वडगावच्या सिंहगड स्प्रिंग डेल विद्यालयाला विजेतेपद

वडगावच्या सिंहगड स्प्रिंग डेल विद्यालयाला विजेतेपद

Published on

पुणे, ता.१९ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स २०२५ स्पर्धेत वडगाव बुद्रूक येथील सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक स्कूलने विजेतेपद पटकावत सुवर्ण करंडकावर नाव कोरले. कर्वेनगरमधील उपविजेत्या मिलेनियम नॅशनल स्कूलला रौप्य चषक, तर एरंडवणेमधील अभिनव स्कूलला ब्राँझ चषक मिळाला.
शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ‘सकाळ स्कूलिपिंक्स’चा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात झाला. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पूनावाला फिनकॉर्पचे हर्ष कुमार आणि शंकर नंबीमदथील यांच्या हस्ते विजेत्या शाळांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या सिंहगड स्प्रिंग डेल विद्यालयाला तीन लाख रुपयांचा धनादेश, करंडक देण्यात आले. उपविजेत्या मिलेनियम नॅशनल स्कूलला दोन लाख रुपयांचा धनादेश, पारितोषिक देऊन सन्मानित केले. तृतीय क्रमाकांच्या अभिनव विद्यालयाला एक लाख रुपयांचा धनादेश, पारितोषिक दिले. यावेळी विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांनी पारितोषिक स्वीकारताना एकच जल्लोष केला. विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूनावाला फिनकॉर्पचे हर्ष कुमार म्हणाले, ‘‘सर्व विजेत्या संघांचे, विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. जे विजेते झाले नाही, त्यांनी हताश होऊ नये. तुम्ही अशा स्पर्धेत सहभागी झालात, हेच महत्त्वाचे आहे. अनेक शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या. ही चांगली बाब आहे. अशा स्पर्धेतूनच विद्यार्थ्यांना खूप काही शिकण्याची संधी निर्माण होते. ‘सकाळ स्कूलिपिंक्स’ सारख्या स्पर्धेमुळे ऑलिंपिकमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढेल. या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करता आले, याचा आनंद आहे.’’
स्पर्धेत सहभागी सर्व क्रीडा संघटना व प्रतिनिधी यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी ‘सकाळ’चे नवीन उपक्रम विभाग प्रमुख हेमंत वंदेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धेत यंदाच्या वर्षी सुमारे ५५० हून अधिक शाळांच्या २५ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

हे यश माझ्या एकट्याचे नाही, तर शिक्षक, कुटुंब आणि केलेली मेहनत या सर्वांचे हे फलित आहे. स्पर्धेमुळे माझ्या क्षमतांचा विकास झाला. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर सकारात्मकता महत्त्वाची आहे. अशा स्पर्धेमुळे प्रेरणा मिळते.
- अर्णव कडू, चॅम्पियन बॉय, सिंहगड स्प्रिंग पब्लिक स्कूल, वडगाव बुद्रूक

स्कूलिंपिक्स सारख्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी जागृती निर्माण होते. येथे केवळ शारीरिकच नाही, तर बौद्धिक क्षमतांचा देखील कस लागतो. हे यश माझे पालक, शिक्षक, शाळा मुख्याध्यापक, क्रीडा मार्गदर्शक यांच्यामुळे मिळाले आहे.
- काव्या रिसबूड, चॅम्पियन गर्ल, अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडवणे

स्कूलिंपिक्स स्पर्धा मुलांच्या विकासासाठी खूप चांगली आहे. ‘सकाळ’ ने अशा स्पर्धेसाठी घेतलेला पुढाकार स्वागतार्ह आहे. आपल्याला नानाविध क्रीडा प्रकारांतून चांगले खेळाडू घडवायचे असतील, तर अशा स्पर्धांची नितांत गरज आहे.
- देवेश अग्रवाल, संचालक, एसबी रिऍलिटी

‘सकाळ’ चा उपक्रम अतिशय चांगला आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ तयार होत आहे. ही खूप चांगली बाब आहे. आम्ही या स्पर्धेशी जोडलो आहोत. याचा मनस्वी आनंद आहे.
- सचिन हिंगणे, प्रमुख, कॉर्पोरेट कम्युनिकेशन

‘सकाळ स्कूलिंपिक्स’ हे व्यासपीठ उदयोन्मुख खेळाडूंसाठी अतिशय चांगले आहे. स्थानिक स्तरावर अशा प्रकारच्या स्पर्धा होणे गरजेचे आहे. निकोप स्पर्धेची भावना खेळाडूंमध्ये असणे आवश्यक आहे. ऑलिंपिकमध्ये जसे वातावरण असते. तसे वातावरण स्पर्धेमधून दिसून आले.
- ऋषिकेश कुलकर्णी, प्रमुख, डब्ल्यू १८ स्पोर्टस युनिव्हर्स


------------------------------------------

शाळेचे नाव सुवर्ण रौप्य ब्राँझ एकूण गुण

सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल, वडगाव बुद्रूक २९ ३३ ३० २७६
मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर १८ २६ १५ २४७
अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा, एरंडवणे ३० २० २६ २३६
एम.ई.एस. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कोथरूड १७ ११ १० १२८
सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे माळवाडी ११ १७ २२ १२८
आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी ८ ९ ९ ११२
सेवासदन इंग्रजी माध्यम शाळा, एरंडवणे १३ ७ ८ ९४
नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची लष्करी शाळा, फुलगाव ४ १० २३ ९१
लोकसेवा इंग्रजी माध्यम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय ६ ८ ७ ७७
डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, एरंडवणे ९ ९ ४ ७६
सिंबायोसिस स्कूल, प्रभात रस्ता ५ ३ ७ ६५
लोकसेवा ई स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पाषाण ४ ७ १४ ५५
वॉलनट स्कूल, शिवणे ९ २ ३ ५४
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव ४ ६ ४ ५२
अभिमन्यू इंग्रजी माध्यम शाळा, वारजे ९ १ ३ ५१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com