अनियमित वीजपुरवठा; 
पिण्याच्या पाण्याची समस्या

प्रभाग क्रमांक १४

अनियमित वीजपुरवठा; पिण्याच्या पाण्याची समस्या प्रभाग क्रमांक १४

Published on

प्रभागाचा लेखाजोखा

प्रभाग क्रमांक १४

अनियमित वीजपुरवठा;
पिण्याच्या पाण्याची समस्या


पिंपरी, ता. १३ : दिवसाआड पाणीपुरवठा तोही कमी दाबाने, खंडित व अनियमित वीजपुरवठा, रस्त्यालगतची अतिक्रमणे, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, रस्त्यांची दुरवस्था, अशा विविध समस्यांना प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
चिंचवड स्टेशन-मोहननगर हा प्रभाग म्हणजेच प्रभाग क्रमांक चौदा होय. जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला या प्रभागाचा विस्तार असून जुन्या चाळी, सोसायटीतील मतदारांची संख्या मोठी आहे. या प्रभागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. आषाढी वारीतील श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम असलेले आकुर्डीतील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर तसेच खंडोबा मंदिर, चिंचवड स्टेशन येथील जुने ईएसआय रुग्णालय आदी भाग या प्रभागात येतो. मिश्र लोकवस्तीचा हा भाग आहे. दत्तवाडी, रामनगर तसेच मोहननगरच्या काही भागात चाळी आहेत. तर आकुर्डी, तुळजाभवानी माता मंदिर परिसर, मोहननगर, महावीर पार्क परिसरात मोठ्या सोसायटी, तसेच बंगले आहेत. बैठी घरे देखील आहेत. विविध मोठी शोरूम व इतर दुकाने असून, व्यापारी वर्गही या प्रभागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे.
---------------------
*चतुःसीमा
उत्तर - थरमॅक्स चौक
दक्षिण - चिंचवड स्टेशन, गंगानगर, लोहमार्ग
पूर्व -केएसबी चौक
पश्चिम - निगडी प्राधिकरण,
-----------------
*समाविष्ट भाग
चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, ऐश्वर्यम सोसायटी, शुभश्री सोसायटी, जय गणेश व्हीजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, तुळजाई वस्ती आदी परिसर.
------------------
* प्रमुख समस्या
- वीज समस्या : या प्रभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, वीज समस्या गंभीर बनली आहे. मोहननगर, रामनगर या भागात भूमिगत वीजवाहिन्या खराब झाल्या आहेत. पावसाळ्यात तर अनेकदा वीजपुरवठा खंडित होत असतो. विजेचा दाब कमी जास्त होण्याचे प्रकारही अनेकदा घडतात. यामुळे विद्युत उपकरणे खराब होत असून, नागरिकांचे नुकसान होत आहे. विठ्ठलवाडी, दत्तवाडी या भागातील नागरिकही वीज समस्येने हैराण झाले आहेत.
- दिवसाआड, कमी दाबाने पाणीपुरवठा : मोहननगर, रामनगर, विठ्ठलवाडी, दत्तवाडी या भागात दिवसाआड व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होते.
- अतिक्रमणे : प्रशस्त रस्ते केले. त्यालगत पदपथ बनविले. मात्र, रस्त्यांसह, पदपथावरही अतिक्रमणे झाली आहेत. दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले असून, तेथे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनी वाहनेही रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जावे लागते. यामुळे अपघाताचा धोका वाढतो. आकुर्डी व मोहननगर परिसरात जे पदपथ वाढवले आहेत. त्याचा उपयोग पादचाऱ्यांएवजी पार्किंगसाठीच होत असल्याचे दिसून येते. विविध ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते.
- भटक्या कुत्र्यांचा उपद्रव : मोहननगर, काळभोरनगर या भागात कामगारांची संख्या अधिक असून, विविध पाळीत काम करणाऱ्या कामगारांची कंपनीत ये-जा सुरू असते. दरम्यान, या परिसरातील भटक्या कुत्र्यांकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीने कामगारांसह नागरिकांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
- सेवा रस्त्यांची दुरवस्था : जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. अपघाताच्या घटना घडत असून मोठ्या प्रमाणात धूळ उडते.

कुठे? काय?
- या प्रभागात बैठी घरे, बंगले, जुन्या चाळी, सोसायटीत असून, मिश्र लोकवस्तीचा हा भाग आहे
- पिंपरी चिंचवड औद्योगिकनगरी असल्याने त्यांना वैद्यकीय सुविधा
देण्यासाठी मोहननगर येथे ईएसआय रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयात पुरेशा सुविधा नाहीत.
- मोहननगर चौकातील गाय वासरू शिल्पाजवळ रस्त्यावर दगड लावलेले आहेत. यावर दुचाकी आदळून अपघाताचा धोका निर्माण होतो. येथील हे दगड काढून डांबरीकरण अथवा, सिमेंटचा रस्ता करण्याची मागणी होत आहे.
- आकुर्डीतील दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात पावसाळ्यात ओढ्यातील अतिरिक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरते.
- अंतर्गत रस्ते : प्रभागातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी रस्त्याची खोदाई केली जाते. मात्र, नंतर व्यवस्थित डांबरीकरण न करता केवळ वरच्या वर डागडुजी केली जाते.

* असे आहेत मतदार
पुरुष : ३०,९०९
स्त्री : २७,०६७
इतर : ०२
एकूण : ५७,९७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com