांची खेळी महत्वपूर्ण ठरली. राहुल एस.ने २०, दिग्विजय जी.ने १४ तर सौरभ एस.ने १२ धावा केल्या. धावसंख्येचे आव्हान स्वीकारत रायझिंग स्टारने झुंजार खेळी केली. मानल एस., रोहित भोर यांनी प्रत्येकी २७ धावा केल्याने सामन्यात रंगत आली. राकेश एस.याने नाबाद १४ तर राम एस.याने नाबाद ७ धावा केल्या. विजयी संघाकडून राहुल एस.याने ३, सचिन गवळी आणि मयूर के.यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. पराभूत संघाकडून राम एस. सॅम जी. यांनी प्रत्येकी ३ विकेट तर राकेश एस.याने १ विकेट घेतली.
अन्य सामन्यात समीर रबर संघाने झुंजार स्पोर्टस क्लबवर ८ विकेट राखून मात केली. विजयी संघाच्या विशाल एन. (४ विकेट), नायक चौहान (३ विकेट) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर झुंजारचा डाव केवळ ३७ धावांवरच गुंडाळला गेला. चेतन एस.याने सर्वाधिक १६ धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना समीर रबर संघाने ५ षटकांत २ विकेटच्या बदल्यात सहज विजय मिळविला.
रात्री उशीराने झालेल्या सामन्यात अमरभाऊ काटे स्पोर्टस फाउंडेशनने समीर रबर संघावर ७ विकेट राखून मात केली. समीर रबर संघाने ६ षटकांत ६ बाद ५५ धावा केल्या. त्यात मयूर गोखले याच्या २५, वजीरच्या ११ धावांचा समावेश होता. राज डी.याच्या १४ चेंडूंत नाबाद ३१ धावांच्या जोरावर अमरभाऊ काटे स्पोर्टस संघाने सामना खिशात घातला. विजयी संघाच्या सचिन गवळी याने ४, मयूर के.याने २ विकेट तर पराभूत संघाकडून हसन पठाण, नायक चौहान, विशाल एन.यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.
अखेरच्या सामन्यात रायझिंग स्टारने ६ बाद ४४ धावा केल्या. हे आव्हान झुंजार स्पोर्टस क्लबने ६ विकेट राखून सहज पार केले. विजयी संघाकडून ऋतिक तारु (२३), कार्तिक के. (नाबाद १३), अंकित जी.(३ विकेट), सुचित आर.(२ विकेट) यांनी चांगला खेळ केला. तर पराभूत संघाकडून रोहित भोर (१७ धावा), सॅम जी.(३ विकेट) यांनी प्रेक्षणीय खेळ केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

