प्रभाग लेखा - जोखा

प्रभाग लेखा - जोखा

Published on

प्रभागांचा लेखाजोखा
---
प्रभाग क्रमांक १२ : तळवडे-रुपीनगर

असुविधा; कोंडी अन् रेडझोन

पिंपरी, ता. १९ ः अरुंद रस्ते, त्यावरही जागा दिसेल तेथे उभी राहणारी वाहने, यामुळे वाहतूक कोंडीत भर, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, सांडपाण्यासाठी सुविधा नाही, महापालिकेला कर भरूनही पायाभूत सुविधांचा अभाव, रेडझोनमुळे विकासकामांना अडथळा अशा समस्यांना प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. सर्व सामान्य कामगार, स्थानिक नागरिक व्यावसायिक, वाढते परप्रांतीय नागरिक तसेच मराठवाडा व विदर्भातील नागरिकांची लोकवस्ती असलेला तळवडे-रुपीनगर प्रभाग आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक भाग रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे प्रभागातील रहिवाशांवर रेडझोनची टांगती तलवार कायम आहे.

आयटी पार्क व औद्योगिक क्षेत्र असलेला प्रभाग म्हणजे तळवडे गावठाण, रुपीनगर, ज्योतिबानगर आहे. या भागात आयटी कंपनीसह छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. तळवडे गावठाण व परिसरात दाट लोकवस्ती आहे. प्रभागाच्या पश्चिमेला लष्कराची हद्द असल्याने रेडझोन आहे. त्यामुळे या प्रभागाचा बहुतांश भाग रेडझोनमध्ये येतो. गुंठा, अर्धा गुंठा जागा घेऊन बांधलेली घरे, रेडझोनमधील अनधिकृत बांधलेली घरे, तळवडे गावठाण व परिसरातील स्थानिकांची बैठी व मोठी घरे, बंगले तर दुसरीकडे ज्योतिबानगर भागात छोट्या, मोठ्या कंपन्या, वर्कशॉप, विविध दुकाने आहेत. रुपीनगर, सहयोगनगर भागात बैठी घरे अशी या प्रभागाची रचना आहे. निगडीहून तळवडेमार्गे चाकण एमआयडीसीकडे जाणारा रस्ता प्रभागात आहे. या मार्गावरून जोडणारे अंतर्गत रस्ते आहेत खूपच अरुंद आहेत. कामगारांची संख्या अधिक आहे.

चतुःसीमा
उत्तरेला इंद्रायणी नदी
पूर्वेला चिखली
दक्षिणेला ओटास्कीम
पश्चिमेला लष्करी भाग

समाविष्ट भाग
तळवडे गावठाण, तळवडे एमआयडीसी, आयटी पार्क, जोतिबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, शिवसृष्टी सोसायटी परिसर.

प्रमुख समस्या
- वाहतूक कोंडी ः चाकण एमआयडीसी व तळवडे आयटी पार्क तसेच तीर्थक्षेत्र देहूकडे जाणारी वाहने याच मार्गाने जात असल्याने त्रिवेणीनगर ते तळवडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, ज्योतिबानगर चौक, गणेशनगर चौक, टॉवर लाईन चौक, तळवडे गावठाण चौक, कॅनबे चौक या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.
- रखडलेले कमानीचे काम ः पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द सुरू होत असलेल्या तळवडे हद्दीत देहू रिंगरोडजवळ अनेक दिवसांपासून स्वागत कमान उभारणीचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यातच लोखंडी अँगल उभारले असून, यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
- कमी दाबाने पाणीपुरवठा ः दिवसाआड पाणीपुरवठा, तोही कमी दाबाने होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
- रेडझोन : प्रभागाचा बहुतांश भाग रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत. नागरिकांना अधिकृत बांधकामे करता येत नाही. सध्याच्या बांधकाम धारकांकडून महापालिका कर वसूल करीत आहे. या तुलनेत सुविधा पुरवीत नाही.
- अरुंद रस्ते ः त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्याला मिळणारे अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनही जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
- अविकसित डीपी रस्ते : बहुतांश डीपी रस्ते विकसित केलेले नाहीत.

कुठे? काय?
- त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्याने जाताना व येताना दोन्ही बाजूला दोन लेन आहेत. मात्र, गणेशनगर चौकात आल्यानंतर येथे दोन्ही बाजूला
एक-एकच लेन राहते. यामुळे या मार्गाने येणारी वाहने येथे अडकून पडून वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या लांब रांगा लागतात.
- रुपीनगरमधील सप्तशृंगी सोसायटी, ईगल सोसायटी, ज्ञानदीप विद्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते खूप अरुंद आहेत. त्यावरही वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहन जाणे तर दूरच पायी जाण्यासाठीही रस्ता शिल्लक नसतो.
- तळवडे चिखली शिव रस्ता अद्याप पूर्ण नाही. हा रस्ता झाल्यास त्रिवेणीनगर- तळवडे रस्त्याला पर्यायी रस्ता झाला असता. वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
- तळवडेसह बहुतांश भाग देहूरोड दारुगोळा कारखान्याच्या रेडझोन हद्दीत आहे. त्यामुळे ९० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकामे अनधिकृत ठरतात.

असे आहेत मतदार
पुरुष : २४,६४७
स्त्री : १९,९८२
इतर : ५६
एकूण : ४४,६८५
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com