विघ्नहर्ता स्पोर्टस, दिघी वॉरियर्स, प्रहार इलेव्हनची आगेकूच

विघ्नहर्ता स्पोर्टस, दिघी वॉरियर्स, प्रहार इलेव्हनची आगेकूच

Published on

पिंपरी, ता.१९ ः सकाळ माध्यम समूहाच्यावतीने पिंपरी येथे आयोजित क्रिसाला ग्रुप आणि अनुप मोरे स्पोर्टस ॲण्ड सोशल फाउंडेशन प्रस्तुत पहिल्या सकाळ प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये शुक्रवारी (ता.१९) साखळी फेरीत विघ्नहर्ता स्पोर्टस क्लब, दिघी वॉरियर्स, प्रहार इलेव्हन आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघांना नमवत आगेकूच चालू ठेवली.

विघ्नहर्ताची विजयी सलामी
दिवसातील पहिल्या सामन्यात विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबने प्रहार इलेव्हनचा सहा विकेटने पराभव केला. दोन निर्णायक विकेट घेणारा पोपट दिघे हा सामनावीर ठारला. प्राचार्य सुभाष पारधे यांच्या उपस्थित नाणेफेक झाली. प्रथम गोलंदाजी करताना विघ्नहर्ता स्पोर्टसने प्रहार इलेव्हनला सात षटकांत आठ ४५ धावांवर रोखले. पोपट दिघे आणि विकास राठोड यांनी प्रत्येकी दोन, तर अमर गोरे आणि तुषार रणदिवे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. धावांचा पाठलाग करताना विघ्नहर्ताच्या आदित्य याने नाबाद २३ धावांची खेळी केली. तर अंकुश लोहार याने विजयी षटकार मारला. विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबने ५.१ षटकांत हा सामना जिंकला.

साहिलची अष्टपैलू खेळी
स्पर्धेच्या दुसऱ्या साखळी सामन्यात दिघी वॉरियर्स संघाने मंगलमूर्ती वॉरियर्स संघावर तब्बल ३६ धावांनी मात केली. ११ चेंडूंत २७ धावा आणि तीन विकेट घेणारा दिघी वॉरियर्स संघाचा साहिल पवार हा सामन्याचा मानकारी ठरला. प्रथम फलंदाजी करताना दिघी वॉरियर्सच्या साहिल पवार याने वेगवान फलंदाजी करत धावसंख्येला चालना दिली. तर रोहित भालेराव याने देखील पाच चेंडूंत नाबाद १४ धावांची खेळी करत संघाला सात षटकांत ७६ धावांवर पोहोचविले. अनुज रोडे याने तीन विकेट घेतल्या. मंगलमूर्ती वॉरियर्सने धावांचा पाठलगा करताना निरंतर विकेट सोडल्या आणि ६.१ षटकांत ते सर्वबाद झाले. अर्शद चौधरी आणि साहिल पवार यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर रत्नीश यादव, राहुल जोगदिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. दिघी वॉरियर्सने ३६ धावांनी सामना जिंकला.

विघ्नहर्ताचा पुन्हा विजय
साखळी फेरीतील तिसरा सामना हा पहिल्या दोन्ही सामन्यांतील विजेत्या संघांत म्हणजे विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब आणि दिघी वॉरियर्स यांच्यात रंगला. त्यामध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट्सने दिघी वॉरियर्स संघावर नऊ विकेटने मात करत आगेकूच सुरू ठेवली. तीन विकेट घेणारा विघ्नहर्ताचा गोलंदाज स्वप्नील देवकर सामन्याचा मानकारी ठरला. पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्या उपस्थितीत नाणेफेक झाली. प्रथम गोलंदाजी करत विघ्नहर्ता संघाने दिघी वॉरियर्स संघाला सहा षटकांत सर्वबाद केले. स्वप्नील देवकर, विकास राठोड यांनी प्रत्येकी तीन विकेट तर पोपट दिघे आणि अर्शद चौधरी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. विघ्नहर्ताच्या आदित्य जाधव याच्या नाबाद २५ आणि तुषार रणदिवे याच्या २१ धावांच्या जोरावर विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबने हा सामना नऊ विकेटने जिंकला.

अशोकची तुफान फटकेबाजी
मंगलमूर्ती वॉरियर्स विरुद्ध प्रहार इलेव्हन हा चौथा सामना एकतर्फी झाला. यामध्ये प्रहार इलेव्हन संघाने मंगलमूर्ती वॉरियर्स संघाचा दहा विकेटने पराभव केला. अष्टपैलू खेळी करणारा अशोक गायकवाड हा सामन्याचा मानकारी ठरला. प्रथम फलंदाजी करत मंगलमूर्ती संघाने सहा षटकांत चार विकेट गमावत ६४ धावा केल्या. राहुल गुंजाळ याने ३५ धावांची तुफानी खेळी केली. तर शिब्बान शेख याने दोन, अशोक गायकवाड आणि प्रेम टेमघरे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रहारचा सलामी जोडीने तुफान फटकेबाजी करत केवळ ४.४ षटकांत एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. अशोक गायकवाडने १९ चेंडूंत नाबाद ५८ धावा केल्या.

शिब्बनची प्रभावी गोलंदाजी
दिघी वॉरियर्स विरुद्ध प्रहार इलेव्हन हा साखळी फेरीतील पाचवा सामन्यात प्रहार इलेव्हन संघाने दिघी वॉरियर्सचा दहा विकेटने पराभव केला. तीन विकेट घेणारा शिब्बन शेख हा सामन्याचा मानकारी ठरला. प्रथम गोलंदाजी करत प्रहार इलेव्हन संघाने दिघी वॉरियर्स संघाच्या सहा षटकांत सात विकेट घेत त्यांना ३९ धावांवर रोखले. शिब्बन शेख याने तीन तर नितीन वाकले आणि अंकित कामत यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. अशोक गायकवाडने पुन्हा एकदा
दमदार खेळी करत ९ चेंडूंत नाहाद २८ धावा केल्या आणि प्रहार इलेव्हन संघाने हा सामना केवळ २.३ षटकांतच जिंकला.


काल झालेले सामने
ऋत्विक तारूचे वादळी अर्धशतक
झुंजार इलेव्हन संघाने गुरुवारी सायंकाळी झालेल्या पाचव्या साखळी सामन्यात फ्युरियस इलेव्हनवर १८ धावांनी विजय मिळविला. विजयी संघाच्या ऋतिक तारू याने २५ चेंडूत नाबाद ६० धावांची वादळी खेळी केली. त्यालाच सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.
दुपारी पावणे चार वाजता सामन्याला सुरुवात झाली. पिंपरीच्या विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाणेफेक घेण्यात आली. झुंजार इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी केली. ऋतिक तारू याने तब्बल ७ षटकार व २ चौकार मारले. ऋतिकच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे संघाला ६ षटकांत ४ बाद ८३ धावांपर्यंत मजल मारता आली. या धावसंख्येचा पाठलाग करताना फ्युरियस इलेव्हनचा संघ ६ षटकांत ३ बाद ६५ धावांपर्यंत जाऊ शकला. कर्णधार पठाण याने ७ चेंडूंत नाबाद २५ धावा केल्या, तर अनिकेत प्रधान (१३ धावा), रोहित कदम (नाबाद ११) यांनी संघाला विजयापर्यंत नेण्याचे प्रयत्न केले. परंतु, धावगती संथ राहिल्याने संघ विजयापासून दुरावला. विजयी संघाकडून शंकर जगताप, ऋतिक आणि ओंकार तारू यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. तर पराभूत संघाकडून यश सांगळे (३ विकेट), अशु गुंड (१ विकेट) यांनी चांगली गोलंदाजी केली.


झुंजारची ‘झुंजार’ खेळी अपयशी
अतिशय रोमांचक सामन्यात ‘एसएनव्ही’ संघाने सहाव्या सामन्यात झुंजार इलेव्हन संघावर १५ धावांनी मात केली. विजयी संघाचा धीरज डोडवानी सामनावीर ठरला.
प्रथम फलंदाजी करताना ‘एसएनव्ही’ संघाने ६ षटकांत बिनबाद ७९ धावा केल्या. त्यामध्ये धीरज याच्या २० चेंडूंत नाबाद ४३ तर संदीप नाणेकर याच्या १७ चेंडूंत नाबाद २९ धावांचा महत्वपूर्ण वाटा राहिला. धीरज डडवाणी याने आपल्या खेळीत तीन षटकार मारले. या दोघांसमोर झुंजार इलेव्हनची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. लक्ष्याचा पाठलाग करताना झुंजार इलेव्हन संघाला ५ बाद ६४ धावा करता आल्या. विजयासाठी झुंजार संघाने शर्थीची झुंज दिली. कार्तिक कठाळे याने कर्णधाराला शोभेल, अशी तीन षटकार मारत १५ चेंडूंत ३१ धावांची झुंझार खेळी केली. पण संघासाठी विजय मात्र खेचून घेता आला नाही. सर्वेश शिंदे ९ चेंडूंत १५, मयूर ललवानीच्या ६ चेंडूंत नाबाद १४ धावा केल्या. प्रतिस्पर्धी ‘एसएनव्ही’ संघाकडून धीरज डोडवानी, महेश आणि सचिन डी.यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.

बजरंगबली इलेव्हन सहज विजयी
बजरंगबली इलेव्हन संघाने ज्युनिअर गाईज इलेव्हन संघाला सातव्या सामन्यात ९ विकेटने पराभूत केले. विजयी संघाचा अष्टपैलू खेळाडू अंकित जांगीड सामन्याचा मानकरी ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ज्युनिअर बॉईज इलेव्हन संघाला मोठी आव्हानात्मक लक्ष्य ठेवता आले नाही. संघाला ७ षटकांत ६ बाद ३६ धावाच करता आल्या. जयेश रसम (१०), आशिष भोसले (८), बिर्ला रावत (नाबाद ६) यांनाच धावसंख्येत थोडीफार भर घालता आली. बजरंगबली इलेव्हन संघाने सहजसोपे लक्ष्य अवघ्या २.३ षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. अंकित जांगीड (१२), विजय (नाबाद ७), सुचित राम (नाबाद ६) धावा केल्या. विजयी संघाकडून अंकित, विशाल वीर, रवी राठोड, मनीष कटारिया यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.

सचिन शिंदेची अष्टपैलू खेळी
पिंपरी इलेव्हन संघाने सचिन शिंदे याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सह्याद्री इलेव्हन संघाचा ६ विकेट राखून पराभव केला. सचिन शिंदे हाच सामन्याचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरताना सह्याद्री इलेव्हन संघाने ७ षटकांत ७ बाद ४७ धावा केल्या. सौरव वाळुंजकर (१८), सोमनाथ शिंदे (९), मारुती पाटील आणि अमित ढाके (प्रत्येकी ६) यांनी धावा केल्या. परंतु, आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात त्या अपुऱ्या पडल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पिंपरी इलेव्हन संघाने ६.१ षटकांत ४ बाद ५२ धावा करत विजय मिळविला.
विजयी संघाच्या सचिन शिंदे याने गोलंदाजीमध्ये प्रथम दोन महत्वपूर्ण बळी घेतले. त्यानंतर फलंदाजीमध्ये दोन षटकार मारत १६ धावांची महत्वपूर्ण कामागिरी करत संघाला विजय मिळवून दिला. सोन्या एन.याने १८ चेंडूंत १५ धावा केल्या. विजयी संघाच्या शाहू बनसोडे, ओम सुर्वे, रोनिक सोनावणे यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या. तर पराभूत संघाकडून मारुती पाटील २, महिंद्रा गायकवाड, अमित ढाके यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.


बजरंगबली इलेव्हनची सहज मात
बजरंग बली इलेव्हन संघाने स्पर्धेतील नवव्या सामन्यात पिंपरी इलेव्हन संघावर २२ धावांनी सहज मात केली. विजयी संघाचा कर्णधार सूचित राम सामन्याचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना बजरंगबली इलेव्हन संघाने ६ षटकांत ३ बाद ६० धावा केल्या. सूचित राम याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना १७ चेंडूंत नाबाद ३५ धावा केल्या. तसेच २ विकेटही घेतल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना पिंपरी इलेव्हनचा संघ ६ षटकांत ८ बाद ३८ धावा करु शकला. विजयी संघाकडून अंकित जांगीड याने सर्वाधिक ३ तर मनिष कटारिया, रवी राठोड यांनी प्रत्येकी एकेक विकेट मिळविल्या. पराभूत संघाकडून ओम सुर्वे (२), प्रसाद तळपे (१) यांनाच गोलंदाजीत थोडीफार चमक दाखवता आली.

सह्याद्री इलेव्हनची एकतर्फी बाजी
ज्युनियर गाईज आणि सह्याद्री इलेव्हन यांच्यातील दहावा सामना जवळपास एकतर्फी राहिला. सह्याद्री इलेव्हन सहज विजयी झाला. गोलंदाज सारंग वाघेरे याला सामनावीर किताब मिळाला.
ज्युनियर गाईज संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ७ बाद ४२ धावा केल्या. संघाकडून अजय बनसोडे (१३), विवेक पवार (१२) यांनी धावांचे योगदान केले. मात्र, सह्याद्री इलेव्हन संघाला विजयापासून दूर ठेवण्यात हे लक्ष्य कमी पडले. सह्याद्री इलेव्हनने हे लक्ष्य ३.३ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. मारुती पाटील (१६), गौरव गुबारे (नाबाद १०) यांनी विजयाचा पाया रचला. विजयी संघाच्या सारंग वाघेरे २ विकेट घेतल्या. मारुती पाटील, महिंद्र गायकवाड, मयूर यांनी प्रत्येकी एकेक विकेट मिळविल्या. पराभूत संघाकडून जयेश रसम, मोनिश चोरगे यांनी एकेक विकेट प्राप्त केल्या.

पिंपरी इलेव्हनचा पुन्हा विजय
ओम सुर्वे याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पिंपरी इलेव्हन संघाने सह्याद्री इलेव्हन संघाचा ९ विकेट राखून पराभव केला. ओम सुर्वे सामन्याचा मानकरी ठरला.
सह्याद्री इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ४ बाद ४९ धावा केल्या. अतुल (नाबाद १५), सौरव वाळुंजकर (१५), मारुती पाटील (१३) यांनी फलंदाजीत थोडीफार चमक दाखविली. परंतु, आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. त्याचा फायदा घेत पिंपरी इलेव्हन संघाने सहज अवघ्या ३.४ षटकांतच आव्हान यशस्वीपणे पार केले. त्यात ओम सुर्वे (नाबाद ३७), केतन कुदळे (१२) यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले. विजयी संघाकडून शाहू बनसोडे याने २ विकेट, सचिन शिंदे, ओम सुर्वे यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.

ओम सुर्वे सलग दुसऱ्यांदा सामनावीर
पिंपरी इलेव्हन संघाने गुरुवारी रात्रीच्या अखेरच्या सामन्यात बजरंगबली इलेव्हन संघावर ७ विकेट राखून विजय मिळविला. ओम सुर्वे याने सलग दुसऱ्यांदा सामनावीर किताब पटकाविला.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बजरंगबली इलेव्हन संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संघाला ७ विकेटच्या मोबदल्यात केवळ ४१ धावाच करता आल्या. ओम जांगीड (१६), मनिष कटारिया (१३) धावा केल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना सचिन शिंदे याने नाबाद १३ धावा केल्या. तर पंकज डब्ल्यू याने १२ धावांचे योगदान दिले. विजयी संघाकडून ओम सुर्वे याने २ तर प्रतीक तळपे याने एक विकेट घेतली. पराभूत संघाकडून अंकित जांगीड याने २ तर मनिष कटारिया याने १ विकेट मिळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com